आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेब आधारित व्यवस्थापन प्रणालीने विद्यापीठ 'हायटेक'; संपूर्ण प्रशासन होणार ऑनलाइन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- वेब आधारित एकीकृत व्यवस्थापन प्रणालीच्या आधारे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ 'हायटेक' होणार आहे. परीक्षा, विद्यार्थी कल्याण, शारिरीक शिक्षण विभागासह विद्यापीठाचे संपूर्ण प्रशासन या प्रणालीमुळे 'ऑनलाइन' होणार आहे. विद्यार्थ्यांसह नागरिकांना या लाभ होणार असून डिजिटलायझेशनच्या पुढील टप्पास व्यवस्थापन परिषदेने मंजूरी दिली आहे. 


विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार उच्च शिक्षण देणारे विद्यापीठ तसेच संस्थांनी पूर्णपणे डिजिटल होणे आवश्यक आहे. या करिता युजीसीने सामान्य विकास अनुदानाच्या १२ व्या वित्त आयोगातून १३ कोटी ९९ लाख रुपये देण्याचे निश्चित केले आहे. यातील ७२ लाख रुपयांचे अनुदान आयसीटीकरिता मंजूर करण्यात आले. या अनुषंगाने वेब आधािरत एकीकृत व्यवस्थापन प्रणाली लागू करण्याबाबत विद्यापीठाने तयार केलेला प्रस्तावाला २७ ऑक्टोबर २०१६ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली होती. विद्यापीठाला डिजिटल करण्यासाठी एमएस डॉट कॉम या कंपनीसोबत १९ जानेवारी २०१७ रोजी करारनामा देखील करण्यात आला. 

 

करारनाम्या प्रमाणे कंपनीला विद्यापीठातील एकूण २८ माॅड्युल्स डिजिटल करायचे आहे. २८ पैकी १४ मॉड्युल्सचे डिजिटलयाझेशन २७ लाख रुपये खर्चुन कंपनीने केले आहे. तर, उर्वरित १४ मॉड्युल्स डिजिटल करण्याकरिता विद्यापीठात अनेक बैठका घेण्यात आल्या. अनेक बैठकानंतर उर्वरित १४ मॉड्युल्सचे डिजिटलायझेशन या कंपनीकडून ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले. शिवाय युजीसीकडून अनुदान मिळेपर्यंत या करिता विद्यापीठाच्या सामान्य फंडाचा निधी घेण्यास व्यवस्थापन परिषदेने मंजूरी दिली आहे. 


दरम्यान, निधीची अडचण येत असल्याने शिवाय सरकारकडून पर्याप्त अनुदान मिळत नसल्याने अद्याप अनेक विद्यापीठांचे डिजिटलायझेशनचे कार्य रखडले आहे. त्यात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा देखील समावेश आहे. वेब आधािरत एकीकृत व्यवस्थापन प्रणालीने विद्यापीठाला डिजीटल करण्याबाबत सरकारचे अनुदान टप्पा-टप्पाने मिळत असल्याने गत दहा वर्षांपासून विद्यापीठ देखील अत्यंत धिम्या गतीने डिजिटल होत असल्याचे चित्र आहे. डिजीटलायझेशन करिता दहा वर्षांपूर्वी वापरण्यात आलेले संगणक तसेच साहित्य सद्यस्थितीत कालबाह्य झाली आहे. नवीन विभाग डिजिटल करीत असताना जुने विभागाचे नुतनीकरण करण्याची जबाबदारी देखील विद्यापीठावर आली आहे. दहा वर्षांपूर्वी संगणकीकरणाने सुसज्ज करण्यात आलेल्या विभागांच्या नुतनीकरणाचा अतिरिक्त भार विद्यापीठावर आला आहे. मर्यादीत अनुदान प्राप्त होत असल्याने पुढील डिजिटलायझेशन करिता विद्यापीठाच्या सामान्य निधीतून घेण्याबाबतचा विषय व्यवस्थापन परिषदेत समोर चर्चेला आला होता. सामान्य निधीतून डिजिटलायझेशनची कामे पूर्ण करण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे. सरकारकडून निधी प्राप्त झाल्यानंतर संबंधित निधी सामान्य फंडात वळता करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. 


१४ मॉड्युल्स होणार डिजिटल 
विद्यापीठातील सर्वच विभाग डिजीटल म्हणजेच ऑनलाइन होणार आहे. परीक्षा, विद्यार्थी कल्याण, शारिरीक शिक्षण, वसतीगृह आदी संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन होत आहे. अशा प्रकारे उर्वरित १४ मॉड्युल्सचे कार्य पूर्ण करीत संपूर्ण विद्यापीठ डिजीटल केले जाणार आहे. 
- डॉ. अजय देशमुख, कुलसचिव संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ 


पेपरलेस विद्यापीठ 
विद्यापीठाचे संपूर्ण कामकाज ऑनलाइन करण्याच्या दृष्टिने व्यापक उपाययोजना केल्या जात आहे. भविष्यात कागदाचा वापर कमी करुन विविध अर्जांपासून संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन केल्या जाणार आहे. परीक्षा, प्रवेश, पुर्नमूल्यांकन, विविध योजनांचे अर्ज ऑनलाइन करण्यात आले आहे. उर्वरित मॉड्युल्समध्ये प्रशासकीय कामकाज ऑनलाइन केले जाणार असून, विद्यापीठाने पेपरलेसच्या दिशेने पाऊल टाकले आहे. 

बातम्या आणखी आहेत...