Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Water from 79 districts is dangerous; Study of Bhabha Atomic Research Center in 16 States

79 जिल्ह्यांतले पाणी घातक; बेसुमार उपसा, रासायनिक खतांचा भडिमार मुख्य कारण 

महेश जोशी | Update - Feb 12, 2019, 07:54 AM IST

भाभा अणुसंशोधन केंद्राचा 16 राज्यांत अभ्यास

 • Water from 79 districts is dangerous; Study of Bhabha Atomic Research Center in 16 States

  औरंगाबाद- भूगर्भातील पाण्याच्या अपरिमित उपशामुळे केवळ भूजल पातळी खालावत नाही, तर खोल गेलेले पाणी युरेनियमने प्रदूषित झाले आहे. त्यास रासायनिक खतांचा भडिमार हे पण एक कारण समोर आले आहे. आरोग्यास घातक असणाऱ्या या पाण्याचे नमुने तपासण्यासाठी केंद्र शासनाने भाभा अणुसंशोधन केंद्राच्या मदतीने १६ राज्यांतल्या ७९ जिल्ह्यांतील १ लाख २० हजार पाण्याचे नमुने तपासण्यास सुरुवात केली आहे. यात मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी या ४ जिल्ह्यांचा समावेश आहे.

  भूजलाचा वापर करणारा भारत जगातील सर्वात मोठा देश आहे. येथे शेतीसाठीच्या ६० टक्के तर पिण्यासाठी लागणाऱ्या ८५ टक्के पाण्याची गरज भूजलाने पूर्ण होते. बोअरची पाणीपातळी सध्या ६०० ते ७०० फुटांपेक्षा जास्त खोलवर पोहोचली आहे. रासायनिक खतांचा अत्याधिक वापरही हाताबाहेर गेला आहे. यामुळे युरेनियमचा धोका वाढला आहे.

  बेसुमार उपसा, रासायनिक खतांचा भडिमार मुख्य कारण
  भूजलामध्ये युरेनियमचा धोका २०१२ मध्ये राजस्थान आणि हरियाणामध्ये समोर आला. केंद्रीय भूजल मंडळाने घेतलेल्या चाचण्यांत ३२४ पैकी ५५ विहिरींच्या पाण्यात युरेनियम सापडले. यावर आरोग्य आणि पर्यावरणवाद्यांचे लक्ष गेले. मात्र, युरेनियम आणि कर्करोगाचा संबंध असल्याचे पुरावे उपलब्ध नव्हते. नंतर फिनलँड आणि कॅनडामध्ये युरेनियमने कर्करोगाचा धोका असल्याचे समोर आले. २०१४ मध्ये केंद्राने युरेनियमच्या शोधासाठी देशव्यापी प्रकल्प हाती घेतला. याची जबाबदारी भाभाकडे देण्यात आली. भाभाने १६ राज्यांतील ६९ जिल्ह्यांचे सर्वेक्षण करून तेथील नमुने गोळा करण्यास सुरुवात केली. पावसाळापूर्व व नंतरच्या नमुन्यांच्या चाचण्या केल्या जात आहेत.

  दोन मार्गांनी वाढला धोका
  युरेनियम हा धातू जमिनीतील पाण्यात विरघळतो. वातावरणातही काही प्रमाणात युरेनियम असते. मात्र ते सहज मिसळत नाही. जमीन क्षारयुक्त असणे, जमिनीत फ्लोराइड्स असणे, यामुळे युरेनियम विरघळण्यासाठी पूरक परिस्थिती आणि प्रक्रिया गतिमान होते. रासायनिक खतांमुळे नायट्रेटचे प्रदूषण होते. त्यामुळे वातावरणातील युरेनियमचा गुणधर्म बदलतो. ते पाण्यासोबत विरघळून भूजलात साठते. यामुळे प्रदूषण आणि या घटकांचा झपाट्याने फैलाव होतो.

  युरेनियम अतिघातक
  युरेनियमचा अंश असणारे पाणी अतिघातक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात युरेनियममिश्रित पाण्यामुळे त्वचा, यकृत व थायरॉइडचा कर्करोग, रक्ताचा कर्करोग, डिप्रेशन, यकृत निकामी होणे, फुफ्फुसाचे किडनीचे आजार, ब्लू बेबी सिंड्रोम यासारखे धोके संभवतात, अशी माहिती नॅशनल कॅन्सर फाउंडेशनचे समन्वयक डॉ.दिग्पाल धारकर यांनी दिली.

Trending