अमरावती / 'प्रेम आणि प्रेम विवाह करणार नाही...', अमरावतीमधील महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी घेतली विचीत्र शपथ

  • हिंगणघाट घटनेतील पीडित तरुणीला श्रद्धांजली देत महाविद्यालयीन तरुणींनी घेतली शपथ

दिव्य मराठी वेब टीम

Feb 14,2020 06:01:03 PM IST

अमरावती- चांदूर रेल्वे येथील महिला महाविद्यालयातील तरुणींनी "प्रेम विवाह न करण्याची शपथ' घेतली. तालुक्यातील टेंभूर्णी येथे सुरू असलेल्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात प्रा. डॉ. प्रदीप दंदे यांनी विद्यार्थिनींना ही शपथ दिली. व्हॅलेंटाईन दिवसाच्या अनुषंगाने तरुणींनी घेतलेली शपथ चर्चेचा विषय ठरत आहे.


तरुण मुलींवर हत्या, अॅसिड हल्ले, अश्या सभोवताल घडणाऱ्या घटना लक्षात घेता प्रेमाची परिणती हत्तेत होत असेल, तर ते प्रेम कसले? त्यामुळे माझा माझ्या आईबाबावर विश्वास ठेवत महाविद्यालयीन मुलींनी प्रेम विवाह न करण्याची तसेच हुंडा घेणाऱ्या तरुणाशी लग्न न करण्याची शपथ घेतली. एवढेच नव्हे तर दोन पाऊल पुढे जात सध्याच्या रीतीरिवाजानुसार कुटुंबाने माझे लग्न हुंडा देवून लग्न लावले तर भावी पीढीतिल एक माता म्हणून माझ्या होणाऱ्या सुने कडून हुंडा घेणार नाही व मूलीसाठी हुंडा देणार नाही अशीही शपथ घेतली.

विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी द्वारा संचालित महिला कला वाणिज्य महाविद्यालय चांदुर रेल्वे या महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबीर ग्राम टेंभूर्णी येथे सुरू आहे. त्या शिबिरात 'युवकांपुढील आव्हाने' या विषयावर उद्बोधन सुरू असताना सत्राचे अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्रा. प्रदीप दंदे यांनी युवकांपुढे अनेक आव्हान असताना "मुलींवरील वाढते अत्याचार हे सुद्धा एक आवाहन आहे. असे सांगत एक घटना घडल्यावर दुसरी होणार नाही, असे वाटत असताना लगेच प्रेम प्रकरणाच्या अनेक घटना घडताना दिसून येतात. मुलींचा आपल्या आई बाबावर लग्न करून देणार नाही असा विश्वास नाही का? असा प्रश्न विद्यार्थिनींना केला. त्यातून ही शपथ देण्यात आली.

या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राजाभाऊ देशमुख महाविद्यालयाचे प्रा. डॉ. प्यारेलाल सूर्यवंशी, विशेष निमंत्रित म्हणून प्रसिद्ध साहित्यिक, समीक्षक, मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. अशोक पळवेकर, प्राचार्य राजेंद्र हावरे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. विजय कापसे, सहकार्यक्रम अधिकारी ग्रंथपाल मीना देशमुख, प्रा. सीमा जगताप, प्रा. संजीव भूयार जीवन शेळके, प्रा. नितिन अंभोरे, प्रा. लक्ष्मण सोलंके, प्रा. वैशाली देशमुख प्रा. कु. नेहा इंगळे उपस्थित होते. या वेळी शिबिरातील विद्यार्थिनी श्रेया वऱ्हेकर, भावना तायडे, मृणाल पाचखेडे, वैष्णवी गोखे, श्रेया जैन, अर्चना जैन, निशा नाईक, रूचिता रंगारी, पल्लवी सदबोरे, तेजस्वी बोबडे, भुवनेश्वरी देशमुख, अंकिता वानखडे, संगीता साउतकर या शिबिरार्थिनींनी आपले विचार व्यक्त केले.

X