आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेचे ३३ टक्के पाणी जिल्हाधिकाऱ्यांनी कापले, नाशिककरांवर पाणीकपातीचे संकट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- पुरेसा पाऊस न पडल्याने यंदा जिल्ह्यातील अाठ तालुके कोरडे असून, नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातही ७५ टक्केच पाणी आहे. कश्यपीतूनही पालिकेस पाणी नको आहे. त्यामुळे पुढील पाणी दुर्भिक्षाचा विचार करता नाशिक महापालिकेला ४ हजार ४०० दलघनफूट पाणी देणे शक्य नसून ३ हजार दलघनफूट इतकेच देता येईल. म्हणजे तब्बल ३३ टक्के पाण्यात कपात करणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी दुष्काळ आढावा बैठकीत स्पष्ट केले. त्यामुळे पालिकेलाही पाणी कपात करावी लागणार असून यामुळे नाशिककरांवर पाणीकपातीचे मोठे संकट अाले अाहे. 


यंदा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा अाणि काही प्रमाणात नाशिक तालुका वगळता पूर्वेकडील तालुके कोरडेच आहेत. या अाठ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून पालिकेस मागील वर्षा इतके पाणी देणे शक्य नाही. त्यामुळे पालिकेने ऑक्टोबरमधील पाणी आरक्षणाबाबत आजच विचार करावा, त्यानुसार पाण्याची मागणी करावी. शासन आदेशाचा विचार केल्यास पालिकेला २०११ च्या लोकसंख्येनुसार पाणी देण्याचा निर्णय घेतला तर १४ लाख ८८ हजार लाेकसंख्येसाठी प्रति व्यक्तीनुसार एकूण २२ कोटी ३२ लाख लिटर पाण्याची गरज आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करून पालिकेला १७ लाख लोकसंख्येेमागे २५ कोटी ५० लाख लिटर पाणी देण्यात येत आहे. यानुसार २ हजार ७०० दशलक्ष घनफूट इतकी पाण्याची गरज पालिकेला आहे. असे असतानाही पालिका आज ४ हजार ४०० दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर करत आहे. त्यात आता पालिकेला गंगापूर धरण समूहातल्या काश्यपी धरणाचे पाणी नको आहे. पालिकेचे हे नियोजन चुकीचे अाहे. पण आता काटकसरीने पाणी वापर करून पाणीगळती थांबवावी. असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले. 


दत्तक नाशिकला स्वातंत्र्य दिनाची अनोखी भेट 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पालिका निवडणुकीत दत्तक घेतलेल्या नाशिकला स्वातंत्र्य दिनानिमित्त ३३ टक्के पाणी कपात करण्याची अनोखी भेट मिळाली आहे. नाशिकच्या विकासाला खेळ बसेल असे निर्णय सातत्याने होत असून नाशिकची नेमके काय करायचे आहे हे भाजपने स्पष्ट केले पाहिजे.
- अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेता महापालिका 

बातम्या आणखी आहेत...