आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षांतर करणाऱ्यांना कोणता विकास हवा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांनी श्रीरामपुरात दिला गयारामांना टोला 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर : लोकशाहीत कुणी कुठेही जाऊ शकतो. जे गेले त्याबद्दल आता विचार करण्याची गरज नाही. दहा वर्षांपासून पक्षात असणाऱ्यांना राष्ट्रवादीमध्ये विकास वाटत होता. आता त्यांना सत्ताधारी पक्षांत विकास दिसतो आहे. त्यांना नेमका कोणत्या प्रकारचा विकास हवा आहे, असा सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी केला. 
माजी उपमुख्यमंत्री रामराव आदिक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी व रयत शिक्षण संस्थेच्या विद्या संकुलातील इमारतींचे उद्घाटन करण्यासाठी पवार येथे आले होते. पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणाले, देशात मोठ्या प्रमाणावर आर्थिक मंदी आहे. अनेक बड्या कंपन्यांनी कामगार कमी करण्याचे सत्र सुरू केले आहे. व्यावसायिक, उद्योजक, शेतकरी व कामगार वैतागले आहेत. बँकांनी उद्योगांना आधार देण्याची गरज आहे. वाढलेली बेरोजगारी, तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांना बगल देत जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, या वेळी जनता त्याला बळी पडणार नाही, असे पवार त्यांनी सांगितले. 
३७० कलमाबद्दल पवार म्हणाले, हे कलम रद्द केल्यानंतर देशात कुठेही विरोध झाला नाही. आता कुणालाही काश्मीरमध्ये जाऊन जमीन खरेदी करता येईल. परंतु पूर्वोत्तर राज्यांमध्ये आजही कुणीही जमीन खरेदी करू शकत नाही. तेथेही लक्ष देण्याची गरज आहे. राज्य सहकारी बँक घोटाळाप्रकरणी ते म्हणाले, कर्जवितरण प्रक्रियेत पदाधिकाऱ्यांचा फार मोठा वाटा नसतो. कागदपत्रे, मालमत्ता तारण बघून अधिकारी कर्ज मंजूर करतात. कर्जदारांकडून योग्य किमतीच्या मालमत्ता तारण घेतलेल्या आहेत. काहींचा लिलावही झाला आहे. त्यामुळे राज्य सहकारी बँकेला तोटा होईल असे वाटत नाही. 
लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जी भाषणे केली, त्याचा निश्चितच आम्हाला फायदा झाला. या निवडणुकीत त्यांची काय भूमिका आहे याबद्दल मी बोलणे उचित नाही. 

जनता त्यांना धडा शिकवेल.... 
शरद पवार म्हणाले, एकदा विधानसभेत साठ आमदारांचा मी विरोधी पक्षनेता होतो. काहीच दिवसांत त्यातील अनेक जण मला सोडून गेले, तरीही मी सहा आमदारांचा नेता म्हणून विधानसभेत राहिलो. पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीत मुख्यमंत्री झालो. त्यामुळे स्थित्यंतराला मी घाबरत नाही. सत्तेच्या बाहेर असले की अनेकांची अडचण होते. त्यामुळे ते पक्ष सोडतात. जनतेला हे आवडलेले दिसत नाही. जनता नक्कीच त्यांना धडा शिकवेल.