आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसची पाकिस्तानसोबत काय केमिस्ट्री आहे : पंतप्रधान मोदी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोहाना/हिसार : पाकिस्तानसोबत असलेल्या केमिस्ट्रीमुळेच काँग्रेस काश्मीरचा भारताविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर वापर करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला आहे. शुक्रवारी सोनिपतमधील गोहानामध्ये निवडणूक प्रचार सभेत ते बोलत होते. या वेळी मोदींनी काँग्रेसवर टीकेचे झोड उठवली.

ते म्हणाले, काँग्रेसला भारताच्या एकोप्याची आणि संविधानाची काळजी नाही. यामुळेच जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द करणे त्यांना पचलेले नाही. कलम ३७० रद्द करण्याला सर्वात जास्त विरोध करणारी काँग्रेस आता हरियाणा सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानसोबत काँग्रेसची काय केमिस्ट्री आहे, असा सवाल मोदींनी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले, ५ ऑगस्टपासूनच काँग्रेस आणि त्यांच्यासोबत असणाऱ्यांच्या पोटात असे दुखणे उठले आहे की, त्यावर कुठल्याही औषधाचा परिणाम होत नाहीये. काँग्रेसचे हे दुखणे देशाने ओळखले आहे. कुणाची सहानुभूती कुणासाठी आहे, असा टोला मोदींनी लगावला.

मोदींनी एका व्हिडिओचा उल्लेख केला, ज्यामध्ये काँग्रेसचे नेते म्हणत आहेत की, १०-१५ जागांवर विजय मिळवला तरी पुरेसे आहे. मोदी म्हणाले की, सरकार खेळांमधून काका-पुतण्यावादाला हद्दपार करत असून, पात्रतेवर लक्ष केंद्रित करत आहे. तर काँग्रेसच्या गेल्या सरकारच्या वेळी घोटाळ्यांचे पीक घेण्यात येत होते. ते म्हणाले की, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आमच्या सैनिकांनी आणि खेळाडूंनी एेतिहासिक कामगिरी केली. परंतु यूपीएच्या काळामध्ये राष्ट्रकुल घोटाळा झाला. खेळाडू तेच आहेत, त्यांची पात्रता समान आहे, आम्ही परिस्थिती बदलली आहे.

हिसार : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी हरियाणात प्रचारसभा झाली. याप्रसंगी त्यांना हरियाणा प्रदेश शाखेच्या वतीने गौरवण्यात आले. सोबत पदाधिकारी व उमेदवार.


सोनियांची सभा रद्द, राहुल गांधींनी केले संबोधित


काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची हरियाणातील महेंद्रगडमध्ये शुक्रवारी होणारी सभा रद्द झाली. यामुळे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी जनतेला संबोधित केले. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीमधील सोनिया गांधींची ही एकमेव सभा होती. प्रकृती बिघडल्याने सोनियांनी ही रॅली रद्द केल्याचे सांगण्यात येत आहे. सोनियांच्या जागेवर घेतलेल्या सभेत राहुल म्हणाले की, शेतकरी, गरीब आणि मजुरांच्या खिशात पैसे टाकण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या आधी त्यांचा पक्ष न्याय योजना घेऊन आला होता. परंतु केंद्रात सत्ताप्राप्ती न झाल्याने देश आर्थिक मंदीच्या चिखलात फसलेला आहे. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस विजयी झाली असती, तर या योजनेला लागू करून गरीब, शेतकरी, मजुरांच्या बँक खात्यात योजनेचे पैसे जमा झाले असते. यामुळे भारतीय जनतेचे हाल झाले नसते. पुढे ते म्हणाले, २००४ ते २०१४ पर्यंत काँग्रेसच्या नेतृत्वात यूपीए सरकार होते. आणि त्या वेळी असलेल्या मनरेगा योजनेमुळे अर्थव्यवस्थेला गती मिळाली होती, तसेच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले होते.