आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'पक्ष सोडून जायला भाग पाडलं जातंय', मुंडेंच्या समाधिस्थळी एकनाथ खडसे भावुक, पक्षाला सुनावले खडे बोल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पंकजा मुंडेंना पाडायचं पाप का झालं? किती दिवस हे सहन करायचं : खडसे यांचा सवाल
  • 'मी मंत्री असताना मुंडेंच्या स्मारकासाठी दिलेल्या जागेत नंतर वीटही उभी करता आली नाही'

​​​​​​बीड : गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीदिनी झालेल्या गोपीनाथ गडावर सर्वाधिक चर्चेत राहिले ते भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे. त्यांनी आपल्या भाषणात मनातील खदखद बोलून दाखवत पंकजांचा पराभव घडवून आणला गेला, आपण पक्ष सोडून जावे, अशी स्थिती निर्माण केली जातेय. पक्षविरोधी बोलू नका, असे सांगत शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा दिला जातोय, असे सांगितले.

खडसे म्हणाले, गोपीनाथ मुंडेंंबरोबर ४०-४२ वर्षे काम केले, माझ्यासह अनेकांना त्यांनी ओळख दिली. जो संघर्ष मुंडेसाहेबांनी केला तो आज मला करावा लागत आहे. आज माझ्या सुख-दु:खात आधारस्तंभ नाही. मुंडेंची आठवण आल्यानंतर ओक्साबोक्शी रडावं वाटतं. कारण 'जिथे गोपीनाथ तिथे एकनाथ' असे समीकरण होते. पक्षविरोधी बोलू नका, असे सांगितले जाते, परंतु पक्षाचे आजचे चित्र महाराष्ट्राला मान्य नाही. पंकजांना हे बोलता येत नसेल, पण गोड बोलून समोरच्याला बळ दिलं जात आहे. दु:ख याचेच आहे की अनेकांना मोठं करणाऱ्या गोपीनाथ मुंडेंची मुलगी पराभूत झाली. मुंडे साहेबांनी पक्षसंघटनेत आयुष्य घातलं म्हणून तुम्ही मुख्यमंत्री, मंत्री आहात. पंकजा मुंडेंना पाडायचं पाप का झालं? किती दिवस हे सहन करायचं? ज्यांनी रक्ताचं पाणी करून पक्ष वाढवला अशा लोकांना आज पक्षात का गुदमरतंय? असं का होतंय? गोपीनाथ मुंडेंनी सांगितले म्हणून प्रदेशाध्यक्षपदासाठी मी देवेंद्र फडणवीस यांना समर्थन दिले, त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. मी काय गुन्हा केला, असे विचारूनही कुणी उत्तर देत नाही. पक्षात राहून न्याय दिला जात नाही. याचा अर्थ बाहेर जा, असाच होतो. पंकजांवर अशी वेेळ येऊ नये, अशी मी प्रार्थना करतो.

'नियोजनबद्ध' प्रयोगाला यश

पंकजा मुंडेंच्या पाठीशी सर्व जण आहेत. त्यांच्या पराभवाचा प्रयोग नियोजनबद्धरीत्या करण्यात आला. हा कट शिजला. विरोधी नेत्यांना बळ दिले गेले. हा प्रयोग आतापासून सुरू झालेला नाही. हे नियोजबद्धरीत्या करवले गेले. दुर्दैवाने त्याला यश आल्याचे खडसे म्हणाले.

कितीही त्रास दिला तरी पंकजा भाजपसोबत : महादेव जानकर

रासपचे महादेव जानकर म्हणाले, 'आमची नियत साफ आहे. भाजपने कितीही त्रास दिला तरी केवळ मला एनडीएमध्ये गोपीनाथ मुंडे यांनी आणले म्हणून आणि पंकजा मुंडे या भाजपत आहेत म्हणून मी भाजपसोबत आहे. मी भाजपचा नाही तर माझ्या पक्षाचा आहे. परळीकरांनी इतरांकडे बोट दाखवताना एक आपल्याकडे आहे हे विसरू नये. परळीकरांनो आपल्या नेत्या पंकजा मुंडे यांच्यामागे खंबीरपणे उभे राहा. पुन्हा भाजपला आम्हीच सत्तेत आणू शकतो. बारामतीच्या पालख्या वाहून आम्ही मोठे झालो नाहीत. वागणूक चांगली द्या, हीच विनंती आहे.

मुंडेसाहेब म्हणजे आमदार, खासदार घडवणारी फॅक्ट्री : लोणीकर

बबनराव लोणीकर म्हणाले, 'गोपीनाथ मुंडेंनी भाजप पक्ष जनसामान्यांत नेला. शेवटच्या घटकापर्यंत पक्ष विस्तार केला. जे कधी साधे सरपंच म्हणूनही निवडून येऊ शकले नसते अशा लोकांना मुंडे साहेबांनी आमदार, खासदार केले. मुंडे साहेब सभापती, आमदार, खासदार तयार करणारी फॅक्ट्रीच होते.'

चंद्रकांतदादांच्या भाषणाआधी कार्यकर्त्यांना दिली समज

गोपीनाथगडावरील कार्यक्रमात अतिउत्साही कार्यकर्त्यांनी व्यासपीठाजवळ उभे राहून हुल्लडबाजी आणि प्रत्येक वक्त्याला खाली बसून टाँटिंग केले. पंकजा यांनाही हे आवडले नाही. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील भाषणाला उभे राहण्यापूर्वी पंकजा यांनी स्वत: डायसवर येऊन प्रदेशाध्यक्ष हे पंतप्रधान, पक्षाध्यक्ष यांचे प्रतिनिधी असतात. त्यांचा सन्मान राखा. गोपीनाथ मुंडेंचा अपमान होणार नाही असे त्यांचे समर्थक असावेत, असे सांगत कार्यकर्त्यांना चांगल्या वागणुकीसाठी समज दिली.

माझ्याजवळ खूप काही, पण योग्य वेळी बोलेन....

माझ्याकडे बोलण्यासारखे खूप काही आहे, परंतु आता वेळ नाही. योग्य वेळी मी सगळे बोलेन, असा इशारा देताना त्यांनी पाच वर्षांच्या काळात गोपीनाथ मुंडेंच्या औरंगाबादेतील स्मारकासाठी मी मंत्री असताना दिलेल्या जागेत वीटही उभी करता आली नाही. परंतु, गुपचूप शपथविधीच्या नंतर पदभार स्वीकारल्यावर २५ नोव्हेंबर रोजी स्मारकाच्या कामाचे कार्यारंभ आदेश दिले गेले. मला हे माहिती नव्हते, मी उद्धवजींकडे गेलो, त्यांना विषय सांगताच त्यांनी मुंडेंच्या स्मारकास लागेल तितका निधी देऊ असे खडसे म्हणाले.

पंकजांसोबत आयुष्यभर राहणार : पाशा पटेल

भाजपचे ज्येष्ठ नेते पाशा पटेल म्हणाले, 'आतापर्यंत मी गोपीनाथ मुंडेंच्या सोबत काम केले. उर्वरित आयुष्य पंकजा मुंडे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करू. पंकज यांनी संघर्ष करावा, आम्ही त्यांना साथ देऊ. आज सर्व मंडळी पंकजा मुंडेंना हिंमत आणि ताकद देण्यासाठी आली आहे.'

पंकजांचा हा शेवटचा पराभव : हरिभाऊ बागडे

गोपीनाथ मुंडेंच्या सोबत मी अनेक वर्षे काम केले. त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंगांचा, राजकीय चढ-उतरांचा मी साक्षीदार आहे. मुंडे भगिनींची वाटचाल दूरपर्यंत आहे. त्या खचणार नाहीत. पंकजा मुंडे यांचा हा शेवटचा पराभव असेल.त्या पक्षाच्या कणखर नेत्या असून आपणही त्यांच्या पाठीशी राहावे.