Home | Maharashtra | Mumbai | What is the meaning of the meeting if EVM will be hacked; The question of Congress leaders

ईव्हीएम हॅकच हाेणार असेल तर बैठकांना काय अर्थ ; काँग्रेस नेत्यांचा सवाल

प्रतिनिधी, | Update - Jun 14, 2019, 10:33 AM IST

लाेकसभेला १ जागा मिळवणाऱ्या काँग्रेसला १४० आमदारांची आशा

  • What is the meaning of the meeting if EVM will be hacked; The question of Congress leaders
    मुंबईतील टिळक भवनात शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत खिन्न चेहरे करुन बसलेले काँग्रेसचे सर्व ज्येष्ठ नेते

    मुंबई - नुकत्याच झालेल्या लाेकसभा निवडणुकीत ४८ पैकी अवघ्या १ जागी यश मिळवणाऱ्या काँग्रेसला विधानसभेत मात्र आपल्या पक्षाचे १४० आमदार निवडून येतील, अशी आशा आहे. गुरुवारी झालेल्या आढावा बैठकीत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी असा दावा केला. विशेष म्हणजे काँग्रेसच्या सर्व पराभूत नेत्यांनी पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे खापर एकमताने ईव्हीएमवर फोडले.


    टिळक भवनात शुक्रवारी प्रदेश काँग्रेसची बैठक झाली. त्यात पश्चिम महाराष्ट्रातील तसेच लातूर जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीच्या अपयशाचा व आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा सखोल आढावा घेण्यात आला. धक्कादायक म्हणजे या बैठकीत हुसेन दलवाई हे ईव्हीएम हॅकरला घेऊन आले होते. ईव्हीएम मशीन कशा प्रकारे हॅक केले जाते, याचे चक्क प्रात्यक्षिक या बैठकीत दिले गेले. त्यावर अनेकांनी मग विधानसभेला याचीच पुनरावृत्ती होणार असेल तर बैठकांना काय अर्थ, असे सवालही केले. या बैठकीला प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आदी नेते उपस्थित होते.


    सतेज पाटील गैरहजर : संग्राम थोपटे या कट्टर पवार विरोधक नेत्याने राष्ट्रवादीशी विधानसभेला आघाडी नको, अशी भूमिका परत मांडली. काही नेत्यांनी वंचित आघाडी आपल्याबरोबर येणारच नाही. ते केवळ हूल देत आहेत. त्यांच्याशी चर्चा करून वेळ दवडून नका, अशी विनवणी केली. आमदार जयकुमार गोरे यांनी पक्षातील नेत्यांच्या चुकांवर बोट ठेवत बंडाचा झेंडा फडकवला. कोल्हापूरचे सतेज ऊर्फ बंटी पाटील बैठकीला अनुपस्थित होते. हे दोघे भाजपत जाणार असल्याच्या चर्चा आहेत.

Trending