आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राममंदिरासाठी पहिली वीट आम्हीच रचणार; उद्धव ठाकरे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘राममंदिर हा आमच्या श्रद्धेचा आणि अस्मितेचा प्रश्न असल्याने आम्ही तो सोडणार नाही. १९९० पासून प्रलंबित असलेला हा प्रश्न अधिक काळ रेंगाळत ठेवता कामा नये. राममंदिरासाठी किती थांबायचे, असा प्रश्न करीत अयोध्येत राममंदिरासाठी पहिली वीट लावण्याचं काम आम्हीच करू,’ असा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी व्यक्त केला. ‘मंदिराबाबतच निर्णय न्यायदेवतेने लवकर द्यावा. जर निर्णयाला उशीर लागत असेल तर केंद्र सरकारने विशेष कायदा तयार करावा. काश्मीर प्रश्नासाठी जसे धाडसी पाऊल उचलले, तसेच राममंदिरासाठी धाडसी पाऊल उचलावे,’ अशी मागणीही त्यांनी केली.

सोमवारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बेस्टच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसचा समावेश करण्यात आला. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मेट्रोसाठी आरेमध्ये होणाऱ्या वृक्षतोडीला विरोध असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट करीत उद्धव म्हणाले,  नाणार प्रकल्पाचाही असाच आग्रह धरण्यात आला होता. त्याचे काय झाले तुम्हाला माहीत आहे. जे नाणारचे झालं, तेच आरेचंही होणार, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘ओला-उबरमुळेच बेस्ट बसेसनाही फटका बसला आहे.. आज देशात मंदी असली तरी ती दीर्घकाळ टिकणार नाही. काळानुसार बेस्ट सेवेत सुधारणा करणे आवश्यक आहेत. त्या होत आहेत. असे असले तरी ‘बेस्ट’च्या एकाही कर्मचाऱ्याची नोकरी जाणार नसल्याचे त्यांनी 
स्पष्ट केले.
 

आम्हाला उदयनराजेंचा अपमान करायचा नव्हताच
उदयनराजेंबाबत उद्धव ठाकरे म्हणाले, ‘उदयनराजेंचा अपमान करण्याचा आमचा हेतू नव्हता. त्यांच्याकडून काही गोष्टींची अपेक्षा आहे. आपल्या माणसांकडून या अपेक्षा नाही करायच्या तर कोणाकडून करायच्या?’ असा प्रश्नही त्यांनी या वेळी केला. उमेदवारांच्या मुलाखतीबाबत ठाकरे म्हणाले,‘विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र कोणत्या जागांसाठी या मुलाखती आहेत, हे आताच सांगण्यात येणार नाही.’

बातम्या आणखी आहेत...