आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमच्याकडे 170 वर आमदार; मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार! 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : भाजप-शिवसेनेतील सत्तास्थापनेच्या नाट्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. शिवसेनेची बाजू मांडणारे खासदार संजय राऊत यांनी 'मुख्यमंत्री शिवसेनेचाच हाेईल, आणि शपथविधी शिवतीर्थावर (शिवाजी पार्क) होईल,' असा दावा रविवारी पत्रकारांशी बाेलताना केला. शिवसेनेकडे सध्या १७० आमदारांचे पाठबळ आहे, ही संख्या १७५ पर्यंतही जाऊ शकेल, असेही त्यांनी ठासून सांगितले. दरम्यान, जास्तीत जास्त आमदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी भाजप सरकारी यंत्रणांचा व गुंडांचा वापर करत असून लवकरच त्याचा गाैप्यस्फाेट हाेईल, असा आराेपही राऊत यांनी केला.


विधानसभा निवडणुकीचा निकाल २४ अाॅक्टाेबर राेजी लागला. महाराष्ट्रातील जनतेने भाजप-शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत दिले, मात्र मंत्रिपद वाटपाचा तिढा सुटत नसल्याने निकालानंतर दहा दिवस उलटले तरी अद्याप राज्याला नवे सरकार मिळू शकलेले नाही. यासंदर्भात खासदार संजय राऊत म्हणाले की, 'शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कालपर्यंत १७० होती, ती १७५ पर्यंत जात आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा आहे. त्याप्रमाणे मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होईल. उद्धव ठाकरे अंतिम निर्णयापर्यंत पोहोचले आहेत. त्यासंदभार्तले गणित लवकरच माध्यमांसमोर मांडण्यात येईल.'


'भाजपचे अध्यक्ष तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे काळाची पावले ओळखणारे नेते आहेत. म्हणूनच त्यांनी परिस्थिती ओळखून लाेकसभा निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रात शिवसेनेसाेबत युती केली. राज्यातील सत्तेच्या वाटाघाटी त्यांच्यासमोर झाल्या होत्या. मात्र, सध्या अमित शहा यांचे मौन रहस्यमय झाले आहे. हरियाणासारख्या छोट्या राज्यातील तिढा सोडवण्यासाठी शहा यांनी पुढाकार घेतला आहे. ती गोष्ट महाराष्ट्रात का होत नाही?' असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.


दरम्यान, शिवसेनेचे ५४ आमदार निवडून आले असून काही अपक्ष व बंडखाेरांच्या पाठिंब्यावर सेनेचे संख्याबळ ६३ वर पोहोचले आहे. २८८ सदस्यांच्या सभागृहात बहुमत सिद्धतेसाठी १४५ सदस्यांच्या पाठिंब्याची आवश्यकता असते. तर १०५ आमदार निवडून आलेल्या भाजपचेही संख्याबळ अपक्षांच्या मदतीने १२० पर्यंत गेले आहे. मात्र १७५ आमदार आपल्याकडे असल्याचा दावा खासदार राऊत करत असल्याने काँग्रेस व राष्ट्रवादी हे पक्ष शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता असल्याची चर्चा रंगली आहे.

बाजारात तुरी... शिवसेनेत 'सीएम'पदासाठी स्पर्धा
मुख्यमंत्री कुणाचा...? हा तिढा अद्याप सुटलेला नसताना ठाण्यात मात्र शिवसेना नेते 'एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करा', अशा मागणीचे फलक झळकू लागले आहेत.

पवारांचे मार्गदर्शन आम्ही घेतले तर गैर काय : राऊत
१ ईडी, सीबीआयच्या मदतीने ज्यांनी सरकारे बनवली, ते त्यांच्यावर उलटले आहे. तुरुंगातून सुटलेले गुंड पदावर आहेत.
२ भाजपचे राजकारण गुंडांच्या टोळ्यांपेक्षाही घाणेरडे आहे. हे महाराष्ट्रात चालणार नाही. महाराष्ट्रात खोट्याचं राजकारण चालत नाही.
३ भाजपकडून दबाव आणला जात आहे. सत्तेच्या वाटपाच्या ज्या बातम्या माध्यमांत येत आहेत, त्या खोट्या आहेत. चर्चा फक्त मुख्यमंत्रिपदावरच होईल.
४ कर्नाटकातील येदियुरप्पा फॉर्म्युला महाराष्ट्रात चालणार नाही. सत्ता गेल्यानंतर आसपासची माकडे आणि कुत्रीही जवळ राहत नाहीत.
५ गुंडागर्दीचा वापर करून आमदारांवर दबाव येत आहे. पण, मंत्रालय आणि पोलिसांच्या बळावर राज्य करता येत नाही.
६ शरद पवारांचं मार्गदर्शन तर पंतप्रधान मोदीही घेतात. आताचा राजकीय पेच सोडवण्यासाठी आम्ही त्यांचं मार्गदर्शन घेतलं तर त्यात चुकीचं काय म्हणावं?

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवे सरकार त्वरित हवे : मुख्यमंत्री
अकोला : सरकार स्थापनेवरून भाजप-शिवसेनेत निर्माण झालेला तिढा लवकरच सुटेल. नवे सरकार त्वरेने स्थापन केले जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी अकाेल्यात व्यक्त केला. पावसामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सध्या काळजीवाहू सरकार आहे, मात्र या सरकारला मर्यादा असतात. त्यामुळे नवे सरकार त्वरित स्थापन होणे आवश्यक आहे. सर्वांनाच महाराष्ट्राच्या हितासाठी काम करायचे आहे. शेतकरी संकटात असल्याने त्यांच्या मदतीबाबतचा निर्णयही तातडीने घेणे गरजेचे आहे. त्यासाठी नवे सरकार लवकर स्थापन हाेण्याची गरज आहे,' असा पुनरुच्चार मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला.

पवार मुख्यमंत्रिपदापेक्षा माेठे
'शरद पवार मुख्यमंत्री होऊ शकतात का?' या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, 'शरद पवार राज्याच्या राजकारणात परत येणार नाहीत. पवार मुख्यमंत्रिपदापेक्षा मोठे आहेत.'

शिवसेना बाजार में बैठी है?
दोन राज्यपालपदे, केंद्रात दोन मंत्रिपदे दिल्यास शिवसेना भाजपबरोबर जाईल का, या प्रश्नावर राऊत म्हणाले, 'हा फाॅर्म्युला कुणी दिला? शिवसेना बाजार में बैठी है क्या?' असा सवाल करत मुख्यमंत्रिपद शिवसेनेला दिले तरच तोडगा निघेल,' असे त्यांनी सांगितले.

 

बातम्या आणखी आहेत...