आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुमालावर छापली मुुलीची लग्न निमंत्रणपत्रिका, पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कंदर : विवाह हा दोन कुटुंबांचा सोहळा असतो. प्रत्येकाला तो थाटामाटात साजरा व्हावा, असे वाटते. लग्नसोहळ्यात काही जण सामाजिक उपक्रमांना प्राधान्य देतात. असाच अनोखा उपक्रम बिटरगाव (वां., ता. करमाळा) येथील उद्योजक शिवाजी नामदेव पाटील या वधुपित्याने राबवला. नेहमीप्रमाणे पत्रिका न छापता मोठ्या रुमालावर त्यांनी लग्नपत्रिका छापली आहे. त्यामुळे लग्नानंतर त्या रुमालाचा वापर संबंधितांना पुन्हा करता येणार आहे. यातून त्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे. पाटील यांनी राबवलेल्या उपक्रमाचे कंदर व परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

बिटरगाव (वां.) येथील शिवाजी नामदेव पाटील यांची मुलगी स्नेहल हिचा विवाह बेलवडी (ता. इंदापूर) येथील कांतीलाल वसंतराव जामदार यांचा मुलगा अक्षय यांच्याशी ठरलेला होता. लग्नतिथी ठरल्यावर लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी नेहमीप्रमाणे पत्रिका न छापता रुमालावर पत्रिका छापण्याचा निर्णय पाटील यांनी घेतला. घरातील सर्वच सदस्यांना याबाबत कल्पना दिली. घरातील सर्वांना ही संकल्पना आवडली. त्यानुसार त्यांनी कंदर येथील सूर्यकांत झिंगाडे यांच्याकडे अशी पत्रिका छापता येईल का, याची चौकशी केली. त्यानंतर २५०० रुमालांवर याची छपाई झिंगाडे यांनी करून दिली. यासाठी पाटील यांना प्रत्येकी २५ रुपये असा खर्च आला. त्यांच्यासाठी हा खर्च महत्त्वाचा नव्हता, तर लग्न निमंत्रणाबरोबरच समाजाला एक वेगळा आदर्श देण्याचा उद्देश मोठा होता. त्यानुसार लग्नाचे आमंत्रण सर्व पाहुणे, मित्रपरिवार यांना दिले. सर्वांनीच या उपक्रमाचे कौतुक केले आहे. असाच उपक्रमांची भविष्यात गरज असल्याची काहींनी प्रतिक्रिया दिली.

लग्नपत्रिकांद्वारे मुली वाचवा-मुली शिकवा, झाडे लावा-झाडे जगवा, प्लास्टिकचा वापर टाळा असे सामाजिक संदेश दिले जातात. विवाह सोहळ्यातून पर्यावरण संतुलनाचा वेगळा प्रयत्न शिवाजी पाटील यांनी केला आहे.

वधू-वराची केली हेलिकॉप्टरने पाठवणी

हौसेला मोल नाही म्हणतात त्याप्रमाणे शेतकरी कुटुंबातील शिवाजी नामदेव पाटील यांनी आपल्या मुलीला हेलिकॉप्टरमधून बेलवडीला (ता. इंदापूर) पाठवणी केली. यासाठी आवश्यक त्या सर्व परवानग्या काढलेल्या होत्या. हेलिकॉप्टर पाहण्यासाठी गर्दी झालेली होती. साडेअकरा वाजता हेलिकॉप्टर आले. अवघ्या दहा मिनिटांतच वधू स्नेहल व वर अक्षय व इतर दोघांना घेऊन हेलिकॉप्टर बेलवडीकडे मार्गस्थ झाले. मुलीलाही मुलाच्या बरोबरीने दर्जा दिला पाहिजे, असा संदेश पाटील यांनी यातून दिला आहे.
 

बातम्या आणखी आहेत...