आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावी पिढीसाठी आपल्याला बदलावेच लागेल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेतन भगत   प्रिय शिक्षक, २०२० मध्ये भारतात राहणाऱ्या आमच्या आजी-आजोबांच्या पिढीबाबत लिहिण्याचे काम दिल्याबद्दल धन्यवाद. हे खूप जुने वाटते. हे काम दिले नसते तर आपल्या चारी बाजूंना असलेल्या गोष्टींना कसे महत्त्व द्यायला हवे याची जाणीवच आम्हाला झाली नसती. आपण आज भारताला फार महत्त्व देत नाही. जवळपास प्रत्येकाकडे कार आणि घर आहे. लोकांना चांगली रुग्णालये, शाळा उपलब्ध आहेत. रस्ते चांगले आहेत आणि सार्वजनिक परिवहन सेवा खासगी कारपेक्षाही चांगली आहे. आपल्यापैकी प्रत्येकाचे उत्पन्न ६० हजार डाॅलर आहे.  हा निश्चितच आपल्या उत्पन्नाचा उच्च स्तर आहे, त्यामुळे बहुतांश भारतीय चांगले जीवन जगू शकतात. पण २०२० मध्ये आपले दरडोई उत्पन्न फक्त २००० डाॅलर होते हे माहीत आहे का? कदाचित आपल्या आई-वडिलांच्या काळात भारताने विकासावर लक्ष केंद्रित केले असावे. मात्र, आमच्या आजी-आजोबांच्या वेळी २०२० मध्ये असे झाले नाही. जेव्हा मी माझ्या या कार्यासाठी संशोधन केले तेव्हा ते खूपच जंगली माणसांसारखे होते असे मला जाणवले. २०२० मध्ये भारत अनेक दशकांतील सर्वात कमी विकास दराचा सामना करत होता का? नोकरी मिळणे कठीण होते. आॅटोपासून रिअल इस्टेट, बँका यांसारखे व्यवसायही संकटात होते. तोपर्यंत आपल्या आजी-आजोबांनी कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केले असावे, याचा थोडा अंदाज घ्या. हिंदू-मुस्लिम मुद्द्यावर. भारतात तेव्हा हिंदू आणि मुस्लिम परस्परांना पसंत करत नसत. राजकीय नेते त्याचा वापर लोकांमध्ये फूट पाडण्यासाठी, मते मिळवण्यासाठी करत असत. आता हे सर्व पूर्णपणे अवैध आहे. प्रत्यक्षात आज जे विभाजनाबाबत बोलतात त्यांच्याकडे आपण सामाजिकदृष्ट्या खूपच वाईट नजरेने पाहतो. आपल्याकडील कायदे ईश्वर आणि राष्ट्रवादाच्या नावावर हिंसा होऊ देत नाहीत. २०२० मध्ये तर ही बाब अगदी सामान्य होती. आपले आजी-आजोबा कमी उत्पन्न, खराब रस्ते आणि वाईट आरोग्य सेवांची पर्वा करत नसत. त्यांच्या प्राधान्यक्रमात हे मुद्दे सर्वात खालच्या स्थानी होते. मते देताना हा काही मुद्दा नसायचा. हा प्रकार किती मूर्खपणाचा असेल याचा विचार करा.  २०२० मध्ये दोन प्रमुख राजकीय पक्ष होते. त्यापैकी एक भाजप मजबूत होता आणि त्याच्याकडे मोठे बहुमतही होेते. तो सतत विजयी होत होता, त्यावरून लोकांना तो आवडत होता हे स्पष्ट होते. तो पक्ष धर्म आणि राष्ट्रवादाबद्दल बोलत असायचा तेव्हा लोकांना ते आवडत असे. त्याने खरोखरच आर्थिक सुधारणांचा प्रयत्न केला, लोकांना ते आवडले नाही. त्यांनी त्याला सूट-बुटाचे सरकार म्हटले. सूट-बुटाच्या सरकारमध्ये काय चूक आहे? आज आपल्याकडे आहे तसा सर्व भारतीयांकडे सूट-बूट असावा असे त्यांना वाटत नव्हते का? काँग्रेस हा दुसरा पक्ष सलग दोन निवडणुकांत पराभवाचा सामना करत होता. मात्र, तरीही तो पक्ष जराही बदलला नाही. देशाच्या पहिल्या पंतप्रधानांच्या मुलीच्या मुलाचा मुलगा त्यांचा पंतप्रधानपदाचा दावेदार होता. त्यामुळे लोकांना काय हवे या गोष्टीचा काहीही फरक त्यांना पडत नव्हता. २०२० मध्ये संपूर्ण जग कोरोना व्हायरसमुळे भयभीत होते. त्याचा सर्वाधिक फटका चीनला बसला. त्यामुळे संपूर्ण जगात मंदी आली आणि त्याचा भारतावरही परिणाम झाला. या व्हायरसनंतर जग उत्पादन क्षेत्रात चीनवरील आपले अवलंबित्व कमी करू इच्छित होते, भारत ही संधी घेऊ शकत होता. लोकांनी तेव्हा अर्थव्यवस्थेची खूप कमी चिंता केली. लोकांना दिवसभर हिंदू-मुस्लिम या मुद्द्यावरच चर्चा हवी होती. म्हणजे कोण चांगला आणि कोण वाईट होते? अर्थात दोघांतही चांगले लोकही होते आणि वाईटही, पण त्यांनी ते कधीच समजून घेतले नाही. मुस्लिम वाईट आहेत की हिंदू, हे इतिहासावरून सिद्ध करण्याची त्यांची इच्छा होती. प्राइम टाइममध्येही त्यावरच चर्चा होत होती. आपले आजी-आजोबा भूतकाळातून बाहेर निघू शकत नव्हते. अनेकदा दंगली होत होत्या, लोक मारले जात होते. ते गरीब लोक असत, त्यांची संख्या मोठी होती, त्यामुळे त्याला महत्त्व नव्हते. नंतर तेलाच्या किमती घसरल्या, व्हायरस पसरला आणि भारतीय व्यापाराला मोठा फटका बसला. आपण अर्थव्यवस्थेवर फोकस करायला हवा असे म्हणणाऱ्याला कमी महत्त्व दिले जात होते. दुर्दैवाने जीडीपीचा कुठलाही धर्म नव्हता. काही लोकांनी आरोग्य, विकास दर, रोजगार आणि शिक्षणासारख्या वास्तवदर्शी मुद्द्यांवर बोलण्याचा प्रयत्न केला. अर्थात, त्यांची संख्या खूप कमी होती. ते आज अस्तित्वात नसलेल्या ट्विटर या सोशल मीडिया अॅपचा वापर करत होते. ट्विटरवर लोक दिवसभर हिंदू-मुस्लिम मुद्द्यांवर चर्चा करत होते, त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.  अखेर एका क्षणी भारतीय जागे झाले ही ईश्वराचीच कृपा. हा सर्व मूर्खपणा आहे आणि त्यातून चांगले काहीही साध्य होणार नाही याची जाणीव त्यांना झाली. त्यांनी बदलण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कायदे तयार करून अशा मूर्खपणाच्या गोष्टी करणाऱ्या लोकांवर सामाजिक बहिष्कार टाकण्यास सुरुवात केली. त्यांनी फक्त विकासाचा निर्णय घेतला. हिंदू आणि मुस्लिम दोघांनीही आपल्या मुलांना शिक्षित करण्यासह त्यांना व्यापार, नेटवर्किंग शिकवण्यासोबतच संवाद क्षमता वाढवल्या. मतदारांनी नेत्यांचे फक्त कामगिरीच्या आधारावर मूल्यमापन केले. पुढील दोन दशकांत आपल्याला फक्त विकास करायचा आहे, असे ते म्हणाले. आज भारत श्रीमंत, कीर्तिवान आहे. आता होळी आणि दिवाळी जगभर प्रसिद्ध आहे, कारण भारतासारखा श्रीमंत देश ते सण साजरे करतो. २०२० मध्ये थँक्स गिव्हिंग आणि हॅलोविन यांसारखे अमेरिकी सण प्रसिद्ध होते तसेच. त्यामुळे हिंदू संस्कृतीचा विकास २०२० च्या तुलनेत चांगला झाला. भारत बदलला नसता तर आपल्या पिढीचे काय झाले असते याचा विचार मी करतोय. आपण आज २०७० मधील भारतात जन्म घेतला, २०२० च्या नव्हे यासाठी आपण खूपच सुदैवी आहोत.

बातम्या आणखी आहेत...