आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचे संजय राऊत, भाजपचे चंद्रकांत पाटील यांचे स्वतंत्र दावे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : राज्यात येऊ घातलेल्या नव्या सरकारच्या फॉर्म्युल्याची तुम्ही चिंता करू नका. त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सक्षम असून कोणी काहीही केले तरी महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन होणार आहे, असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी पुन्हा व्यक्त केला.


संजय राऊत यांचा आज वाढदिवस होता. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसैनिकांची त्यांच्या भांडूप येथील घरी मोठी रिघ होती. रुग्णालयातून घरी परतल्यानंतर राऊत यांनी आज पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला.


राऊत पुढे म्हणाले, 'काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेच्या नेत्यांत चर्चा सुरू आहे. लवकरच त्याला अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. नवे सरकार किमान समान कार्यक्रमावर चालणार आहे. राज्याचे हित या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी असेल.' आमच्यासोबत जे जोडले गेले आहेत, ते अनेक वर्षे सत्तेत होते. त्यांना राज्य चालवण्याचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे राज्याचा कारभार सुरळीत चालवण्यात अडचण येणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. वेगळ्या विचारधारेचे पक्ष एकत्र येण्यासंदर्भातल्या प्रश्नावर राऊत म्हणाले, 'अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्येही भिन्न विचारधारांचे लोक एकत्र आले होते. त्यांनी देश चालवलाच. इतकेच काय, शरद पवारांनी महाराष्ट्रात पुरोगामी लोकशाही दलाचा (पुलोद) प्रयोग केला होता. त्या सरकारमध्ये जनसंघ सहभागी होता. अशी सरकारे देशात अनेकदा बनली आहेत. त्यामुळे आमच्या सरकारलाही अडचण येणार नाही,' असे त्यांनी सांगितले.

राऊतांमुळे मोदी-शिवसेनेत विसंवाद : शेलारांचे प्रत्युत्तर
भाजप नेते अॅड. आशिष शेलार यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत यांच्या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिले. 'भाजप अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समजण्यासाठी संजय राऊत यांना आणखी एक जन्म घ्यावा लागेल', असे अॅड. शेलार म्हणाले. तसेच राऊत यांच्यामुळेच मोदी आणि शिवसेनेत विसंवाद निर्माण झाला, असा आरोप त्यांनी केला. राऊत यांचे वय वाढले, परिपक्वताही वाढावी, अशी अपेक्षा असल्याचे अॅड. शेलार म्हणाले.

पक्षाचे १०५, सहयोगी मिळून आमच्याकडे ११९ आमदार

मुंबई : विधानसभा निवडणुकीत राज्यात भारतीय जनता पक्षच क्रमांक एकचा पक्ष ठरला असून, राज्यात भाजपशिवाय कोणीही सरकार बनवू शकत नाही, असे स्पष्ट करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यात होऊ घातलेल्या महाशिवआघाडीची (काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना) युती अनैसर्गिक असल्याचे सूतोवाच केले.


प्रदेश भाजपची बैठक मुंबईत शुक्रवारी पार पडली. बैठकीनंतर पाटील बोलत होते. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपच्या सर्व उमेदवारांना १ कोटी ४२ लाख मते मिळाली. पक्षाचे निवडून आलेले १०५ आमदार आणि इतर अपक्ष सहयोगी आमदारांसह भाजपचे संख्याबळ ११९ इतके आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाशिवाय राज्यात कोणीही सरकार बनवू शकत नाही.'


पाटील पुढे म्हणाले की, राज्यात भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक बांधणी उत्तम असून, आगामी काळात ही रचना अधिक मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.'


लोकसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राफेल खरेदी प्रकरणातून खोटे आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राहुल यांनी जनतेची माफी मागावी, यासाठी भाजप आंदोलन पुकारणार आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.


ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांत झालेल्या पावसामुळे ३२५ तालुक्यांत शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. भाजपचे लोकप्रतिनिधी, नेते व कार्यकर्त्यांनी गावोगाव जाऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशा सूचना विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित प्रदेश पदाधिकाऱ्यांना बैठकीत केल्या.

राज्यात स्थिर सरकारची गरज : देवेंद्र फडणवीस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश वेगाने पुढे जात आहे. त्याच दिशेने जाण्यासाठी महाराष्ट्राला स्थिर सरकारची गरज आहे. तसे सरकार नक्की स्थापन करू, असा विश्वास भाजप विधिमंडळ नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीचा समारोप करताना व्यक्त केला.
 

बातम्या आणखी आहेत...