आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रायगड प्राधिकरणाच्या कामातील भ्रष्टाचार निपटून काढू, खासदार संभाजीराजे, राजीनामा देऊ नका' : ठाकरेंचे आवाहन

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

मुंबई : कोल्हापूर संस्थानचे युवराज तथा राज्यसभा सदस्य संभाजीराजे छत्रपती यांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. रायगडावर प्राधिकरणामार्फत हाेत असलेल्या विकासकामांतील भ्रष्टाचार, सारथी संस्थेची स्वायत्तता आणि सर्वोच्च न्यायालयातील मराठा आरक्षणाचा लढा याबाबत त्यांनी सविस्तर चर्चा केली. 'रायगडाच्या कामात काही भ्रष्टाचार झाले असतील तर त्याची चाैकशी करू. तेथील विकासाबाबतही लवकरच बैठक लावून निर्णय करू, मात्र तुम्ही प्राधिकरणाचा राजीनामा देऊ नका,' अशी गळ मुख्यमंत्र्यांनी संभाजीराजे यांना घातली.

'रायगडचे काम हे आपल्याच नेतृत्वात झाले पाहिजे ही केवळ माझीच इच्छा नसून संपूर्ण महाराष्ट्रातील शिवभक्तांची मागणी आहे. तुम्ही मागील अनेक वर्षांपासून गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करत आहात. तुम्ही प्राधिकरणावर आहात म्हणून सर्व सुरळीत चालू आहे. तुम्हाला येणारी प्रत्येक अडचण सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. फक्त तुम्ही राजीनामा देऊ नका,' असे मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केल्याची माहिती संभाजीराजे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली.

'मराठा समाजातील तरुणांच्या मदतीसाठी राज्य सरकारने बार्टीच्या धर्तीवर नेमलेल्या 'सारथी' संस्थेच्या स्वायत्ततेसाठी बैठकीत मी आग्रही मागणी केली. सारथी संस्थेचा मराठा समाजातील हजारो युवकांना लाभ होत आहे. समाजातील येणाऱ्या अनेक पिढ्यांना घडवण्याचे कार्य या माध्यमातून होणार आहे. या संस्थेच्या स्वायत्ततेवर घाला येऊ देऊ नका,' अशी मागणीही आपण मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.

मराठा आरक्षणाच्या सर्वोच्च न्यायालयात असलेल्या लढ्यात पूर्वीच्याच वकिलांना ठेवण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. कुठल्याही परिस्थितीत आरक्षणाच्या लढ्यात कमतरता ठेवली जाणार नाही. पूर्वीपेक्षाही जास्त ताकदीने हा लढा लढू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे संभाजीराजे म्हणाले.

कंत्राटदारांची मनमानी

स्वराज्याची राजधानी राहिलेल्या तळकाेकणातील रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी केंद्राने ६०६ कोटी रुपये दिलेले आहेत. त्यासाठी रायगड प्राधिकरण स्थापन केलेले आहे. खासदार संभाजीराजे त्याचे अध्यक्ष आहेत. मात्र, दाेन वर्षांत गडावर एकही विकासकाम झालेले नाही. अधिकारी व कंत्राटदार मनमानी करत आहेत, असा त्यांचा मुख्य आक्षेप आहे. या तक्रारी संभाजीराजेंनी पुराव्यानिशी उद्धव ठाकरेंच्या कानी घातल्याचे सांगण्यात अाले.