आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - भारताने अंतराळात संरक्षणासाठी अॅण्टी सॅटेलाइट मिसाइल तंत्रज्ञान मिळवले आहे. हे तंत्रज्ञान फक्त अमेरिका, रशिया आणि चीननंतर आता भारताकडे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बुधवारी देशाला संबोधित करताना सांगितले, की "वैज्ञानिकांनी लो अर्थ ऑर्बिटमध्ये 300 किमी अंतरावर असलेले फिरते सॅटेलाइट हाणून पाडले आहे. ऑपरेशन शक्ती अंतर्गत भारताने अॅण्टी सॅटेलाइट मिसाइलने अवघ्या 3 मिनिटांत ही मोहिम यशस्वीरित्या पार पाडली आहे."
एक्सपर्ट म्हणाले....
डीआरडीओचे चेअरमन जी. सतीश रेड्डी यांनी सांगितल्याप्रमाणे, आम्ही जगाला संदेश दिला की आम्ही सुद्धा सॅटेलाइट्सला काही सेंटीमीटर जवळ जाऊन पाडू शकतो. संरक्षण तज्ज्ञ कर्नल (सेवानिवृत्त) यूएस राठोड यांनी भास्कर प्लस अॅपशी संवाद साधताना म्हटले आहे, की युद्धाच्या परिस्थितीत हे मिसाइल तंत्रज्ञान शत्रू देशात ब्लॅक आउटची स्थिती निर्माण करू शकते. तर डीआरडीओचे माजी प्रमुख डॉ. व्ही.के. सारस्वत यांनी सांगितल्याप्रमाणे, शत्रू राष्ट्रांनी अंतराळात शस्त्रास्त्र तैनात केल्यास भारत त्यांचा सामना करण्यास पूर्णपणे सक्षम आहे.
भारताने केला अग्नी-5 मिसाइलचा वापर?
आतापर्यंत हे स्पष्ट झालेले नाही की भारताने जमीनीपासून 300 किमी दूर असलेल्या उपग्रहाला पाडण्यासाठी कोणत्या मिसाइलचा वापर केला. अॅण्टी सॅटेलाइट सिस्टिममध्ये बॅलिस्टिक मिसाइल अग्नी-5 चा वापर करण्यात आला अशी चर्चा आहे. अग्नी-5 मिसाइलची मारक क्षमता 5500 किमी पर्यंत आहे. याची स्पीड आवाजापेक्षा 24 पट अधिक आहे. भारताकडे स्वोर्डफिश कॅटेगरीचे लाँग रेंज रडार सुद्धा आहेत. हे 600 ते 800 किमीच्या रेंजमध्ये कुठलाही अडथळा डिटेक्ट करू शकतात. डीआरडीओ याची क्षमता वाढवून 1500 किमी करणार असे सांगितले जात होते. परंतु, त्यावर अधिकृत माहिती अद्याप जारी करण्यात आली नाही.
अमेरिकेने 1950 मध्ये केला पहिला प्रयोग
अॅण्टी सॅटेलाइट टेक्नोलॉजी अमेरिका-रशियात शीतयुद्ध काळापासून सुरू आहे. हे असे शस्त्र आहे, की ज्यांना प्रामुख्याने अंतराळात शत्रू देशांचे सॅटेलाइट नष्ट करण्यासाठी केले जाऊ शकते. अशा स्वरुपाच्या शस्त्रांना विकसित करण्याची सुरुवात सर्वप्रथम अमेरिकेने 1950 मध्ये केली होती. 1960 मध्ये रशियाने (तत्कालीन सोव्हिएत संघ) देखील यावर संशोधन सुरू केले. शीत युद्धात अमेरिका आणि रशियाने असेच आणखी काही शस्त्र बनवले. परंतु, त्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यात आले नाही. अमेरिकेत सद्यस्थितीला 80% कम्युनिकेशन आणि नेव्हिगेशन सिस्टिम सॅटेलाइटवर विसंबून आहे. अमेरिका याच उपग्रहांच्या माध्यमातून साऱ्या जगावर नजर ठेवून आहे.
12 वर्षांपासून होती भारताची नजर
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनने 2007 मध्ये सर्वप्रथम अॅण्टी सॅटेलाइट मिसाइलची चाचणी घेण्यास सुरुवात केली. त्याचवेळी तत्कालीन लष्करप्रमुख जनरल दीपक कपूर यांनी म्हटले होते, की चीन या दिशेने झपाट्याने काम करत आहे आणि भविष्यात अंतराळच खरी युद्धभूमी राहील. यानंतर 2012 मध्ये डीआरडीओचे तत्कालीन प्रमुख व्ही.के. सारस्वत यांनी म्हटले होते, की लो अर्थ ऑर्बिटमध्ये शत्रूंचे उपग्रह हाणून पाडण्यासाठी भारताकडे अॅण्टी सॅटेलाइट मिसाइल बनवण्याची पूर्ण तयारी आहे.
भारताला कागदी वाघ म्हणून जगाने केली होती थट्टा
2007 आणि 2012 मध्ये भारताने अशा तंत्रज्ञानावर काम करण्याची तयारी दाखवली तेव्हा जगभरात भारताची थट्टा उडवण्यात आली होती. लष्कर आणि अंतराळ तज्ञ असलेल्या व्हिक्टोरिया सॅमसन आणि स्पेस सेफ्टी मॅगझीनचे अभ्यासक मायकल जे. लिसनर भारताच्या क्षमतेवर आक्षेप घेणारे सर्वात मोठे टीकाकार होते. त्यांनी म्हटले होते, की भारत जगाला अॅण्टी सॅटेलाइट मिसाइलची चाचणी घेऊन दाखवत नसेल तर भारत एक कागदी वाघच ठरेल. परंतु, सर्वच टीकाकारांना तोंडावर पाडून भारताने 7 वर्षांच्या मेहनतीनंतर यशस्वी चाचणी घेतली. यामध्ये उडवण्यात आलेले सॅटेलाइट हे भारताचेच होते. ते एक मायक्रो सॅटेलाइट होते आणि इस्रोनेच 24 जानेवारी 2019 रोजी स्थापित केले होते.
युद्धाच्या परिस्थितीत काय होईल फायदा
ज्या देशांकडे ही टेक्नोलॉजी आहे, त्यांना युद्धाच्या परिस्थितीत अतिरिक्त फायदा मिळतो. अशा तंत्रज्ञानामुळे शत्रू देशांचे सॅटेलाइट निकामी किंवा नष्ट करता येतात. सॅटेलाइट काम करत नसेल तर शत्रू देशांच्या सैनिकांना हालचाली करण्यात आणि मिसाइल तसेच अण्वस्त्र तैनात करण्यात अडथळे येतात. भारताकडे आता हे तंत्रज्ञान आले आहे. अर्थातच भारताचे पाकिस्तान किंवा चीनसोबत युद्ध झाल्यास भारताचे हे सर्वात मोठे शस्त्र ठरेल. डीआरडीओचे माजी प्रमुख डॉ. सारस्वत यांनी सांगितल्याप्रमाणे, भारताचा हेतू अंतराळाचे लष्करीकरण करणे मुळीच नाही. परंतु, जग किंवा आमचे विरोधी राष्ट्र अंतराळात शस्त्र तैनात करत असतील तर भारताकडे त्यांचा सामना करण्याची ताकद आज आहे.
चीनने 2007 मध्ये केली होती चाचणी
अमेरिकेच्या ऑफिस ऑफ द डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजेंसच्या रिपोर्टनुसार, चीनने गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या ऑर्बिटमध्ये अशा अनेक चाचण्या घेतल्या आहेत. त्यातील सर्वात पहिली चाचणी 2007 चीनने केटी-1 रॉकेट लॉन्च करून घेतली होती. या रॉकेटने चीनचे हवामान उपग्रह फेंग युन 1-सी पृथ्वीपासून 800 किलोमिटर उंचीवर हाणून पाडले होते. या चाचणीत उपग्रहाचे जवळपास 3000 तुकडे झाले होते. असेही सांगितले, जाते की 2013 मध्ये चीनने अॅण्टी सॅटेलाइट मिसाइल डीएन-2 ची देखील चाचणी घेतली. या चाचणीनंतर अंतराळात वाहणारे चिनी उपग्रहाचे काही तुकडे रशियन सॅटेलाइटला जाऊन धडकले होते. त्यातही चीनचे अॅण्टी सॅटेलाइट मिसाइल एक उपग्रह उद्ध्वस्त करून 36 हजार किमी दूर दुसरे उपग्रह नष्ट करता-करता राहिले होते. अमेरिकेच्या नॅशनल इंटेलिजेंस रिपोर्टनुसार, चीनने आपल्या लष्करात अॅण्टी सॅटेलाइट मिसाइलचे विशेष युनिट तयार केले आहे. तसेच काउंटर स्पेस क्षमता विकसित करण्यासाठी ट्रेनिंग देण्यासही सुरुवात केली आहे.
लो अर्थ ऑर्बिट म्हणजे नेमके काय?
लो अर्थ ऑर्बिट अर्थात पृथ्वीच्या कक्षेतील जवळचा भाग होय. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 160 किमी ते 2,000 किमी यांच्यात येणारी उंची ही लो अर्थ ऑर्बिट मानली जाते. 2022 मध्ये भारताकडून जे तीन भारतीय अंतराळात पाठवले जाणार आहेत. ते याच लो अर्थ ऑर्बिटमध्ये राहतील. या प्रकल्पावर इस्रोने म्हटले होते, की केवळ 16 मिनिटांत तीन भारतीयांना श्रीहरिकोटा येथून अंतराळात पाठवले जाईल. तिन्ही भारतीय अंतराळात 'लो अर्थ ऑर्बिट' मध्ये 6 ते 7 दिवस राहतील.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.