आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपाकडे 119 आमदारांचे पाठबळ, महाराष्ट्रात आमचे सरकार स्थापन होईल- चंद्रकांत पाटील  

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- राज्यात सत्ता स्थापनेचा पेच अद्याप कायम आहे. भाजपच्या सत्ता स्थापन करण्यावर असमर्थाता दर्शवल्यानंतर आता शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत मिळून सत्ता स्थापन करणार असल्याचं जवळ-जवळ निश्चित आहे. यातच आता, "भाजपाकडे 14 अपक्षांसह 119 आमदारांचे पाठबळ आहे. त्यामुळे भाजपाच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन होईल," असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, "भाजपाच्या तीन बैठका पूर्ण झाल्या. काल निवडून आलेल्या आमदारांची बैठक झाली. आज दोन बैठका पार पडल्या. या बैठकांमध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीचं विश्लेषण आम्ही केले," असे पाटील म्हणाले. महाराष्ट्रात निकालाच्या दिवसापासून सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. शिवसेनेने अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मागितले. त्यानंतर दोन्ही पक्षांचं त्यावर एकमत झाले नाही. भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी असे काही ठरलंच नाही हे सांगितलं. तर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला खोटं ठरवलं जात असल्याने चर्चेची दारं बंद केल्याचं सांगितलं. त्यानंतर सर्वात मोठा पक्ष म्हणून राज्यपालांनी भाजपाला निमंत्रण दिलं. भाजपाने शिवसेना सोबत येत नाही म्हणून असमर्थता दर्शवली. त्यानंतर शिवसेनेला निमंत्रण देण्यात आलं, मात्र शिवसेनेलाही सत्ता स्थापनेचा दावा सिद्ध करता आला नाही. त्यानंतर राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली.

बातम्या आणखी आहेत...