आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आरे’चे ‘नाणार’; ‘प्रियदर्शिनी’चे काय?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या सीमेवरील प्रस्तावित रिफायनरी म्हणजे नाणार. आशियातील सर्वात मोठी रिफायनरी. भारताच्या तीन प्रमुख ऑइल कंपन्यांचा एकत्र प्रकल्प. सुमारे ३ लाख कोटींची गुंतवणूक. १ लाख लोकांना रोजगार. कमी खर्चात इंधन... हे सरकारचे दावे. मात्र, १६ हजार एकर जमिनीचे संपादन, जागतिक बाजारपेठ असलेल्या आंब्याच्या झाडांवर कुऱ्हाड, पर्यावरणाची हानी. निसर्गसौंदर्याला बाधा. विस्थापन... यामुळे स्थानिकांचा, शिवसेनेचा विरोध.  आरे कॉलनीत ३० हेक्टर जागेत उभारला जाणारा प्रकल्प म्हणजे, मेट्रोसाठी कारशेड. शहरातील प्रदूषण, वाहतुकीचा खोळंबा दूर करण्यासाठी आवश्यक. जागा, आकार आणि स्थान या दृष्टीने हा भूभाग मेट्रो कारशेडसाठी सर्वात योग्य. १३०० पैकी फक्त ३० एकर जागेत उभारला जात असल्याने विरोध चुकीचा, हा मुंबई मेट्रोचा दावा. मात्र, पर्यायी जागा उपलब्ध, तब्बल २७०० झाडांचा बळी, वन्यप्राणी, पक्षी आणि एकूणच जैवविविधतेला, आदिवासी पाड्यांना, मिठीच्या प्रवाहाला धोका. यामुळे पर्यावरणप्रेमींचा आणि शिवसेनेचा विरोध. १७ एकर जागेवर घनदाट झाडी असलेल्या औरंगाबादेतील प्रियदर्शिनी उद्यानात प्रस्तावित स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृतिवन. ६४ कोटींमध्ये पुतळा, फूड पार्क, अॅम्फिथिएटर, म्युझियम, ओपन एअर एक्स्पीरियन्स, कारंजे उभारणार. कमीत कमी झाडे तोडणार. महापौर आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांचा दावा. मात्र पुतळ्यापेक्षा दुकाने आणि इतर बाबींना अधिक महत्त्व. भावनेची ढाल बनवून स्वार्थासाठी स्मृतिवन. टेंडरनुसार ४४३ (प्रत्यक्षात हजारावर) झाडांचा बळी, जैवविविधतेला धोका, अनेक पर्याय उपलब्ध. यामुळे पर्यावरणप्रेमींचा विरोध, पण शिवसेनेचे मात्र समर्थन. पर्यावरणाशी संबंधित ही तीन प्रकरणे आहेत.  मात्र, नाणार, मुंबईत वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या शिवसेनेने औरंगाबादेत झाडांच्या कत्तलीसाठी हातात कटर घेतले आहे. कोणतीही भूमिका घेतली म्हणजे घेतली, म्हणणाऱ्या बाळासाहेबांच्या विचारांविरोधी, शिवसेनेची ही परस्परविरोधी भूमिका आहे. खरं तर विकास आणि पर्यावरण हे परस्परविरोधी असल्याचा कायमच भास निर्माण केला जातो. पण माणसाच्या बदलत्या गरजा लक्षात घेता मूलभूत सोयी आणि भविष्यातील गरजा लक्षात घेता विकासाचे प्रकल्प, आवश्यक आहेतच. मात्र, आराखडा तयार करताना फक्त प्रकल्पाची किंमतच न काढता पर्यावरणाची किंमतही जोडली पाहिजे. पर्यावरणाची किंमत केली पाहिजे. ‘आरे’चे ‘नाणार’ होणार; पण प्रियदर्शिनीत वृक्षतोड करणार, ही भूमिका शिवसेनेला शोभत असली तरी ती सुसंगत नाही, हे उद्धव आणि मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आदित्य ठाकरे यांनी लक्षात घ्यावे. ‘आरे’ आणि ‘नाणार’ला एक न्याय आणि ‘प्रियदर्शिनी’ला दुसरा, हे चालणार नाही!