पक्षाकडून खडसेंवर अन्याय, / पक्षाकडून खडसेंवर अन्याय, तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे काय?

प्रतिनिधी

Nov 11,2018 10:22:00 AM IST

भुसावळ - भाजपने आमचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसेंवर अन्याय केला, तर आमच्यासारख्या सर्वसामान्यांचे काय, असा सवाल रावेर लोकसभा मतदारसंघातील खडसे समर्थकांनी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना केला. शनिवारी शहरातील आयएमए सभागृहात रावेर लोकसभा मतदारसंघातील बूथप्रमुख, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक आढावा बैठक झाली. या वेळी खडसेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशाचा मुद्दा पुन्हा उपस्थित करून कार्यकर्त्यांनी गदारोळ केला. यानंतर प्रदेशाध्यक्ष दानवेंनी केवळ चार वाक्यांचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करून बैठक आटोपती घेतली, तर प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी खडसेंच्या नावाने घोषणाबाजी करून शक्तिप्रदर्शन केले.


या वेळी प्रदेश संघटक सचिव विजय पुराणिक, माजी मंत्री एकनाथ खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, जिल्हाध्यक्ष उदय वाघ, आमदार संजय सावकारे, खासदार रक्षा खडसे, आमदार चैनसुख संचेती, माजी जिल्हाध्यक्ष अशोक कांडेलकर, भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे, जिल्हा संघटन सरचिटणीस प्रा. डाॅ. सुनील नेवे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीलाच प्रदेश संघटक सचिव विजय पुराणिक यांनी आयएमए हॉलचा मुख्य दरवाजा व खिडक्या बंद करण्याच्या सूचना दिल्या. उपस्थित पत्रकारांना बाहेर जाण्याची सूचना देण्यात आली. त्यानंतर संघटना, आगामी निवडणूक व पक्षाच्या कार्यपद्धतीवर सव्वा ते दीड तास बंदद्वार चर्चा झाली. मात्र, सभागृहातील घाेषणाबाजी व गदाराेळ बाहेरपर्यंत एेकू अाला. समारोपादरम्यान रावेर विधानसभा मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांनी खडसे यांचा मुद्दा मांडला.

आमचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर पक्षाकडून अन्याय होत आहे, तर आमच्यासारख्या सर्वसामान्य पदाधिकाऱ्यांचे काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. काही महिला पदाधिकाऱ्यांनीही या मुद्द्याला अनुसरून भूमिका मांडली. त्यावर दानवे यांनी केवळ चार ओळींचे मनाेगत मांडले.

पत्रकारांच्या प्रश्नावर दानवे भडकले

‘एकनाथ खडसे यांच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाबाबत अाम्ही काहीही सांगू शकत नाहीत. ते अामचे नेते अाहेत. परंतु, त्यांचा विषय पक्षाशी नव्हे तर न्यायालयाशी संबंधित असल्याने या विषयावर मी बाेलू शकत नाही’, असे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत खडसेंसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर सपशेल हात झटकले. ‘खडसेंचे मंत्रिपद अाणि न्यायालय यांचा काय संबध?’ असा प्रतिप्रश्न करणाऱ्या पत्रकारांवरही दानवे भडकले. ‘तुम्ही अाम्हाला पक्ष चालवण्याचे शिकवू नका’, असेही त्यांनी सुनावले.

X
COMMENT