आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजद्रोह कशाला म्हणतात ?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज टिळक जयंती. काँग्रेस पक्षाचे थोर नेते, महान देशभक्त, अतुलनीय स्वातंत्र्यसैनिक आणि निर्भयी संपादक बाळ गंगाधर टिळक आज केवळ आठवणींपुरते शिल्लक आहेत. वर्णाश्रमवादी, जातीयवादी, जीर्णमतवादी, हिंदुत्ववादी म्हणून त्यांची निंदा होते. जे हिंदुत्ववादी असतात ते त्यांना काँग्रेसवाले म्हणून झिडकारत राहतात. काँग्रेसबद्दल काय म्हणावे ? जो पक्ष आपला जाज्वल्य इतिहास विसरून जातो त्याला भविष्यात डोकावण्याची क्षमता उरत नाही. त्यामुळे आपण आपला टिळकांचा जन्मदिन एका प्रखर देशाभिमानी पत्रकाराचा जन्मदिन म्हणून साजरा करणे उचित! त्यानिमित्ताने वृत्तपत्र स्वातंत्र्याचीही उजळणी होईल.


टिळकांपासून देशाची राजकीय पत्रकारिता सुरू होते. राजकारण म्हणजे पक्ष, विचार, सरकार, अधिकार, स्वातंत्र्य, सेवा, कर्तव्ये आली. सत्ताधाऱ्यांनी जे करायचे तेवढेच राजकारण नसते. लोकांनीही ते करायचे असते. त्यासाठी वृत्तपत्रे लागतात. राजकारण व राजकीय हितसंबंध यांची चर्चा लोकांना समजावून देण्यासाठी करावी लागते. ५६ इंच छाती असलेला सत्ताधारी असेल तर ११२ इंच छातीचा पत्रकार लागतो. तोच घाबरट गणला जातो म्हटल्यावर संपलेच सारे! देशाच्या छाताडावर मग कोणीही बसते व देशाला हालचाल करू देत नाही. थोडक्यात, देशाचे स्वातंत्र्य हिरावले जाते.


सरकार आणि देश वेगळे असतात. सत्ताधारी मोठ्या लबाडीने आपले वर्णन राष्ट्र असे करीत असतात. त्यांच्यावर केलेली टीका सत्ताधारी शिताफीने देशाशी जोडून टाकतात. टीका करणाऱ्यांची फजिती केल्यासारखे हे झाले. उगाच कशाला वाद म्हणून अनेक टीकाकार गप्प राहतात. टिळक त्याबाबत काय म्हणतात ते पाहू :


‘इंडियन पीनल कोड कलम १२४ (अ) यांत राजद्रोही भाषण करणारास किंवा लेख लिहिणारास शिक्षा सांगितली आहे. सरकारचे बद्दल लोकांचे मनात ‘अप्रिती’ किंवा द्वेष उत्त्पन्न करणे यास ‘राजद्रोह’ म्हणतात; पण या कलमांत “अप्रिती’  आणि सरकारच्या कृत्याबद्दल ‘नापसंती’ या दोहोमध्ये भेद केलेला आहे; व त्याचा खुलासा असा केला आहे की, सरकारच्या कोणत्याही कृत्याबद्दल कोणीही आपली नापसंती कितीही कडक रितीने व्यक्त करण्यास हरकत नाही. मात्र अशी नापसंती अथवा अमान्यता प्रदर्शित करतांना जेणेकरून सरकारच्या कायदेशीर अधिकारांचे अतिक्रमण करण्याची किंवा सरकारची सत्ता नष्ट करण्याची लोकांमध्ये बुद्धी जागृत होणार नाही; असे शब्द वापरले पाहिजेत. या खुलाशावररून राजद्रोहाचा काय अर्थ करावयाचा हे बहुतेक स्पष्ट होते... या कलमात जो खुलासा दिला आहे. त्यामुळे आमच्या सरकारच्या हातून ज्या चुका व अन्याय होत आहेत ते स्पष्ट सरकारास कळवण्यास अथवा लोकांस समजून देण्यास अथवा त्यावर कडक टीका करण्यास आम्हास कोणच्याही प्रकारची हरकत दिसत नाही. अशी कडक टीका केल्याने इंग्रज सरकार परमेश्वराप्रमाणे निर्दोषी नाही असे लोकांस कळेल...पण पिनल कोडामधील कलम हल्ली आहे त्यापेक्षा संकुचित केल्याखेरीज वरील प्रकार राजद्रोही आहेत असे कोणासही म्हणता यावयाचे नाही.’


टिळकांच्या वेळी लोकशाही नव्हती. त्यामुळे सत्ताधारी पक्ष... विरोधी पक्ष अशी दुभागणी नसे. सरकारविषयी विरोधी पक्षांनी अप्रीती, नापसंती निर्माण केल्याशिवाय त्यांचे सरकार येईल कसे ? किंबहुना विद्यमान सरकार कसे लोकहितद्रोही अन् आत्मकेंद्री आहे हेच तर विरोधी पक्षांनी लोकांना समजावून सांगायचे असते. त्यांच्याप्रमाणे वृत्तपत्रे, टीकाकार, कलाकार, साहित्यिक, व्यंगचित्रकार आदींनी सांगितले तर त्यात गैर काय? टिळकांना स्वराज्य हवे होते आणि म्हणून ते गुलाम बनवणाऱ्या इंग्रज सरकारवर टीका करायचे. ती सहन होईना म्हणून इंग्रजांनी त्यांना खूपदा तुरुंगात टाकले. टिळकांनी अभिव्यक्ती केली ती स्वातंत्र्यासाठी. ते प्राप्त नसतानाही. केवढे धाडस त्यांनी केले. 


टिळकांनी पुढे म्हटले आहे, “सरकार किंवा सरकारी अधिकारी यांच्या वर्तनाबद्दल नाखुशी प्रदर्शित करणे हा हल्लीच्या कायद्याप्रमाणे राजद्रोह होत नाही. आमच्या राज्यकर्त्यांनी काही शहाणपणाचा मक्ता घेतलेला नाही. त्यांचे बळ व सामर्थ्य कितीही असले तरी पुष्कळ वेळा एखाद्या पोराप्रमाणे त्यांचे हातून चुका घडून त्यामुळे रयतेस त्रास सोसावा लागतो हे उघड आहे; व असा त्रास जोपर्यंत होत आहे तोपर्यंत त्यांचे चांगले निरुपण करुन लोकांस त्याबद्दल सरकारांत दाद मागण्यास सांगणे यात कोणत्याही प्रकारचे बेकायदेशीर काम होत नाही.’ (केसरी, २० जुलै १८९७) पाहा १२२ वर्षे लोटली, कायदा तोच आहे, सत्ताधारी तसाच विचार करतात. नाहीत फक्त टिळकांसारखे धीट संपादक! 

 

काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी जो जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यात १२४ (अ) कलम रद्द करण्याचे आश्वासन दिलेले होते. त्यावर भाजपने ‘बघा, हे देशद्रोहाला उत्तेजन देत आहेत,’ असा अपप्रचार केला. भाजपने मोदी सरकार म्हणजे देशाचे सरकार म्हणजे भारतच असा गैरप्रचार करून मते मिळवली. जे जे मोदी व त्यांच्या सरकारवर टीका करतात आणि त्यांच्या चुका शोधून काढतात त्यांना राष्ट्रदोही म्हणण्याचा आगाऊपणा अनेक भक्त करीत असतात. ज्यांच्या अनेक पिढ्या ब्रिटिशांचे लाभ घेण्यात गुंतलेल्या होत्या. त्यांना कलम १२४ (अ) काय असते हे कसे कळणार ?

बातम्या आणखी आहेत...