आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी एक्स्प्रेस : वेल्लोरहून २५ लाख लिटर पाणी घेऊन पहिली रेल्वे चेन्नईत दाखल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई  - चार महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचे संकट झेलणाऱ्या चेन्नईत शुक्रवारी पहिली रेल्वेगाडी पाणी घेऊन दाखल झाली. या गाडीने वेल्लोरच्या जोलारपेट्ईहून ५० डब्यांत २५ लाख लिटर पाणी आणले आहे. आता ही गाडी दररोज जोलारपेट्टईहून २२० किमी अंतरावरील चेन्नईपर्यंत चार फेऱ्यांद्वारे १० लाख लिटर पाणी पोहोचवेल. तामिळनाडू पाणीपुरवठा व ड्रेनेज बोर्डानुसार राज्यात एखाद्या ठिकाणी रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची घटना १८ वर्षांत पहिल्यांदाच घडली आहे. चेन्नईला दररोज सरासरी ५२ कोटी लिटर पाण्याचा पुरवठा होतो. त्या दृष्टीने रेल्वेने आणले जाणारे पाणी केवळ २ टक्के असेल. पाणी नेण्यासाठी विशेष रेल्वे राजस्थानहून मागवण्यात आली आहे. ही गाडी गुरुवारी येणे अपेक्षित होते. परंतु व्हॉल्व्हमधील गळतीमुळे पोहोचण्यास विलंब झाला. पाण्यासाठी गाडीवर ८.४ लाख रुपये खर्च होतील. एका फेरीसाठी ५ तास लागतील. या पाण्याला पंपाने काढून ३.५ किमी लांबीच्या वाहिनीच्या मदतीने पंप हाऊसपर्यंत पोहोचवले जाईल. 

 

१५००० टँकरद्वारे ४६ लाख लोकांना पाणीपुरवठा

चेन्नईत ४६ लाख लोकांचे पाण्याअभावी हाल होत आहेत. सर्वाधिक फटका दक्षिण चेन्नईला बसला आहे. चार महिन्यांपासून पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे ४ जलाशय कोरडे पडले. या जलाशयांत केवळ १ टक्के पाणी शिल्लक आहे. परिसरातील जिल्ह्यांतून दररोज १५ हजार टँकरद्वारे चेन्नईला पाणीपुरवठा केला जाणार आहे. 

 

चेन्नईत आतापर्यंत ३८ टक्के कमी पाऊस

मान्सून येऊन एक महिना लोटला, परंतु चेन्नई अद्यापही कोरडे आहे. काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या. जूनमध्ये चेन्नईत सरासरी ५६ मिमी पाऊस झाला. अलीकडे ४४ मिमी पाऊस झाला. अर्थात २० टक्के कमी पाऊस झाला. जुलैचे १२ दिवस लोटल्यानंतरही चेन्नईत ३८ टक्के कमी पाऊस झाला. त्यामुळे सरकारने पाणीपुरवठ्यासाठी ६५ कोटी मंजूर केले. 

 

 

बातम्या आणखी आहेत...