Home | Maharashtra | Mumbai | we want VBA not NCP leaders demanded in Congress meeting; National Congress Party is 'B Team' of BJP

राष्ट्रवादी नकोच, वंचित चालेल! काँग्रेस बैठकीत पदाधिकाऱ्यांची मागणी; राष्ट्रवादी ही भाजपची ‘बी टीम’

विशेष प्रतिनिधी, | Update - Jun 08, 2019, 09:31 AM IST

मुख्यमंत्री काँग्रेस फोडत असल्याचा अशोक चव्हाण यांचा आरोप

 • we want VBA not NCP leaders demanded in Congress meeting; National Congress Party is 'B Team' of BJP

  मुंबई - लोकसभा निवडणुकीत आघाडी असतानाही अनेक मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्त्यांनी मदत न केल्यानेच काँग्रेसचा पराभव झाला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीशी आघाडी करण्याऐवजी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतल्यास चांगले यश मिळू शकेल, अशी मागणी आढावा बैठकीत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली. तसेच राष्ट्रवादी ही भाजपची ‘बी टीम’ असल्याचा आरोपही पदाधिकाऱ्यांनी केल्याचे समजते.


  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने शुक्रवारपासून जिल्हावार आढावा बैठका घेण्यास सुरुवात केली. टिळक भवनात मराठवाडा व खान्देशच्या पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांची प्रमुख उपस्थिती आणि सुशीलकुमार शिंदे, काँग्रेस कार्यसमिती सदस्य बाळासाहेब थोरात, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

  मुख्यमंत्री काँग्रेसच्या नेत्यांना फोन करताहेत : चव्हाण

  माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील हे आपल्यासोबत अनेक काँग्रेस आमदार भाजपमध्ये आणण्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले, काँग्रेस पक्षाचे आमदार फोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत अाहेत. इतकेच नव्हे तर ते आमच्या अनेक आमदारांना फोन करत आहेत. मात्र आता कोणीही पक्ष सोडेल, असे वाटत नसल्याचेही ते म्हणाले.

  बैठकीत अनेक विषयांवर पदाधिकाऱ्यांनी केला काथ्याकूट

  बैठकीमध्ये लोकसभा निवडणुकीचे निकाल, राज्यातील वर्तमान राजकीय परिस्थिती, दुष्काळ व इतर प्रश्न, त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली. बैठकीला उपस्थित सूत्रांनी माहिती देताना सांगितले की, बैठकीत सर्वच पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मदत करीत नसल्याचा आरोप केला आहे. तसेच राष्ट्रवादीसोबतच्या आघाडीबाबत विचार करावा, असेही म्हटले आहे. खर्गे आणि अन्य नेत्यांनी पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि यावर विचार केला जाईल असे सांगितले.

  भाजपने हुरळून जाण्याची गरज नाही
  अशोक चव्हाण म्हणाले, लोकसभेतील यशाने भाजपने हुरळून जाऊ नये. या सरकारवर लोक नाराज आहेत, ही वस्तुस्थिती आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे निकाल वेगवेगळे असू शकतात, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. विधानसभा निवडणुकीतही तेच दिसून येईल.

  विखेंचा फाजील आत्मविश्वास
  अहमदनगर जिल्ह्यात काँग्रेस आघाडी शिल्लक ठेवणार नाही, या राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना अशोक चव्हाण म्हणाले, लोकसभेचा एक विजय मिळाला म्हणून विखे पाटील यांनी फाजील आत्मविश्वास बाळगणे योग्य नाही.

Trending