आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आम्हाला फसवलं, पण आम्ही भाजपच्याच पाठीशी; रासपच्या महादेव जानकर यांचा पवित्रा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - वाट्याच्या २ जागी भाजपने ऐनवेळी उमेदवार दिल्याने नाराज राष्ट्रीय समाज पक्षाचे (रासप) नेते व मंत्री महादेव जानकरांनी बंडाचा पवित्रा घेतला. मात्र, दिवसभर कार्यकर्त्यांशी खल केल्यानंतर त्यांनी युतीतच राहण्याचा निर्णय घेतला. रासपने युतीकडून १० जागा मागितल्या होत्या. तसेच, त्या सर्व स्वत:च्या चिन्हावर लढवणार असल्याचे सांगितले होते. भाजपने त्यांना स्वचिन्हावर लढायचे असल्यास दोनच जागांची ऑफर दिली. जिंतुरात मेघना बोर्डीकर व दौंडमध्ये राहुल कुल हे उमेदवार रासपने दिले. मात्र, भाजपने दोघांनाही आपले एबी फाॅर्म दिले. त्यामुळे जानकर यांनी सोमवारी मुंबईत राज्य कार्यकारिणीची तातडीची बैठक बोलावली. भाजपकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा जानकरांना फोन आला आणि जानकर यांनी आपले बंड मागे घेतल्याचे जाहीर केले. त्यांनी भाजपच्या पाठीशी असल्याचे जाहीर केले. 

दोन्ही जागी कमळावरच...
१. सतरा वर्षांपूर्वी स्थापन रासपचे २०१४ मध्ये विधानसभेत एक आणि विधान परिषदेत १ असे दोन प्रतिनिधी पहिल्यांदाच प्रवेशकर्ते झाले होते.
२. रासपचे सध्याचे दौंडचे आमदार राहुल कुल यांना यावेळी भाजपने आपला एबी फाॅर्म दिला. त्यामुळे कुल जरी निवडून आले, तरी ते भाजपचे आमदार असतील. 
३. मेघना बोर्डीकर जिंकल्या तरी त्या भाजपच्या आमदार असतील. एकूण काय तर रासपच्या २ आमदारांची संख्या आता एकावर आली आहे.

जानकरांचे ग्रह फिरले
२०१४ च्या विधानसभेला व लोकसभेला धनगर समाजाचे नेते म्हणून रासप व महादेव जानकर यांना भाजपने डोक्यावर घेतले होते. मात्र, जानकर हे स्वचिन्हावर निवडणुका लढण्याबाबत आग्रही राहिले. शेवटी भाजपने गाेपीचंद पडळकर या सांगलीच्या फायर ब्रँड नेत्याला पुन्हा पक्षात घेतले आणि बारामतीतून तिकीट दिले. त्यामुळे जानकर यांची भाजपच्या गुड बुकमधून हद्दपारी झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...