आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आम्ही असं काय केलं? ज्यामुळे आमच्यावर हे संकट ओढवलं; पीडितेच्या आईचा आर्त टाहो

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सरकारने याच पद्धतीने शिक्षा द्यावी, आईची मागणी
  • वडील म्हणाले, ६ महिन्यांपूर्वी समज दिली, पण आम्ही भ्रमात राहिलो...

नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात ‘दिव्य मराठी’ने  पीडितेच्या आईशी संवाद साधला. त्या वेळी हृदय पिळवटून टाकणारा मातेचा हा सवाल होता. आईच्या या भावना तिच्याच शब्दांत...
आम्ही असं काय केलं, ज्यामुळे आमच्यावर आज हे संकट ओढवल? माझ्या मुलीची अशी अवस्था करणाऱ्या नराधमाला अगदी याच पद्धतीने सरकारने शिक्षा द्यावी.  आज माझ्या मुलीवर हा प्रसंग ओढवला. उद्या तो सुटल्यास आणखी एखाद्या मुलीवर असा प्रसंग येऊ शकेल. अशा नराधमांना समाजात जगण्याचा अधिकारच नको. सरकारने त्याला याच पद्धतीने शिक्षा द्यावी. माझी मुलगी अतिशय हुशार आहे. तिने एमएस्सी केलं. अनुभव म्हणून नोकरी स्वीकारली. आता मुलींना सुरक्षित ठेवण्यासाठी आम्ही त्यांना काय घरातच ठेवावे?  तो मुलगा त्रास देत असल्याची तक्रार मुलीने काही महिन्यांपूर्वी केली होती. आम्ही त्याला समजावले देखील होते. त्यानंतर मुलीने आमच्याकडे कुठलीही तक्रार केली नव्हती. अगदी रोजच्या रोज आम्ही तिला याबाबत विचारून खात्री करून घेत होतो. आज सर्वच ठिकाणी मुली असुरक्षित आहेत. देशभरातून वाईट घटना कानावर येतात. सरकारने काहीतरी करावं.वडील म्हणाले, ६ महिन्यांपूर्वी समज दिली, पण आम्ही भ्रमात राहिलो...

विकी हा बसमध्ये पीडितेचा पाठलाग करीत होता. सहा महिन्यांपूर्वी पीडितेने वडिलांकडे तक्रार केली होती. त्यानंतर वडिलांनी विकीला समज दिली. तसेच यापुढे असा वागल्यास पोलिस तक्रार करण्याचा इशाराही दिला होता. त्यानंतर मुलीकडून कुठलीही तक्रार आली नाही. त्यामुळे आम्ही सर्व काही सुरळीत असल्याच्या भ्रमात होतो, अशा पश्चात्तापदग्ध  शब्दांत वडिलांनी नागपुरात ‘दिव्य मराठी’शी बोलताना भावनांना वाट मोकळी करून दिली.