आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसने बंदी घातलेल्या संघटनांवरच आम्ही कारवाई केली : देवेंद्र फडणवीस

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

पुणे : 'शरद पवार केंद्रात मंत्री असलेल्या काँग्रेसच्या सरकारने ज्या संघटनांवर बंदी घातली हाेती, त्याच संघटनांवर आम्ही काेरेगाव भीमाप्रकरणी कारवाई केली,' असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साेमवारी पुण्यात सांगितले. पवारांनी दाेन दिवसांपूर्वीच फडणवीस सरकारने काेरेगाव भीमाप्रकरणी केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले हाेते. त्याला फडणवीस यांनी उत्तर दिले.

'कबीर कला मंच, सुधीर ढवळेसह इतरांना महाआघाडी सरकारच्या काळात अटक केली हाेती. अरुण परेरा, वंदन गोन्साल्विस यांना २००७ मध्ये अटक झाली हाेती. त्या वेळी गृहमंत्रालय राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते, तर १८ फेब्रुवारी २०१४ रोजी केंद्राने ज्या संघटनांवर बंदी घातली त्यात कबीर कला मंच, सुरेंद्र गडलिंगे, सुधा भारद्वाज यांच्या अध्यक्षतेखालील इंडियन असोसिएशन ऑफ पीपल्स लॉयर या संघटनांचा समावेश आहे. मग आमच्यावर जातीयवादाने कारवाई केल्याचा आराेप पवार कसा करतात?' असा प्रश्नही फडणवीस यांनी केला. कॅगच्या अहवालावरून आपल्या सरकारच्या काळात ६६ हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा केलेला आरोप हास्यास्पद आहे. लेखापरीक्षणाशी संबंधित हे प्रकरण असून त्यात तथ्य नाही, असेही ते म्हणाले.

तर ठाकरेंकडे गेलो असतो

'माझी स्वत: उद्धव ठाकरेंकडे जाण्याची तयारी आहे. मात्र 'भाजपचा नेता म्हणून येऊ नका' असे ते म्हणतात. मग आगंतुकासारखा मी जाऊ शकत नाही. कारण आमच्यामागे भाजपचे कार्यकर्ते व काेट्यवधी मतदार असतात. त्यांचा मान राखावा लागला. वैयक्तिक काम असते तर ठाकरेंकडे गेलो असतो. मात्र भाजपचा नेता म्हणून गेलो नाही, असे फडणवीस म्हणाले.

सातबारा काेरा केलाच नाही

अाम्ही ३४ हजार कोटींची कर्जमाफी केली. ११ लाख खाती बँकांनीच परत घेतली. त्यामुळे आमच्या काळातील कर्जमाफीचा आकडा ३४ हजार कोटींवरून २५ हजार कोटींवर आला. आम्ही आश्वासन न देता कर्जमाफी केली. त्यांनी (ठाकरेंनी) सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले, पण अंमलबजावणी केली नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

अमृता राजकारणात येणार नाहीत

'ठाकरे आडनावावरून कोणी ठाकरे होत नाही,' अशी उद्धव ठाकरेंवर टीका करणारे टि‌्वट अमृता फडणवीस यांनी केले हाेते. यावर त्या बऱ्याच ट्राेल झाल्या. याविषयी फडणवीस म्हणाले. 'अमृतांचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. राजकीय पक्ष त्यांना खालच्या स्तरावर ट्रोल करतात. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. मात्र त्या राजकारणात पदार्पण करणार नाहीत.'
 

बातम्या आणखी आहेत...