Home | Maharashtra | Vidarva | Buldana | Water tankers climb down the tanker and stop the tankers due to fear of fall

टँकरवर चढून पाणी पळवापळवी, पडण्याच्या भीतीने टँकरच बंद केले

त्र्यंबक कापडे | Update - May 25, 2019, 10:10 AM IST

चिंचोलीत एकच चर्चा, टँकर केव्हा येणार : तुला किती हंडे मिळाले, मी किती मिळवले

 • Water tankers climb down the tanker and stop the tankers due to fear of fall

  चिंचोली, जि. बुलडाणा - बुलडाणा जिल्हा तसा नेहमीच पर्जन्यछायेत असतो. यावर्षी महाराष्ट्र होरपळून निघत असताना तो तरी त्यातून कसा सुटणार? या जिल्ह्यातील १३ पैकी ७ तालुक्यांना टंचाईची झळ आहे. पण सर्वाधिक भीषण परिस्थिती चिंचोली गावात पाहायला मिळाली.


  गावात प्रवेश करताना दरवाजाजवळ पाण्यासाठी ठेवलेले ड्रम, हंडे, घागरी दिसून आल्या. आज टँकर का आले नाही? यावर चौकात चर्चा सुरू होती. एक ज्येष्ठ सांगत होते, “काल तहसीलदार मॅडम, बीडीओ, ग्रामसेवक येऊन गेले. लोक टँकरवर चढून जीव धोक्यात घालतात आणि चालकालाही धक्काबुक्की केली म्हणून तोही आज आला नाही. त्यामुळे आज टँकर येणार नाही.’ जिकडे-तिकडे एकच चर्चा, काल तुला किती हंडे मिळाले? कुणाला जास्त मिळाले, तर कुणाला पाणीच नाही मिळाले. पाण्याचे मोल आणि गांभीर्य चिंचोलीकरांना चांगलेच समजलेले दिसले. चिंचोली गाव हे पहाडपट्ट्यात किंवा दुर्गम भागात असते, तर समजू शकलो असतो, पण हे शेगावसारख्या प्रख्यात देवस्थानापासून अवघ्या सात किलोमीटरवरचे गाव आहे. सुमारे ४ हजार लोकसंख्या आहे. तंटामुक्त गाव आहे म्हणून बरे. नाही तर दररोज भांडणे झाल्याशिवाय राहिली नसती. दुष्काळ दौऱ्याची पाहणी करण्यासाठी चिंचोलीत गेलो. तारीख १७ मे होती. सरपंच, सदस्य, सामान्य नागरिक, दुकानदार या सर्वांकडून ऐकले ते धक्कादायक होते. हे लोक म्हणाले, “आमच्या गावाला पाणी योजनाच नाही. जवळच दोन किलोमीटरवर असलेल्या नवोदय विद्यालयात ज्या योजनेचे पाणी येते, तेथून आम्हाला पाइपलाइन करून द्या, पण ना शासन ना प्रशासन ऐकत. त्यामुळे आमच्या गावात जानेवारी २०१८ पासून रोज टँकरनेच पाणीपुरवठा केला जातो. शुक्रवारी गावकऱ्यांसाेबत आम्हीही टँकरची प्रतीक्षा करत बसलो. ग्रामसेवकांना विचारले, “संपूर्ण गाव टँकरची वाट बघतोय आणि तुम्ही खुशाल इथे टँकर लावून बसलात.’ त्यावर ते म्हणाले, “टँकर येण्याआधीच तरुण मुले गावाबाहेर नळ्या घेऊन बसतात आणि टँकरवर चढतात. त्यांच्या मागे महिला, वयोवृद्ध हंडे घेऊन पळतात. त्यामुळे टँकरवरून पडून कुणाचाही जीव जाऊ शकतो. या भीतीपोटी आज चालक आला नाही. त्याला काल धक्काबुक्की झाली. त्यामुळे टँकरचे झाकण वेल्डिंग करून घेतले. म्हणजे टँकरवर कुणी चढणार नाही.’

  दोन वर्षांपासून टँकरयुक्त गाव....
  या गावात टँकर केवळ टंचाई आहे म्हणून सुरू आहे, असे नाही, तर इथे जानेवारी २०१८ पासून रोज टँकरनेच पाणीपुरवठा होतो. या गावासाठी कोणतीही योजना नाही. जवळपास असूनही शासन ती मंजूर करत नाही. कुणाकडे जावे आणि काय सांगावे? हेच कळत नसल्याचे एका ग्रामस्थाने सांगितले. इतरांचेही तेच म्हणणे होते.

  जलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर येणार......
  आजपर्यंत या गावाला कुठून आणि कशी पाणी योजना आणायची? याचा सकारात्मक विचारच झालेला नाही. शिरपूर पॅटर्नचे भूजलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर येत्या गावाची पाहणी करणार आहेत. त्यांच्या प्रस्तावानुसार नवीन योजना शासन प्रशासन करण्याच्या विचारात आहे, असे एका ग्रामपंचायत सदस्याने सांगितले. तोपर्यंत टँकरनेच पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे टँकरमुक्त महाराष्ट्राचे इथे पुरते बारा वाजलेे आहे.

Trending