आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी फाउंडेशनच्या 2019 च्या ‘वाॅटर कप’ला दुष्काळाच्या झळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 मुंबई -पाणलोट विकासाच्या कामांचे राज्यात अक्षरश: तुफान उभे करणाऱ्या पाणी फाउंडेशनला दुष्काळाच्या झळा बसल्या आहेत. परिणामी चौथी वाॅटर कप स्पर्धा (२०१९) ३०० तालुक्यांत नेण्याचे फाउंडेशनचे स्वप्न भंग पावले अाहे. त्यातच ऐन उन्हाळ्यात लोकसभा निवडणुका होण्याची शक्यता असल्याने २०१८ वाॅटर कप स्पर्धेचा विस्तार न करण्याचा अामिर खान आणि त्याच्या चमूचा विचार आहे.


२०१६ पासून अभिनेता अामिर खान व पत्नी किरण राव यांचे पाणी फाउंडेशन वाॅटर कप स्पर्धा घेते आहे. २०१६ मध्ये ३, २०१७ मध्ये ३० आणि २०१८ मध्ये कोकण वगळता राज्याच्या चारही विभागांतील तब्बल ७५ तालुक्यांत ही स्पर्धा पार पडली. २०१९ मध्ये ३०० तालुक्यांत वाॅटर कप स्पर्धा नेण्याचा फाउंडेशनचा मानस होता. यंदा पार पडलेल्या २०१८ वाॅटर कपच्या स्पर्धेतून ४ हजार २५ गावांत पाणलोटांची कामे उभी राहिली. त्यातून २२ हजार २६९ कोटी लिटर्स पाणी साठवण क्षमता निर्माण झाली. पण यंदा पाऊसच पडला नाही. परिणामी कामे खोदूनही त्यात पाणलोटाच्या चरीत पाणी साठलेच नाही. त्यामुळे पाणी फाउंडेशनचे काम म्हणावे तितके दिसले नाही. दरवर्षी ८ एप्रिल ते २२ मे दरम्यान ४५ दिवस वाॅटर कप स्पर्धा घेतली जाते. मात्र, पुढच्या वर्षी या कालावधीत लोकसभा निवडणुका आहेत. गावात निवडणुकांची धामधूम असणार आहे. त्यामुळे वाॅटर कपमध्ये गावकऱ्यांना श्रमदान करण्यासाठी प्रोत्साहित करणे अवघड जाणार आहे. त्यामुळे २०१९ वाॅटर कप स्पर्धेला प्रतिसाद मिळण्याची शक्यता कमीच दिसते आहे.


टीम सांभाळणे कठीण
फाउंडेशनच्या वतीने स्पर्धा घेण्यात येत असलेल्या प्रत्येक तालुक्यात २ समन्वयक, २ सामाजिक कार्यकर्ते नियुक्त करण्यात येतात. स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येक गावातील पाच व्यक्तींना पाणलोटाचे प्रशिक्षण देण्यात येते. त्यासाठी सुमारे २०० तांत्रिक प्रशिक्षक नियुक्त केलेले असतात. असे सुमारे ७०० ते ९०० पगारी मनुष्यबळ फाउंडेशनकडे असते. फाउंडेशनच्या टीमचा पसारा मोठा झाला असून त्यांना एकसंध ठेवणे, कार्यप्रवण करणे फाउंडेशनला जड जाते आहे. त्यातच यंदाचा दुष्काळ, त्यामुळे गावकऱ्यांचा आटलेला उत्साह आणि आगामी लोकसभा निवडणुकांनी पुढच्या वाॅटर कपसमोर मोठेच आव्हान उभे केले आहे. त्यामुळे २०१९ च्या वाॅटर कप स्पर्धेचा विस्तार होण्याची शक्यता धूसर आहे.

 

मुख्यमंत्री फडणवीसांची इच्छा, मात्र ‘पाणी’ चमूची ना
२०१९ वाॅटर कप ३०० तालुक्यांत नेण्याचे अामिर खान यांनी सूतोवाच केले होते. मात्र, आता विस्तारासंदर्भात गांभीर्याने विचार सुरू आहे. २०१९ वाॅटर कप किमान १०० तालुक्यांत तरी नेण्यात यावा, अशी इच्छा मुख्यमंत्री फडणवीस यांनी फाउंडेशनकडे व्यक्त केली. मात्र, पाणी फाउंडेशनची टीम पुन्हा ७५ तालुक्यांपुरतीच स्पर्धा समिती ठेवावी, असा विचार करते आहे.

बातम्या आणखी आहेत...