आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्ही विराेधातच; शिवसेना भाजपनेच सरकार बनवावे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सरकार बनवण्याचा आकडा त्या बाजूला आहे. त्यांनी सरकार स्थापावे, असाच जनतेचा कौल आहे. तो जनादेश युतीने पाळावा. विरोधी पक्षाचे काम करण्याची जनतेने आमच्यावर जबाबदारी सोपवली आहे, ती पार पाडण्याची लवकर संधी द्यावी, असे स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील सरकार स्थापनेसंदर्भातला संभ्रम आणखी वाढवला.


पवार म्हणाले, आम्ही वाट बघतोय की सरकार कधी स्थापन होते आहे. सरकार बनवण्यासाठी युतीकडे चांगले संख्याबळ आहे. त्यांनी ते लवकर बनवावे. काँग्रेस-राष्ट्रवादी विराेधी पक्षाचे काम करण्यासाठी तयार आहेत. मी चार वेळा मुख्यमंत्री झालो आहे. आता मी परत राज्यात येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सेनेचे संजय राऊत यांच्याशी झालेल्या भेटीबाबत विचारले असता, संसदेचे अधिवेशन तोंडावर आहे. त्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी राऊत आले होते, असे त्यांनी सांगितले. भाजप नेते नितीन गडकरी आणि काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्या भेटीबाबत विचारले असता, पटेल सुज्ञ व्यक्ती आहेत. ते काही काम घेऊन गेले असतील, असे पवार म्हणाले. राऊत १७० आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगतात, त्यांना पाठिंबा दिला आहे का, या प्रश्नावर मीसुद्धा त्या आमदारांचा शोध घेतोय, असे उत्तर त्यांनी दिले.

अमित शहांचे कौशल्य पाहण्यास उत्सुक
अयोध्या प्रकरणाचा निकाल लवकरच येणार आहे. निकालानंतर कुणी कायदा हातात घेऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. केंद्रीय गृहमंत्री व भाजप नेते अमित शहा यांच्या पुढाकाराने काठावर बहुमत असणाऱ्या अनेक राज्यांत भाजपने सरकारे स्थापन करण्यात यश मिळवले. महाराष्ट्रात असे होईल का, यावर पवार म्हणाले, त्यांचे ते कौशल्य पाहायला तुमच्यासारखाच मीसुद्धा उत्सुक आहे.

एनडीए सोडा, हिंदुत्व गुंडाळा, काँग्रेसच्या शिवसेनेला अटी

मुंबई : काँग्रेसचा पाठिंबा हवा असेल तर तुम्हाला एनडीएमधून बाहेर पडावे लागेल आणि दोघा पक्षांना मान्य होईल असा एक संयुक्त कार्यक्रम आखावा लागेल. या अटी मान्य होणार असतील तरच महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेस पाठिंबा देऊ शकेल,अशा अत्यंत कठीण अटी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी सेनेसमोर ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेना दिल्लीत एनडीमध्ये राहणार आणि महाराष्ट्रात युपीएमध्ये राहणार असे शक्य नाही. शिवसेनेला एनडीएमधून बाहेर पडावे लागेल.


शिवसेनेला पाठिंबा देण्यासंदर्भात काँग्रेसमध्ये कोणतेही तट नाहीत. यासंदर्भातला अंतिम निर्णय काँग्रेस पक्षश्रेष्ठी घेणार आहेत, असे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा द्यावा, असे काँग्रेसच्या ९० टक्के आमदारांचे मत असून ते पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातल्याचे मावळते विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले. सत्ता स्थापनेचा जनतेचा कौल एकट्या भाजपला नाही, असे काँग्रेसचे मत असल्याचे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र येईपर्यंत सत्ता तिढा सुटणार नाही, असा दावा केला.