आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी कोकणातून पाणी योजना मंजूर; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पश्चिमवाहिनी नदी खोऱ्यातून मराठवाड्यात पाणी वळवण्यासंबंधीच्या प्रस्तावित नदीजोड प्रकल्प योजनेला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. हे प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून न घेता राज्यांतर्गत प्रकल्प म्हणून राज्याच्या निधीतून त्वरित हाती घेतले जाणार असून यासाठी मुख्य अभियंता पदाची निर्मिती करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पांमुळे मुंबई शहरासाठी ३१.६० अब्ज घनफूट, मराठवाडा भागात २५.६० अब्ज घनफूट व तापी खोऱ्यासाठी १०.७६ अब्ज घनफूट पाणी कोकणातून उपलब्ध होईल. कोकणातील उल्हास, वैतरणा, नार-पार व दमणगंगा खोऱ्यात एकूण ३६० अब्ज घनफूट अतिरिक्त पाणी उपलब्ध आहे.  हे अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणे शक्य आहे. पूर्व विदर्भात वैनगंगा खोऱ्यात अतिरिक्त पाणी उपलब्ध आहे. या खोऱ्यातील १०० अब्ज घनफूट पाणी नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला व बुलडाणा जिल्ह्यांसाठी वळवण्याचाही प्रस्ताव आहे. 

 


सर्वेक्षणानंतर सुरू होईल प्रत्यक्षात काम
पाण्याची नैसर्गिक उपलब्धता कमी असल्याने कोकणातील अतिरिक्त पाणी वळवून मराठवाड्यासाठी उपलब्ध करून देणे हाच पर्याय उपलब्ध आहे. त्यासाठी सविस्तर सर्वेक्षणाअंती आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरणाऱ्या योजनांना मान्यता देऊन त्यांची कामे सुरू करण्यात येतील. कोकणातील नार-पार, दमणगंगा, उल्हास व वैतरणा या खोऱ्यांलगत असलेल्या मराठवाड्यातील गोदावरी नदी खोऱ्यातील पुणे, गंगापूर, वाघाड, करंजवण, भंडारदरा, मुळा, कडवा, मुखणे, भावली इत्यादी धरणांच्या पाणलोट खोऱ्यात हे पाणी वळवता येईल. त्यामार्गे पुढे मराठवाड्यातील जायकवाडी धरणापर्यंत पाणी पोहोचू शकेल.

बातम्या आणखी आहेत...