Home | National | Other State | West Bengal government denies permission to BJP president Amit Shah's rath yatra

कलकत्ता हायकोर्टाने प. बंगालमध्ये भाजप अध्यक्ष शहांची रथयात्रा रोखली

वृत्तसंस्था | Update - Dec 07, 2018, 10:23 AM IST

स्थगिती: भाजप अध्यक्षांचा रथ 7 डिसेंबरपासून 24 जिल्ह्यांतून जाणार होता हायकोर्टाने म्हटले-रथयात्रा ज्या २४ जिल्ह्यांतून

 • West Bengal government denies permission to BJP president Amit Shah's rath yatra

  कोलकाता - कलकत्ता हायकोर्टाने गुरुवारी पश्चिम बंगालमध्ये भाजप अध्यक्ष अमित शहांची रथयात्रा काढण्यासाठी पक्षाला परवानगी नाकारली. शहांची यात्रा ७ डिसेंबरला कूचबिहारमधून सुरू होऊन बंगालच्या २४ जिल्ह्यांतून जाणार होती. हायकोर्टाने ९ जानेवारीला पुढील सुनावणी ठेवली आहे. तोपर्यंत भाजपला रथयात्रा काढण्यास बंदी घातली आहे.


  रथयात्रा काढण्यासाठी प्रशासनाने कुठलेही उत्तर न दिल्याने भाजपने बुधवारी कोर्टात याचिका दाखल केली होती. हायकोर्टाने म्हटले की, ज्या २४ जिल्ह्यांतून ही रथयात्रा काढणार आहे तेथील अहवाल आम्ही पाहू. राज्य सरकारने हायकोर्टाला सांगितले की, भाजपच्या प्रस्तावित रथयात्रेमुळे बंगालच्या जिल्ह्यांत जातीय तणाव निर्माण होऊ शकतो. दुसरीकडे भाजपने आम्ही शांततेने रथयात्रा काढू, असे न्यायालयाला सांगितले.

  हेतू : राज्यात ४० दिवसांत २९४ जागा कव्हर करण्याची भाजपची योजना होती
  शहा यांच्या रथयात्रेद्वारे ४० दिवसांत २९४ विधानसभा जागा कव्हर करण्याची भाजपची योजना होती. या यात्रेत तीन एसी बस असतील. कोर्टात सुनावणीआधी बंगाल भाजपचे अध्यक्ष दिलीप घोष म्हणाले होते की, लोकशाहीत प्रत्येक पक्षाला आपला कार्यक्रम करण्याचे स्वातंत्र्य आहे. हे कार्यक्रम रोखणे सरकारचे काम नाही. प्रशासनाने आम्हाला रोखले तरी आम्ही आमचा कार्यक्रम सुरूच ठेवू. यात्रा काढू आणि ती शेवटच्या स्थळापर्यंत जाईल.

  भाजपचा दावा : रथयात्रा परिवर्तनकारी ठरेल, तेथे ४२ पैकी २२ जागा जिंकू
  भाजपच्या दाव्यानुसार ही रथयात्रा बंगालच्या राजकारणात परिवर्तनकारी ठरेल. अमित शहांनी राज्यातील ४२ लोकसभा जागांपैकी २२ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या मोहिमेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, शहा यांच्याशिवाय राजनाथसिंहांसहित भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते आणि मुख्यमंत्री सहभागी होणार होते. तिकडे, भाजप सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय म्हणाले की, हायकोर्टाच्या निकालानुसार रथयात्रा स्थगित करण्यात आली आहे.

  भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या ताफ्यावर हल्ला
  भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या ताफ्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. हा हल्ला कूचबिहार जिल्ह्याच्या सिताई भागात झाला. तेथूनच अमित शहा शुक्रवारी रथयात्रा सुरू करणार होते. या कार्यक्रमाआधी दिलीप घोष त्याच यात्रेच्या प्रस्तावित मार्गाने जात होते. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. रस्त्याशेजारी उभे लोक पोलिसांच्या हजेरीत दिलीप घोष यांच्या वाहनावर हल्ला करत असल्याचे व्हिडिओत दिसते.

Trending