आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही बजावणार आहोत मतदानाचा हक्क, तुम्हीही आवर्जून मतदान करा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मतदानाची वेळ आज येऊन ठेपली आहे. सर्वत्र मतदानाचा उत्साह संचारला आहे. हाच उत्साह अनेक नागरिक गेली कित्येक दशके अनुभवत आहेत. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरच्या पहिल्या निवडणुकीपासून वयाची शंभरी गाठलेले नागरिक नियमितपणे न चुकता मतदान करतात, तर अनेक अंधही मतदान प्रक्रियेचा एक भाग होऊन डोळसपणे लोकशाही बळकट करण्याचा प्रयत्न करतात. आम्ही मतदानाचा हक्क बजावला आहे. तुम्ही आवर्जून मतदान करा, असा संदेश ही मंडळी देत आहेत :  

अशोक एकनाथ नारेवाड : अंध मतदार

वय : ४०, औरंगाबाद

औरंगाबादच्या राधास्वामी कॉलनीतील निवासी अशोक नारेवाड पानटपरी चालवतात. अंध असूनही लोकशाही, मतदान प्रक्रिया याबाबत कमालीचे जागरूक असतात. कितीही अडचण आली तरी आजवर एकदाही मतदान चुकवलेले नाही. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे आवश्यक आहे. आज मतदान नाही केले तर पुढच्या पिढ्या आपल्याला जाब विचारतील. यामुळे न चुकता, सुटीवर न जाता आज मतदान करा. तुमचे भविष्य एका बटणावर अवलंबून आहे. - संकलन : मंदार जोशी.
 

नारायणराव देशमुख (हरताळेकर), पहिल्या निवडणुकीतील मतदार
वय : ९७, भातकुली, ता. जि. अमरावती
१९६० मध्ये झालेल्या पहिल्या विधानसभेसाठी पहिल्यांदा हरताळा गावी मतदान केले. तेथेच निवडणूक प्रक्रियेत अधिकारी म्हणूनही काम केले. त्या वेळी मतदानाबाबत आजच्यासारखी जागृती नव्हती. बॅलेट पेपरवर शिक्का मारल्यानंतर अनेक मतदार मतपेटीबाहेरच बॅलेटपेपर टाकून निघून जायचे. आम्हाला ते मतपेटीत टाकावे लागायचे. त्या वेळी कोण निवडून आले हे लवकर माहिती होत नव्हते.  {संकलन : अनुप घाडगे
 

सखुबाई चुंभळे । शतायुषी व पहिल्या निवडणुकीतील मतदार, वय : १०२

लोकसभेसाठी झालेल्या पहिल्या निवडणुकीपासून म्हणजेच १९५२ ते २०१९ दरम्यान नॉनस्टॉप मतदान करत आले आहे. आज देवळाली (नाशिक) विधानसभा मतदारसंघातील गौळाणे येथे मतदानाचा हक्क बजावणार आहेत. १९५२ पासून आजपर्यंत देशात लोकसभेच्या १७ निवडणुका झाल्या. मतदानाशिवाय आल्याला हवी ते माणसे निवडून येणे अशक्य आहे. देश स्वतंत्र हाेताच तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाेकांना जे आवाहन केले ते डोळ्यांसमोर ठेवून मी मतदान करते आणि प्रत्येकाला मतदानाचा आग्रह करते. संकलन : गणेश डेमसे
 
 

पिराजी व सुजाता सुरवसे । अंध दांपत्य : सोलापूर
मी व माझी पत्नी सुजाता दोघे दृष्टिहीन आहोत. मागील २० वर्षांपासून नियमितपणे मतदान करतो. लोकशाहीने दिलेला तो अधिकार आहे. चांगला, सक्षम उमेदवार निवडीसाठी पाच वर्षांतून एकदाच मिळणाऱ्या संधीचं सोनं करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आमच्यासाठी ब्रेललिपीमध्ये मतपत्रिका आहे. घरापासून ने-आण करण्यासाठी व्यवस्था आहे. एवढ्या सोयी-सुविधा असताना रांगेत उभे राहण्याचा तुम्हीही कंटाळा न करता मतदान करा. 
- संकलन : विनोद कामतकर
​​​​​​​

वरुण तलवार । उद्याेजक, नाशिक
मी दरवेळी न चुकता मतदान करताे. माझ्या कामगारांनाही मतदानासाठी प्राेत्साहन देताे. रविवारी एका महत्त्वाच्या बिझनेस डीलसाठी मी इंदूरला आलाे आहे. साेमवारी सकाळी आमची महत्त्वाची मीटिंग हाेती, मात्र काही कारणामुळे ती दुपारी घेण्याचे ठरले. मात्र, जर मी ही मीटिंग केली असती तर मतदान करण्यासाठी वेळेत नाशिकला पाेहाेचू शकलाे नसताे. त्यामुळे महत्त्वाची असली तरी मतदानासाठी ही मीटिंग मी रद्द करून परत आलाे. काम तर महत्त्वाचे आहेच, पण राज्याचे भवितव्य ठरवणारी निवडणूकही महत्त्वाचीच आहे ना. - संकलन : संजय भड
 
 

बातम्या आणखी आहेत...