बेकायदा स्थलांतरितांची विरोधी खासदारांच्या गावी रवानगी करू; ट्रम्प यांनी ट्विट करून मांडले मत, सँक्चुरी शहरात रवानगी करणेच योग्य

दिव्य मराठी

Apr 14,2019 11:23:00 AM IST

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदा स्थलांतरितांवर अजब तोडगा शोधून काढला. ट्विट करून शनिवारी त्याबद्दल माहिती दिली. यापुढे अशा लोकांची विरोधी पक्षाचे नेते राहत असलेल्या शहरांत रवानगी करणेच याेग्य ठरेल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अशा शहरांना सँक्चुरी सिटी असे संबोधले जाते. उत्तर अमेरिका, पश्चिम युरोपीय देशांत अशी काही शहरे आहेत. तेथील प्रशासन केंद्र सरकारच्या स्थलांतरित धोरणांना मुळीच जुमानत नाही.


ट्रम्प यांनी ट्विट करून या मुद्द्यावर कडक धोरणाचे संकेत दिले. सँक्चुरी शहरांत डेमोक्रॅटिक पार्टीचे बहुतांश सदस्य राहतात. ट्विट नंतर ट्रम्प यांनी प्रसार माध्यमांशीही संवाद साधला. ते म्हणाले, डेमोक्रॅटिक पार्टी नेहमी सरहद्दी सुरू करण्याचा आग्रह धरतात. म्हणून आमच्या या योजनेमुळे आता त्यांना जास्त आनंद होईल. तत्पूर्वी ट्रम्प यांनी होमलँड सेक्युरिटी विभागाला स्थलांतरितांना सँक्चुरी शहरांत पाठवण्याचे आदेश दिले होते, असे वृत्तही आले होते. परंतु गृह विभागाने त्यांच्या आदेशाचे पालन केले नव्हते. व्हाईट हाऊसने गतवर्षी नोव्हेंबर व या वर्षी फेब्रुवारीत मध्य अमेरिकेतून आलेल्या बेकायदा स्थलांतरितांना सँक्चुरी सिटीजला रवाना करावे, असे आदेश दिल्याचे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ ने देखील म्हटले होते. त्यावर निधीच्या तुटवड्याची समस्या असल्याची सबब पुढे केली होती. आता लोकप्रतिनिधी सभागृहाच्या सभापती नॅन्सी पॅलोसी यांनी निषेध केला आहे.

अमेरिकेच्या ५० मोठ्या शहरांचे महापौर डेमोक्रॅट

अमेरिकेची ५० मोठे शहरांपैकी ३३ मध्ये डेमोक्रॅटिक पार्टी व १४ मध्ये रिपब्लिकन पार्टीचे महापौर आहेत. तीन अपक्ष महापौर आहेत. या शहरांची लोकसंख्याे ५ कोटी आहे. एकूण लोकसंख्येपैकी हे प्रमाण १५ टक्के आहे. अमेरिकेच्या संसदेला काँग्रेस म्हटले जाते. दोन सभागृह आहेत. सिनेट व हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह. सिनेटमध्ये १०० सदस्य आहेत. रिपब्लिकनचे ५३, डेमोक्रॅटिक-४५ व अपक्ष २ सदस्य आहेत. लोकप्रतिनिधी सभागृहात ४३५ सदस्य आहेत. त्यात डेमोक्रॅटिक-२३५, रिपब्लिकन-१९७ तर ३ जागा रिक्त आहेत.

मेक्सिको : सीमेवरील दार तोडून ३५० जणांची घुसखोरी

ग्वाटेमाला, होंडुरास व सेल्वाडोरच्या ३५० लोकांनी शुक्रवारी रात्री सीमेवरील दार तोडून मेक्सिकोत प्रवेेश केला. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा संघर्ष उडाला. ग्वाटेमालामधून सुमारे २५०० लोकांनी रात्रीतून सीमा आेलांडली आहे. हा लोंढा मेक्सिको मार्गे अमेरिकेत घुसण्याच्या तयारीत आहे. बहुतांश घुसखोरांचा तपाचुला शहरात डेरा आहे. आठ दिवसांपूर्वीच स्थलांतरितांच्या लोंढ्यासाठी अमेरिकेत जागा नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते. ट्रम्प यांच्या विधानानंतर घुसखोरांचा पहिला जत्था अमेरिकेच्या दिशेने रवाना झाला.

न्यायालय : २७०० मुलांना आई-वडिलांकडे जाऊ द्या

अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को शहरातील न्यायालयाने २७०० मध्य अमेरिकी मुलांना त्यांच्या आई-वडिलांकडे परतण्यास परवानगी दिली आहे. या मुलांचे आई-वडील अमेरिकेत राहतात. सरकारने २०१७ मध्ये एका स्थलांतरित कार्यक्रमांतर्गत या मुलांना आई-वडिलांपासून वेगळे करण्यात आले होते. सरकारने हा नियम रद्द केला पाहिजे, असे न्यायालयाने बजावले. मुलांना आई-वडिलांसोबत राहू द्या. यातील बहुतांश वंचित मुले होंडुरस, अल-सेल्व्हाडोर, ग्वाटेमालाची आहेत. १२ मुले व त्यांच्या आई-वडिलांनी या प्रकरणात न्यायालयात याचिका दाखल केली होती.

X