आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद - मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर रविवारी भाजप आमदार प्रशांत बंब यांनी औरंगाबादेत बाेलावलेल्या बैठकीला मराठवाड्यातील फक्त दहा आमदारांनी हजेरी लावली. त्यातही नऊ आमदार बंब यांच्याच पक्षाचे हाेते, तर एक शिवसेनेचा. इतर पक्षांच्या आमदारांना या प्रश्नाचे फारसे गांभीर्य वाटले नाही, ते मतदारसंघातील मेळावे, उद्घाटनातच व्यग्र हाेते. आर.आर. पाटील फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींनी या बैठकीत जाऊन उपस्थित आमदारांना जाब विचारला. ‘दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या मराठवाड्याचा पाणीप्रश्न साेडवण्यासाठी आता तरी जागे हाेऊन एकजूट दाखवा,’ असे आवाहन करतानाच या बैठकीकडे पाठ फिरवणाऱ्या आमदारांना बांगड्यांचा आहेर पाठवण्याचा इशाराही आंदाेलनकर्त्यांनी दिला. दरम्यान, १३ फेब्रुवारीपूर्वी मुख्यमंत्र्यांकडे एक बैठक घेऊन पाणीप्रश्न मांडण्यात येणार असल्याचे बंब यांनी सांगितले.
बैठकीतील गाेंधळ हा पूर्वनियाेजित ड्रामा हाेता. या बैठकीसाठी मी तासाभरापूर्वीच हजर हाेताे. मात्र हे नाटक पाहिल्यानंतर निघून गेलाे. पाण्याच्या विषयावर चांगले विचारमंथन हाेणे अपेक्षित हाेते, मात्र बैठकीला वेगळे वळण लावण्यात आले. कार्यकर्त्यांकडे पाहिल्यानंतर त्यांना ‘पाठवण्यात’ आल्याचे लक्षात येत हाेते, अशी प्रतिक्रिया आमदार संजय शिरसाट यांनी दिली.
एका हाॅटेलात झालेल्या या बैठकीला माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब, सुजितसिंह ठाकूर, अभिमन्यु पवार, संतोष दानवे, नारायण कुचे, राम पाटील रातोळीकर, रमेश पवार, मेघना बोर्डीकर,अतुल सावे हे भाजपचे तर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट उपस्थित हाेते.
बैठक सुरु हाेताच आर.आर. पाटील फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी बॅनर झळकावत उदासीन लाेकप्रतिनिधींचा निषेध केला. मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर आमदार एकत्र का येत नाहीत, यापेक्षा महत्त्वाची काेणते कामे आमदारांना आहेत? असे सवाल विचारले. सुमारे १५ मिनिटे त्यांचा गाेंधळ सुरु हाेता.
त्यानंतर बंब यांनी त्यांना शांत केले. हा गाेंधळ पाहून संजय सिरसाट, नारायण कुचे यांनी काढता पाय घेतला. संताेष दानवे हे देखील पंधरा मिनिट थांबून निघून गेले. त्यामुळे दीक्षा पवार, विकास पाले, अजय पवार, श्यामसुंदर कणके आदी कार्यकर्त्यांनी अजूनच गाेंधळ घालायला सुरुवात केली. त्यावर हरिभाऊ बागडे संतापले. ‘ही बैठक आम्ही बाेलावली आहे,’ असे त्यांनी सुनावले. ‘जे आले नाहीत त्यांच्यामुळे चर्चेत बाधा आणू नका,’ असे आवाहन सुजितसिंह ठाकूर यांनी केले.
काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांची पाठ, उपाेषणकर्त्या खासदारही गैरहजर!
पश्चिम महाराष्ट्रात एकी, आपल्याकडे बेकी
बैठक संपल्यानंतर आंदाेलक कार्यकर्ते व विद्यार्थ्यांना बाेलण्यास परवानगी देण्यात आली. विकास थाले म्हणाला, ‘मी बागडे यांच्या फुलंब्री तालुक्यातला. सुखना धरणाजवळ आमचे गाव, पण पाणी नाही.’ अजय पवार यांनी प. महाराष्ट्रात सर्वच पक्षाचे लोक एकत्र येतात, आपल्याकडे तसे का होत नाही?’ असा प्रश्न विचारला. टेंभापुरी प्रकल्पात पाणी आणतो असे सांगत बंब यांनी तीन टर्म आमदारकी मिळवली, अशी टीकाही केली. त्यानंतर बंब यांनी खुलासा केला.
आम्ही कुटुंब गमावलंय, इतर कुटुंबांवर तरी ही वेळ येऊ नये
बैठकीत गोंधळ सुरू असताना जवळपास शंभर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नी या ठिकाणी आल्या हाेत्या. आमदारांच्या अनास्थेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. बैठकीत येऊ दिले नाही म्हणून त्यांनी बाहेरच ठिय्या मांडला हाेता. नंतर बागडे व इतर आमदारांनी त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. गायत्री राऊत ही मुलगी म्हणाली, ‘आमचे कुटुंब आम्ही गमावले, मात्र आता इतरांवर ती वेळ येऊ देऊ नका.’ तर शारदा काकडे, श्यामसुंदर कणके यांनीही वॉटरग्रीड प्रकल्प सुरू ठेवावा, अशी मागणी केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.