आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'राजकारण' आहे म्हणून आपण सत्ताधीश आहोत!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

India does not merely have politics, but it is constituted by politics Sunil Khilnani त्यांना यथेच्छ खेळू द्या...  राजकीय नेते अत्यंत प्रतिभावान, बुद्धिमान, कणखर आणि लवचिक लोक असतात. राजकारण करणे हे येऱ्या-गबाळ्याचे काम नाही. ते प्रचंड ताकदीचे काम आहे. लोकांचे हित वगैरे मुद्दे महत्त्वाचे असतातच, पण 'सर सलामत तो पगडी पचास' याप्रमाणे स्वतःचे, पक्षाचे अस्तित्व टिकवणेही त्यासाठी महत्त्वाचे ठरत असते. भारतासारख्या महाकाय आणि गुंतागुंतीच्या देशात तर राजकारणाच्या रिंगणाला अनेकविध पदर असतात. त्यामुळे सरसकटीकरण करून राजकारणाविषयी ठोकळेबाज शेरेबाजी करता येत नाही. तशी करायचे ठरवले तर अगदी टिळकांपासून ते मंडेला-ओबामांपर्यंत सारेच तत्त्वशून्य कसे होते, हे सिद्ध करता येणे अवघड नाही. एकेका प्रसंगाचे वा निर्णयाचे सुलभीकरण करून ही 'प्रोसेस' समजत नाही. समग्रपणे या प्रक्रियेकडे पाहावे लागते. त्यासाठी ज्या व्यूहरचना, खेळी सुरू असतात, तो बुद्धिबळाचा डाव असतो. त्याकडे तुच्छतेने बघणे हा टिपिकल मध्यमवर्गीय ॲप्रोच आहे. नियम मोडला म्हणून पोलिसाने पकडल्यानंतर ज्यांचे सगळे नैतिक अवसान गळून पडते, अशा मध्यमवर्गीय माणसांना राजकारणी मात्र जंटलमन' हवा असतो. एका 'इन्क्रीमेंट'साठी नको तेही करायला जे तयार असतात, त्यांना नेत्यांनी मात्र निरलस, निरागस असावे, असे वाटत असते. निवडणुकांना संधी' मानणाऱ्या पत्रकारांना तर नेते धुतल्या तांदळासारखे हवे असतात. व्यापक अर्थाने लोकशाही मूल्ये मानणारे आणि भारतीयत्वाचा सर्वसमावेशक आशय समजणारे नेते असावेत, ही अपेक्षा स्वाभाविक आहे. त्याला नेमून दिलेले काम त्याने चोख करावे, ही तर केवळ अपेक्षा नाही; ते पाहणे हा आपला अधिकार आहे! राजकीय नेत्यांचा बहुतेक वेळ सार्वजनिक कारणांसाठीच खर्च होत असतो. पण, राजकीय खेळींकडे बघत नाक मुरडणे आणि तु्च्छतादर्शक उसासे टाकणे आपण सोडायला हवे. राजकारणाला बदनाम करण्याच्या कारस्थानापासून आपण तरी दूर राहायला हवे. राजकारणाच्या या बदनामीचा फायदा बदमाश घेतात किंवा हुकूमशाही प्रवृत्ती मग लोकशाहीची थट्टा आरंभतात. 'सब चोर हैं' अशा शब्दांत राजकारणाचे सुलभीकरण होत जाणे 'वन नेशन, वन पार्टी'चा घोष करणाऱ्यांच्या पथ्यावर पडते. त्यातून खरे चोर सहीसलामत सुटतात आणि राजकारणच आरोपीच्या पिंजऱ्यात येऊन सापडते. सांस्कृतिक राष्ट्रवादाचा आणि सरंजामी राजकारणाचा पुरस्कार करणाऱ्यांना असे अराजकीयीकरण हवे असते. मुद्दा होता राजकीय खेळींचा, ज्यामुळे आपण सध्या राजकारणाला बदनाम करतो आहोत! शिवसेनेचे महत्त्व संपवून टाकत स्वबळावर सत्तेत यायचे, ही देवेंद्रांची खेळी होती. मतदारांनी ती उधळल्यानंतर आता अवमानाचा बदला घ्यायचा, ही शिवसेनेची खेळी होती. या दोघांचे बिनसत असेलच, तर ही युती फुटावी आणि आपणही सत्तेच्या परिघात यावे, ही शरद पवारांची खेळी होती. शिवसेनेलाही जुमानायचे नाही आणि पवारांचा पक्ष फोडून आपण पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे, ही देवेंद्रांची पुढची खेळी होती. अजित पवारांना त्यांच्या पक्षाचा सर्वोच्च नेता व्हायचे असेल आणि तशी संधी त्यांना तिकडे भविष्यात दिसत नसेल, तर दोन तृतीयांश आमदारांना घेऊन पक्ष फोडायचा ही खेळी त्यांना सुचू शकते. या खेळींमध्ये गैर काही नाही. आपला मुद्दा एवढाच असायला हवा की यात फक्त राजकारण' असायला हवे. हवे तेवढे राजकारण असायला हवे. पण, याचे रूपांतर थेट गुन्हेगारीत अथवा लोकांच्या फसवणुकीत व्हायला नको. कोणी कोणाचा खून करणे, कोणाच्या खनपटीला पिस्तूल लावणे, ब्लॅकमेल करणे, लोकशाही संस्थांचा-न्यायालयाचा, जनादेशाचा गैरवापर करणे हे घडता कामा नये. राज्यपालांचा वापर करून रातोरात जे महाराष्ट्रात झाले, ते राजकारण नव्हे. विधिमंडळ पक्षनेता असल्याचा फायदा घेऊन अजित पवारांनी पक्षाला शब्दशः अंधारात ठेवले आणि खोटेनाटे दावे करून शपथविधी उरकला, हा क्राइम' आहे. स्वतःच्या बळावर जनमताचा कौल अजित पवारांनी मिळवला असता आणि त्यांच्या पाठीशी तेवढे आमदार असते, तर त्यांची तशी खेळी हा प्राप्त स्थितीत पराक्रमही ठरला असता! पण, उद्या अल्पमतात असूनही या ना त्या मार्गाने हे सरकार सत्तेत कायम राहिले, तर तो क्राइम' ठरेल. कोणता पक्ष सत्तेत यावा, हा मुद्दाच नाही. मुद्दा आहे तो राजकारणाचा. लोकशाही ही राजकारणाची पूर्वअट आहे. लोकशाहीचीच पायमल्ली होते, तेव्हा अशी कोणतीही खेळी हे राजकारण' ठरत नाही. ते कारस्थान असते. अशी कारस्थाने पेशवाईत, राजांच्या-सम्राटांच्या दरबारात कशी घडत असत, त्याला इतिहास साक्ष आहे. राजकारणात अशा कारस्थानांना थारा नाही. शपथविधी 'आटोपल्या'नंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे चेहरे पाहिलेत तुम्ही? सगळ्यांना अंधारात ठेवून एक कारस्थान केल्याची भावना होती दोघांच्या चेहऱ्यांवर! खूप सारी भीती, किंचित आनंद, काहीसे शल्य, बराच गिल्ट असे मिश्र भाव. दिवसाढवळ्याही या लोकांनी मस्त खेळी खेळाव्यात. चकवे द्यावेत. एकमेकांना कात्रजचे घाट दाखवावेत. आपण त्याला दाद देऊ. चिअर्स करू. अशा खेळी आपल्याकडे यशवंतराव चव्हाणांपासून सर्वांनी केल्यात. अगदी त्यापूर्वी पक्षसंघटनेच्या पातळीवर टिळकांनीही. गांधी काँग्रेसचे आणि देशाचे सर्वोच्च नेते ठरले, कारण ते 'थोर' होते, एवढेच पुरेसे नाही. तर, त्यांच्या राजकीय खेळी बिनतोड होत्या, हेही त्याचे कारण होते. नेहरू पंतप्रधान झाले, कारण अशा डावपेचांमध्येही ते अजिंक्य ठरले. हे मान्य करण्यात गैर काय? राजकारण हा शक्याशक्यतांचा खेळ असेल, तर अशा शक्यता आकाशातूनच पडतील, असे नाही. त्या असतील तर दिसाव्या लागतात. दिसत नसतील तर निर्माण कराव्या लागतात. शक्यता नसतीलच, तर नव्या वाटा शोधाव्या लागतात. संयमाचे बांध सांभाळावे लागतात. हे सारे राजकारण आहे आणि ते भारी आहे. संवैधानिक चौकट आहे, लोकशाही आहे, म्हणून तर हे राजकारण आहे. राजकारण जेवढे खुले होते, तेवढे प्लेअर्स वाढतात. तेवढ्या खेळी अधिक रंगतात. इथे शून्य जागा मिळवणाऱ्या 'वंचित बहुजन आघाडी'ला वा शेकापलाही स्पेस असते आणि एकमेव आमदार असलेल्या मनसेच्या नेत्यालाही वलय असते. साध्या घरातला पोरगा विद्यमान मंत्र्याचा पराभव करत असतो. या वेळची गंमत बघा. निकालानंतर राजकारणातल्या सगळ्याच्या सगळ्या पक्षांना सत्तास्थापनेची संधी आहे. असे यापूर्वी कधी पाहिले होते? 'वन नेशन, वन पार्टी, वन लीडर' असे एकध्रुवीय राजकारण करू पाहणाऱ्यांना ही केवढी चपराक आहे! मी परवा गमतीने म्हटलं : विधानसभा निवडणुकीत जागा मिळवूनही सध्या सत्तास्थापनेच्या कोणत्याही खेळीत नसलेला एकमेव पक्ष आहे - मनसे. 'मला विरोधी पक्ष म्हणून संधी द्या', हे राज यांचे आवाहन लोकांनी किती मनावर घेतले बघा! मुद्दा असा की, हे सारे राजकारण आहे. कोणत्याही हिटलरला 'राजकारण' कधीच नको असते. त्याला एकचालकानुवर्ती अराजकाची व्यवस्था हवी असते. आपण मात्र राजकारणाचे हे मोल ओळखायला हवे. लोकशाही ही आपल्याला सापडलेली किमान दोष आणि कमाल आशा असलेली राजकीय व्यवस्था असेल, तर आपला सामूहिक हस्तक्षेप वाढवत राजकारणाला अधिक आश्वासक रूप द्यावे लागेल. त्यापासून दूर पळता येणार नाही. राजकारणामुळे तुम्हाला आणि मला अवकाश मिळतो. मुख्य म्हणजे, कोणी कितीही तीर मारले, तरी शेवटी तुमच्याच भरवशावर कोणत्याही नेत्याला त्या रिंगणात जावे लागते आणि डाव आटोपल्यावर पुन्हा तुमच्याच चरणी यावे लागते. कारण, मतदारांचे राजकारण सर्वोच्च असते. यापैकी कोणी कितीही प्रतिभावंत वा बाहुबली असले तरी तुम्ही त्यांना ज्या जागा दिल्यात, त्याच चौकटीत त्यांना खेळावे लागत आहे. तेव्हा या खेळाचे खरे सूत्रधार तुम्ही आहात! सो लोक हो, यात घाणेरडं काही नाही. या सर्व खेळी एन्जॉय करा. आणि, क्राइम'ची शक्यता दिसली तर मात्र आवाज उठवा. खेळी करणारी ही तर फक्त प्यादी आहेत. खरे सत्ताधीश आपण आहोत. आम्ही भारताचे लोक! आपले राजकारण' सर्वोच्च आहे… राज्यपालांचा वापर करून रातोरात जे महाराष्ट्रात झाले, ते राजकारण नव्हे. विधिमंडळ पक्षनेता असल्याचा फायदा घेऊन अजित पवारांनी पक्षाला शब्दशः अंधारात ठेवले आणि खोटेनाटे दावे करून शपथविधी उरकला, हा क्राइम' आहे. स्वतःच्या बळावर जनमताचा कौल अजित पवारांनी मिळवला असता आणि त्यांच्या पाठीशी तेवढे आमदार असते, तर त्यांची तशी खेळी हा प्राप्त स्थितीत पराक्रमही ठरला असता!  

बातम्या आणखी आहेत...