आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छत्रपतींनी फक्त आदेश द्यायचा असतो, हा मावळा तो नक्की पूर्ण करेल, साताऱ्यातील भाषणात मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातारा-  पुढच्या निवडणुकीचा निकाल लागलेलाच आहे. पुढे मैदानात उतरायला पैलवानच नाही. कोण तेल लावायलाही तयार नाही आणि आखाड्यात उतरायलाही तयार नाही. त्यामुळे ही संघर्ष यात्रा नाही, तर संवाद यात्रा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
छत्रपतींनी मागण्या करायच्या नाहीत, तर आदेश द्यायचा. त्यांच्या मागण्या हा मावळा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज साताऱ्यात दाखल झाली. शहरातून भव्य रॅली काढल्यानंतर सैनिक स्कूल मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, खासदार रणजितसिंह नाईक - निंबाळकर, संजय काकडे, आमदार बाळा भेगडे, कांताताई नलावडे आदी मान्यवर उपस्थित होते.


छत्रपतींच्या घराण्याकडून तुम्ही जितके घेतले, त्याच्या एक दशांश तरी त्यांना दिलेत का, असा खरमरीत सवाल करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर नामोल्लेख न करता हल्ला चढवला. छत्रपतींचे घराणे हे देणारे घराणे आहे, घेणारे नाही. तुम्ही त्यांना काही दिलेही नाही आणि त्यांनी कधी काही मागितलेही नाही. असे असताना त्यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे उत्तर महाराष्ट्रातील जनता तुम्हाला देईल, असे त्यांनी ठणकावले. दोन्ही महाराज कोणती अट टाकुन भाजपमध्ये आलेले नाहीत. एकही वैयक्तिक काम घेऊन ते आले नाहीत. तर लोकहिताच्या कामांसाठी आले आहेत, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. युती सरकारने पश्चिम महाराष्ट्रातील प्रकल्प केवळ मार्गी लावले नाहीत, तर पूर्ण निधी देऊन ते प्रकल्प आम्ही पूर्ण करत आहोत. सातारा जिल्हा दक्षिण हिंदुस्थानला पाणी देतो, मात्र जिल्ह्याचा काही भाग दुष्काळी आहे. तो भाग दुष्काळमुक्त करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
उदयनराजे व शिवेंद्रराजे यांच्या भाजप प्रवेशाने महाराष्ट्रात चैतन्य निर्माण झाले आहे. शिवाजी महाराज व शाहू महाराजांचा आशिर्वाद मिळाल्यामुळे भाजपचा अश्वमेध कोणी रोखू शकणार नाही, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. आता साताऱ्यात समर्थ विरोधी पक्ष उरलाच नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांना सत्काररूपाने देण्यात आलेली तलवार वर्षा बंगल्यावर ठेवावी लागणार असल्याचा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.
उदयनराजे भोसले यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादीवर तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपध्दतीवर मिश्किल शैलीत टीका केली. काँग्रेस - राष्ट्रवादीचे आघाडी सरकार सत्तेत असतानाही एक रूपयाचे काम झाले नाही. जी कामे झाली ती रेटून केली म्हणून झाली. प्रत्येक वेळी नळावरच्या भांडणासारखे भांडावे लागले. लोकांच्या हिताच्या कामाची फाईल घेऊन मंत्र्यांकडे गेलो, तर आमच्या नावावर तिथे फुलीच होती. आमची फाईल तिथे डस्टबिनमध्ये जायची. उलट युती सरकारच्या काळात विरोधी खासदार असुनही मुख्यमंत्री व गिरीष महाजन यांनी साताऱ्यासाठीची कोट्यवधीची कामे मार्गी लावली, असे त्यांनी सांगितले.
इव्हीएम मशिनबाबत आपण रान उठवले, त्याविषयी तुम्ही विचाराल. तर लोक कामाकडे बघून मतदान करतात. हे कामाला लावणारे लोक नाहीत, तर कामे मार्गी लावणारे लोक आहेत. सर्वांगिण विकास हा दृष्टीकोन ठेवून या सरकारने कामे केली आहेत. त्यामुळे इव्हीएमच्या मुद्याचे उत्तर मला मिळाले आहे, असे उदयनराजे म्हणाले. शिवेंद्रराजे संस्था वाचवण्यासाठी व मंत्रिपदाच्या तुकड्यासाठी भाजपमध्ये आले आहेत या होणाऱ्या टीकेला शिवेंद्रराजे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. ही शिकार करून खाणाऱ्याची औलाद आहे. तुकड्यावर जगणारी औलाद नाही हे टीका करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे. तुकड्यावर आमचे जमतही नाही आणि भागतही नाही. मुख्यमंत्री व चंद्रकांतदादा या ठिकाणी आहेत. आपण संस्थांसाठी आलो का हे त्यांनी सांगावे. माझ्या सर्व संस्था व्यवस्थित चालल्या आहेत. ताठ मानेने भाजपमध्ये आलो आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले. हा जिल्हा भाजपमय झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी कांताताई नलावडे, अशोक गायकवाड, अनिल देसाई यांचीही भाषणे झाली.मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यासाठी केलेल्या घोषणा
सातारच्या हद्दवाढीच्या फाईलवर उद्याच (सोमवारी) सही करून विषय निकाली काढणार. सातारच्या प्रस्तावित मेडिकल कॉलेजचे प्रवेश यावर्षी सुरू करणार. तीन वर्षात मेडिकल कॉलेजची अप्रतिम इमारत बांधणार. साताऱ्यातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी ५० कोटी देणार. अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

बातम्या आणखी आहेत...