आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलेट ट्रेनबाबत निर्णय नाही; प्रकल्पांना स्थगिती नव्हे, गती : मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी बदललेले निर्णय असे...

मुंबई - आधीच्या सरकारने मंजूर केलेल्या कुठल्याही विकास प्रकल्पाला स्थगिती देणार नाही. त्यांची गती कशी वाढवता येईल हे पाहू, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी दिले. ते म्हणाले, आम्हाला जी नवी कामे करायची आहेत, ती यात कशी सामावून घेता येतील, तसेच विकासकामांचा प्राधान्यक्रम ठरवू. फक्त आरे कारशेडला स्थगिती दिली असून बुलेट ट्रेनबाबत निर्णय झालेला नसल्याचेही ठाकरे म्हणाले. यामुळे आधीच्या प्रकल्पांना ब्रेक लागणार असल्याच्या चर्चेला िवराम मिळाला. 

मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंत्रालयात ४ तास उच्चस्तरीय बैठक घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला बुलेट ट्रेन, मुंबई मेट्रो, ट्रान्स हार्बर लिंक, नवी मुंबई विमानतळ, समृद्धी महामार्ग आदी प्रकल्पांचा आढावा घेतला. एकनाथ शिंदे, सुुभाष देसाई, छगन भुजबळ, जयंत पाटील या मंत्र्यांसह मेट्रोच्या संचालिका अश्विनी भिडे व अन्य विभागाचे सचिवही उपस्थित होते. प्राधान्यक्रम ठरवूनच कामे पूर्ण करणार

राज्यातील पायाभूत सुविधांची विकासकामे थांबवणार नाही. मात्र, उपलब्ध निधी, त्याचा विनियोग व स्थानिकांना होणारा लाभ या सर्व बाबींचा विचार करून या कामांचा प्राधान्यक्रम ठरवला जाईल. कुठलाही विकास प्रकल्प राबवताना स्थानिकांना विश्वासात घेणे तसेच कामाची प्रगती व उपलब्ध निधीचा ताळमेळ घालणेही आवश्यक अाहे. 
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री (बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना)प्रकल्पांवर २ लाख कोटी, राज्यावर ४.७१ लाख कोटींचे कर्ज

बुलेट ट्रेन : 1.1 लाख कोटी  

प्रकल्पासाठीचा ८१ टक्के निधी जपान ०.१ टक्के व्याजदराने ५० वर्षांसाठी देत आहे. महाराष्ट्र व गुजरातला प्रत्येकी ५ हजार कोटींची गुंतवणूक करावी लागेल. १३८० हेक्टर जमिनीपैकी ६२२ हेक्टर जमीन राज्य सरकारने ताब्यात घेतली आहे. २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे.समृद्धी महामार्ग : 46,000 कोटी रुपये

हा १० जिल्हे २६ तालुके, ३९० गावांमधून जाणारा ७०० किमीचा प्रकल्प अाहे. यामुळे मुंबई-नागपूर हा १४ तासांचा प्रवास ८ तासांवर येणार आहे. २०२२ पर्यंत तो पूर्ण होईल.कोस्टल रोड : 12,721 कोटी


९.९८ किमीचा हा प्रकल्प मुंबईच्या वाहतूक समस्येचा ताण कमी करू शकेल. या आठपदरी रस्त्यामुळे प्रवासाचा ७० टक्के वेळ वाचणार आहे. हा महामार्ग २०२२ पर्यंत पूर्ण करण्याची योजना आहे.

 

वर्सोवा सी लिंक : 11,332 कोटी  


वरळी ते वर्सोवा या २३ किमीच्या प्रवासासाठी अडीच तास लागतात. मात्र प्रकल्पामुळे समुद्रमार्गे सी लिंक तयार करून १५ मिनिटांतच वर्सोव्याला पोहोचता येईल. तो २०२३ पर्यंत पूर्ण होणार आहे.

वाशी खाडी पूल : 775 कोटी


वाशी खाडी पुलावरील वाढत्या वाहतुकीला पर्याय म्हणून या नव्या पुलाची योजना आहे. यामुळे मुंबई ते नवी मुंबई प्रवास सुखकारक होणार आहे. २०२१ मध्ये हा पूल पूर्ण करण्याची योजना आहे.आतापर्यंत मुख्यमंत्र्यांनी बदललेले निर्णय असे...

  • 1 ठाकरे यांनी पहिल्याच दिवशी मेट्रोच्या आरेतील कारशेडच्या कामाला स्थगिती देऊन फडणवीस यांनी सुरू केलेल्या प्रकल्पांचा आढावा घेण्याचे सूतोवाच केले होते.
  • 2 मेट्रो कारशेडसाठी आरेतील वृक्षतोडीस विरोध करणाऱ्या लोकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय.
  • 3 नाणारप्रकरणी आंदोलन करणाऱ्या लोकांवरील गुन्हेही मागे घेत असल्याचे नव्या सरकारने जाहीर केले. आरे-नाणार प्रकरणी गुन्हे मागे घेण्यासाठीही सरकारने समितीची स्थापना केली आहे.
  • 4 वित्तीय अनियमिततेमुळे सरकारने सारंगखेडा येथील चेतक महोत्सवासाठी गुजरातच्या लल्लूजी अँड सन्स कंपनीला दिलेले ३२१ कोटी रुपयांचे कंत्राट रद्द केले.
बातम्या आणखी आहेत...