आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठिसूळ वेदनेची ओली फांदी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळेला सुट्टी लागते आणि धूर ओकणारी आगगाडी आपल्याला मामाला गावाला घेऊन जाते. मामाच्या घरी रोज रोज मिळणारं केळीचं शिकरण... हे सारं मला दंतकथेसारखं वाटलं. इथं सुट्टी लागली म्हणजे जीव मुठीत धरुन हिरडीच्या झाडांवर चढायचं. एखाद्या फांदीला मोहळ असंल तर अंगावर घोंगड घेऊन ते मोहळ काढायचं. सुसाट वाऱ्यांत आपला तोल सांभाळत फांदी फांदीचा हिरडा झोडायचा. पुन्हा खाली उतरून तो हिरडा वेचायचा. डोक्यांवरून घरी वाहून न्यायचा. 
 
 
दिवाळीच्या सुट्टीतच मी ठरवलं होतं की, थंडगार हिरड्यांच्या सावलीत पुस्तक वाचता वाचता बिनघोर झोपायचं. अगदी अंधार पडल्यावर उठून घरी जायचं. आश्रमशाळेपासून लांब असलेली हिरड्यांची झाडं मी पाहून ठेवली होती. आश्रमशाळेच्या आसपास असलेल्या विहिरी आटण्याआधीच मुलांच्या वार्षिक परीक्षा झाल्या हे एक बरंच झालं. सुट्टी लागली आणि मुलं आपल्या पेट्या डोक्यांवर घेऊन आपल्या घरी पायी पायी निघाली. मुलांच्या अंगातले निळे गणवेश दूर जाईपर्यंत मला दिसत होते. मुलांनी गजबजलेली आश्रमशाळा काही क्षणातच सुन्न झाली. सगळं तापलेलं ऊन एकदम अंगावर यायला लागलं. तेव्हा मी थंडगार हिरड्यांच्या सावलीत पुस्तक वाचता वाचता बिनघोर झोपायला निघालो.
 
 
थंडगार हिरड्यांच्या सावलीत येण्याआधी माझ्या डोक्यांत बऱ्याच कल्पना होत्या. हिरड्यांखालची जागा साफसूफ करून निवांत बसायचं. थंड पाण्याची बाटली उशाला ठेवायची. एका मोठ्या हिरड्यांच्या झाडाखाली आलो आणि माझ्या डोक्यातल्या सगळ्या कल्पना कुणीतरी वेताच्या बांबूने झोडपून काढल्या. हिरडा झोडताना एक मुलगा शेंड्यांच्या फांदीवरुन खाली पडला होता. आईच्या मांडीवर डोकं ठेवलेला तो मुलगा काहीच बोलत नव्हता. कुणीतरी पळत जाऊन आणलेलं पाणी त्या मुलांच्या तोंडावर शिंपडलं तेव्हा तो मुलगा थोडासा शुद्धीत येऊन बोलायला लागला. त्या मुलांचा फुटलेला गुडघा आईने पुसून काढला. तो मुलगा झाडांच्या सावलीत तसाच बसून होता. डोळे पुसता त्या मुलांची आई हिरडा वेचत होती. 
 
 
घरापुढची नांगरुन ठेवलेली भातखाचरं पालापोचाळा जाळून भाजली जात होती. भाजलेलं भाताचं काळं खाचर आजूबाजूच्या शेतापेक्षा वेगळंच दिसायचं. इवल्याशा भात खाजरांत पोटापुरता भात पिकत होता. मीठ-मिरचीसाठी लागणारा पैसा हिरडा झोडून तो वाळवून विकल्यावर मिळायचा. झोडून गोळा केलेला हिरडा वाळवल्यांवर खूपच कमीच व्हायचा. ही वाळवलेली हिरड्यांची बाचकी एसटीतसुद्धा जागा नाहीये अशी कारणं सांगून घेतली जात नसायची. तेव्हा डोक्यांवर हिरडयाचं ओझं घेऊन बाजारात पायी निघालेली माणसं मला भेटायची. घनदाट हिरड्यांचे जंगल शोधत मी आत घुसलो तेव्हा माझ्या पुढे अनेक जखमी माणसांची फौज उभी राहिली. उंच झाडांवरचा हिरडा झोडताना नाकाचं हाड मोडलेली स्त्री मला भेटली. आपला मोडलेला हात गळ्यांत बांधलेला मुलगा मला म्हणाला, “मोडके हात बसवताना कसाही हात ओढतात. हात चोळताना मी तर बेशुद्धच पडलो होतो”. आयुष्यभर आपला वाकडा पाय घेऊन गुरं वळणारा एक गुराखी भेटला. हिरडयांची ठिसूळ फांदी मोडली आणि तो गुराखी खाली पडला. तीन ठिकाणी मोडलेला त्याचा पाय वाकडातिकडाच बसला होता. दवाखान्यांत जाऊन प्लॉस्टर करायला पैसे कोणाजवळ होते ?      

  
अंगणातल्या मेडीला धरुन बसलेले आजोबा मला म्हणाले, “अजून तर दहा दिवस सुद्धा झाले नाहीत. माझ्या जोडीदारांला हिरडीच्या झाडांवरुन पडून. जोडीदार झाडांवरुन पडला आणि जागीच गेला रे.” अंगाला मोहळ चावलेला एक मुलगा मला दिसला. हिरडा झोडताना चवताळून उठलेलं मोहळ त्या मुलाच्या अंगाला कडकडून चावलं होतं. हातपाय सुजलेला तो मुलगा वेदनेने तळमळत होता.  
 
 
आपले वडील हिरडा झोडत असताना आपल्या डोक्यावरल्या टोपीत हिरडा वेचणारा राम दाभाडे मला भेटला. कालपरवाच ज्या मुलांचे दुधाचे दात पडले होते. तो लहान मुलगा वडिलांनी झोडलेला हिरडा आपल्या डोक्यावरच्या टोपीत गोळा करुन एका जाग्यावर टाकत होता. रामची आई तर पाणी आणायला दूरच्या झऱ्यांवर गेली होती. एक हंडा भरायला तिला दोन-तीन तास लागायचे. ऊन असं तापायचं की, घरुन आणलेलं पाणी लगेच संपून जायचे. त्यामुळं राम आणि त्यांचे वडील तशीच तहान मारत हिरडा वेचत बसून राहायचे.   हिरड्यांच्या झाडांवरुन मला रामराम घालत रामचे वडील खाली उतरले. मी नको नको म्हणत असताना देखील ते मला चहा पिण्यांसाठी आपल्या घरी घेऊन गेले. चुलीतली राख उकरुन त्यांनी चूल पेटवली आणि माझ्यासाठी चहा ठेवला. अशा उन्हात तुम्हाला लिंबाचं  सरबत करायला हवा होता. पण आमच्या रानात लिंबं कुठे मिळायची. अशी खंत ते चहा करता करता व्यक्त करत होते. रामची आई हंडा कळशी घेऊन लांबच्या दरीतून वर येताना पाहून राम हातातली कळशी घ्यायला पुढे पळत गेला.  आपल्या घरी पाहुणे आले आहेत आणि आपण पाणी आणायला गेलो आहे. ही अपराधी भावना रामच्या आईने मला बोलून दाखवली तेव्हा मीच म्हणालो, “मावशी, मी उगीच तुमच्या कामात अडथळा आणला. हिरडीच्या झाडांखाली झोपून देखील मला पगार मिळतोय. आणि तुम्ही तर जीव धोक्यांत घालून हिरडा झोडता, वेचता एवढया लांबून पाणी आणता. आता मला पुन्हा हिरडीच्या झाडांखाली झोपण्यांची लाज वाटेल”.  चुलीवर शिजलेला  गाईच्या दूधाचा घट्ट चीक रामच्या आईनं मला दिला. चीक खाऊन झाल्यांवर रामच्या वडिलांनी मला जुन्या मधांची मोठी बाटली आणि मागच्या वर्षी वाळवून ठेवलेले बाळहिरडे मधासोबत कधी खोकला आला तर खाण्यासाठी दिले. शाळेला सुट्टी लागते आणि धूर ओकणारी आगगाडी मामाला गावाला घेऊन जाते... हे सारं मला दंतकथेसारखं वाटलं. इथं सुट्टी लागली म्हणजे जीव मुठीत धरुन हिरडीच्या झाडांवर चढायचं. एखाद्या फांदीला मोहळ असंल तर ते मोहळ अंगावर घोंगड घेऊन काढायचं. फांदी फांदीचा हिरडा झोडायचा. पुन्हा खाली उतरुन तो हिरडा वेचायचा. डोक्यांवरुन घरी वाहून न्यायचा. अखेर घरी येताना अंगणवाडीची मदतनीस मला भेटली. हिरडा झोडताना तिच्या पायाखालची फांदी मोडली तेव्हा ती वरच्या फांदीला लोंबकळून राहिली.. मी अंगणवाडीच्या मुलांना डोंगरातून सरपण आणून भात शिजवते. त्या मुलांना घास घास भरवते. त्यांची तोंडं पदरांने पुसते. सगळी मुलं घरोघर सोडल्यांवरच मी माझ्या घरी येते. यासाठी देवानं मला जिवंत ठेवलंय असं ती म्हणाली. मी देव मानत नसलो तरीही मला तेच खरं वाटलं.  

लेखकाचा संपर्क - ९५६१८९०४४४

बातम्या आणखी आहेत...