धावत्या बसची स्टेपनी / धावत्या बसची स्टेपनी दुचाकीवर कोसळली; एक ठार, एक जखमी

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे धावत्या एसटी बसच्या टपावरील स्टेपनी डोक्यावर पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू

प्रतिनिधी

Mar 06,2019 11:03:00 AM IST

जळगाव - रस्त्यावरील खड्ड्यांमुळे धावत्या एसटी बसच्या टपावरील स्टेपनी डोक्यावर पडून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी दुपारी ४ वाजता करंज-सावखेडा खुर्ददरम्यान (ता. जळगाव) घडली.


अपघातात घनश्याम उमाकांत पाटील (३७) यांचा मृत्यू, तर तापीराम माधवराव पाटील (३६, दोघे रा.सावखेडा खुर्द, ता. जळगाव) गंभीर जखमी झाले. घनश्याम व तापीराम हे दोघे एकमेकांचे चुलत भाऊ आहेत. दोघे मंगळवारी दुचाकीने जळगावहून घरी परतत असताना करंज गावाजवळ समोरून येणाऱ्या एसटी बसच्या टपावर ठेवलेली स्टेपनी अचानक रस्त्यावर पडली. टायरमध्ये हवा असल्यामुळे स्टेपनीचा रस्त्यावर एक टप्पा, तर दुसरा टप्पा थेट घनश्याम व तापीराम यांच्या डोक्यावर पडला. यामुळे दोघांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. यात घनश्याम यांचा जागीच मृत्यू झाला, तर तापीराम गंभीर जखमी झाले.


घटनेनंतर बसचालक देविदास कोळी यांनी काही अंतरावर बस थांबवली. लागलीच दोघांना शासकीय रुग्णालयात आणले. तत्पूर्वी घनश्याम यांचा मृत्यू झाला हाेता. जखमी तापीराम यांच्या कपाळापासून ते डोक्याच्या मागच्या बाजूपर्यंत अशी २० सेंमीची जखम झाली आहे. कवटीचा बराच भाग फुटलेला असल्यामुळे त्यांच्यावर तत्काळ उपचार करण्यात आले. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बसचालक निलंबित
एसटी बसच्या टपावर ठेवलेली स्टेपनी खाली कोसळण्याची घटना घडत नाही. बसच्या प्रत्येक गोष्टीची काळजी घेणे चालक-वाहकाचे काम आहे. या प्रकरणात चालकाचा निष्काळजीपणा असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबंधित एसटी बसचे चालक देविदास सुका कोळी यांना तत्काळ सेवेतून निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती विभाग नियंत्रक राजेंद्र दवेरे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.


जखमी तापीराम यांच्यासोबत दुसऱ्यांदा घटना
तापीराम व घनश्याम या दोघांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. मृत घनश्याम यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील व दोन मुले असा परिवार आहे, तर जखमी तापीराम यांचा उजवा हात जळगावातील एका खासगी कंपनीत काम करत असाताना मशिनरीमध्ये अडकून कापला गेला अाहे. त्यामुळे त्यांना कामही सोडावे लागले. एकाच हाताने ते शेतीचे काम करत असतात. अाता पुन्हा त्यांच्यावर हा दुर्दैवी प्रसंग ओढवला.

X
COMMENT