आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांना गिफ्ट काय देता?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपूर्वीची गोष्ट. मैत्रिणीच्या मुलीचा वाढदिवस होता. तिने तिच्या ऑफिसमधल्या आणि अपार्टमेंटमधल्या काही मंडळींनाही बोलावलं होतं. कार्यक्रम मोठा होता म्हणून मला मदतीसाठी बोलावलं होतं. मी चार तास आधीच तिच्या घरी पोहोचले. आम्ही दोघींनी मिळून पार्टीची सगळी तयारी केली. हळूहळू मुलीचे मित्रमैत्रिणी आणि इतर सगळेही येऊ लागले. यथावकाश केक कापण्याचा कार्यक्रम झाला. भारतीय पद्धतीनुसार मुलीला औक्षण करून झालं. आवडीचा खाऊ खाण्यात बच्चे मंडळी दंग होऊन गेली. खाऊ खाल्ल्यानंतर मुलांसाठी आम्ही काही खास खेळ ठेवले होते. मुलांनी त्या खेळाचाही मनसोक्त आनंद लुटला. भरपूर धिंगामस्ती केली. रात्री जवळपास नऊ वाजेपर्यंत पोरं गोंधळ घालीत होती. नंतर सर्व जण आपापाल्या घरी निघून गेली. मैत्रिणीच्या मुलीचा उत्साह मात्र कमी झाला नव्हता. आम्ही  झोपण्याची तयारी करणार इतक्यात मुलगी आत जाऊन सर्व गिफ्ट्स घेऊन आली. उत्साहानं ती सगळे गिफ्ट्स उघडून दाखवत होती. दहा वर्षांच्या मुलीला शो पीस, फोटोफ्रेम, निसर्गचित्रं, कपल सेट अशा भेटवस्तू पाहून मी बुचकळ्यात पडले. ज्यांच्या वाढदिवसाला जातो आहोत त्यांचं वय, आवडनिवड लक्षात घेऊन भेटवस्तू देण्याचे साधे मॅनर्स का पाळले जात नसावेत?  असं विचार न करता भेटवस्तू दिल्यानं, वस्तू खरेदी करण्यासाठीचा पैसा वाया जातो आणि ज्याला भेटवस्तू दिलीय त्याला काही मिळाल्याचा आनंदही मिळत नाही. मुलांच्या वाढदिवसाला, छोट्या मुलांची पुस्तकं, खेळणी, क्रीडा साहित्य, मुलांच्या बौद्धिकतेला, कल्पकतेला वाव मिळेल अशा भेटवस्तू दिल्यास मुलांना आणि पालकांना त्याचा जास्त उपयोग होईल असं नाही वाटतं?