आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इतरांसाठीही जगूया!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देवदर्शन घेऊन अरुणाताईनी रिक्षाने एसटी स्टँड गाठले. गर्दी खूप असल्याने दर्शन मिळायला दीड तास लागला होता. त्यांच्या गुडघ्यात मधूनमधून कळ येत होती. स्टँडवर प्रचंड गर्दी होती. एखादी गाडी लागे व माणसांचा लोंढा तिकडे पळत जाई. खिडकीतून टोपी, टॉवेल, गमजा किंवा पेपर असे काहीही टाकून जागा आरक्षित केली जात होती. दरवाजाजवळ चेंगराचेंगरीत म्हातारी माणसे, कडेवर मुलं असणार्‍या स्त्रियांचे खूप हाल होत होते. गाडी तुडुंब भरून ओझे पेलवत निघून जाई. एकदाची अरुणाताईच्या गावाला जाणारी गाडी आली. परत तीच गर्दी, चेंगराचेंगरी, धक्काबुक्की. अरुणाताई गुडघा सावरत कशाबशा एसटीत चढल्या. मागच्या सीटवर टेकण्यासाठी जागा मिळाली. गुडघ्यातली वेदना खूपच वाढली होती. पाय हलवणेही शक्य नव्हते. कारण पायाशी बरेच सामान ठेवलेले होते. इतक्यात 20-25 वर्षांचा मुलगा गर्दीतून ओरडत ओरडत आला. त्याने अडवलेल्या जागेवर अरुणाताई बसल्या होत्या, म्हणून तणतणत होता. त्याची अखंड बडबड व टोमणे मारणे चालूच होते. मध्येच तो रागाने अरुणाताईकडे पाही. अरुणाताईना मेल्याहून मेल्यासारखे झाले. उठून त्याची जागा द्यावी म्हटले तर पाय बधिर झाले होते. उगीचच पडू कोणाच्या तरी अंगावर! म्हणून त्या गप्प बसल्या. असाच पाऊण तास गेला. अरुणाताईचे गाव आले. शेजारच्या मुलीने त्यांना काखेत हात घालून उठवले. त्या उठल्या आहेत हे पाहताच त्या मुलाने जवळजवळ त्यांना ढकलतच आपली जागा पकडली. अरुणाताईच्या डोळ्यात पाणी आले. किती धडपड माणसांची स्वत:साठी, अस्तित्वासाठी, हक्कासाठी! मी व माझे याभोवतीच्या रिंगणातच फिरावे का माणसाने? समाजातल्या इतर माणसांशी आपले किमान माणुसकीचे नाते आहे, याचे भान तरी ठेवायला नको का? स्वत:साठी जगता जगता थोडे तरी इतरांसाठी जगायला काय हरकत आहे? आजकालच्या जगात माणूस स्वार्थी होत चालला आहे. त्याचा दुसर्‍यांकडे बघण्याचा दृष्टिकोन संकुचित असतो.