Magazine / भटके विमुक्त साहित्य म्हणजे नेमकं कुठलं साहित्य?

दलित साहित्याने अखिल शोषित पीडित घटकांना आत्मभान दिले

प्रा. सुदाम राठोड

Sep 01,2019 12:01:00 AM IST

चार-पाच वर्षांपूर्वी पुण्यातून एका मुलीचा फोन आलेला. म्हणाली, ""सर, मला पीएचडीसाठी तुमची "मिसकॉल' कादंबरी पाहिजे. त्यावर कुठे काही परीक्षण लिहून आलेलं असेल तर तेही पाहिजे. मी तुम्हाला माझा पत्ता मेसेज करते त्यावर दोन्ही पाठवून द्या आणि त्यासोबत मी एक प्रश्नावली पाठवते तेवढी भरून द्या''. मी तिला पीएचडीचा विषय विचारला तर म्हणाली, ‘भटक्या विमुक्तांच्या कादंबऱ्या; एक चिकित्सक अभ्यास’. खरं तर "मिसकॉल' या कादंबरीत भटक्या विमुक्तांच्या जाणिवा नव्हत्या. "कोसला'च्या प्रभावातून लिहिलेली आणि विद्यापीठीय जगणं मांडू पाहणारी ती अर्धी कच्ची कादंबरी होती. मी म्हटलं, तुम्हाला पीएचडी नेमकी भटके विमुक्त जातीच्या लेखकांवर करायची आहे की भटक्या विमुक्त जाणिवेवर? या प्रश्नावर ती गोंधळली. हा गोंधळ तिच्या एकटीचा नाही, तर भटके विमुक्त साहित्यावर पीएचडी करणाऱ्या आणि झालेल्या तमाम विद्यावाचस्पत्यांचा हा घोळ आहे. बहुतांशी संशोधन हे कॉपीपेस्ट आणि एकसुरी वाटते. त्यामुळे भटक्या विमुक्तांच्या साहित्याचे योग्य संशोधन झाले नाही आणि त्याची सैद्धांतिक मांडणीही व्यवस्थित झाली नाही. म्हणूनच आज भटक्या विमुक्तांच्या साहित्याची चर्चा एमफिल पीएचडीच्या प्रबंधाबाहेर होताना आढळत नाही.

दलित साहित्याने अखिल शोषित पीडित घटकांना आत्मभान दिले. त्यांच्या अभिव्यक्तीला वाट करून दिली. नंतर साठोत्तरी काळात या घटकांनी स्वतःचे स्वतंत्र साहित्य प्रवाह विकसित केले. या पार्श्वभूमीवर भटक्या विमुक्ताचं साहित्य कुठे आहे? प्रवाहाचं साहित्य म्हणून त्याच्याकडे स्वतंत्रपणे पाहता येईल का? भटके विमुक्त साहित्य म्हणजे नेमकं कुठलं साहित्य? आज ज्याचा भटके विमुक्त साहित्य म्हणून निर्देश केला जातो ते खरोखरीच भटक्या जाणिवा व्यक्त करणारं साहित्य आहे काय? असे अनेक प्रश्न आहेत. त्याचे उत्तर शोधायचे असेल तर भारताच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय परिप्रेक्ष्यात असणारं भटक्या विमुक्तांचं स्थान लक्षात घ्यावं लागेल.

भारतीय समाजाच्या विशाल सांस्कृतिक पटावर भटक्या विमुक्तांच्या संस्कृतीचे बारीक सुटे सुटे संदर्भ शोधणे ही तशी गुंतागुंतीची गोष्ट आहे. त्याची दोन महत्त्वाची कारणे आहेत. एक म्हणजे भारताच्या बहुसंख्याकांच्या सांस्कृतिक कोलाजात छोट्या समूहांचा सांस्कृतिक आवाज एक तर विरून जातो किंवा दुसरे म्हणजे लिखित साहित्याची निर्मिती करण्याइतके अक्षरज्ञान नसल्याने त्यांच्या सांस्कृतिक खुणा रैखिक स्वरूपात नोंदवल्या जात नाहीत. मात्र या जमातींकडे मौखिक वाङ‌्मयाचे मोठे भांडार असल्याने तेच संशोधनाचे प्रमुख साधन आहे. लिखित साहित्य ही फारच अलीकडची गोष्ट आहे. त्या अनुषंगानेच काहीएक विधान करता येऊ शकेल. परंतु हे विधान सगळ्यांनाच लागू होईल असेही नाही. शासनाने भटके विमुक्त म्हणून उद‌‌्धृत केलेल्या जाती -जमातींमध्ये मोठा गोंधळ आहे. मुळात भटके विमुक्त ही संकल्पनाच एकरेषीय नाही. ज्या भटक्या जातींना ब्रिटिशांनी १८७१ च्या क्रिमिनल ट्राइब्ज अॅक्टनुसार जन्मजात गुन्हेगार ठरवले होते आणि १९५२ मध्ये भारत सरकारने त्यातून ज्यांची मुक्तता केली त्या जाती विमुक्त जाती म्हणून ओळखल्या जातात. तर ज्या भटक्या जमातींवर गुन्हेगारीचा शिक्का पडला नाही त्या भटक्या जमाती म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्रात ज्या जाती-जमाती भटक्या विमुक्त प्रवर्गात मोडतात त्या बाहेरच्या राज्यात अनु.जाती, अनु.जमाती, ओबीसी किंवा खुल्या या प्रवर्गात मोडतात. इतकेच नाही तर महाराष्ट्राच्या एका जिल्ह्यातील भटके दुसऱ्या जिल्ह्यात अनु.जमातीच्या प्रवर्गात मोडतात. तेव्हा त्यांच्या साहित्याचा अभ्यास करताना केवळ या प्रवर्गात आहेत म्हणून त्यांच्यात सांस्कृतिक साम्य आहे म्हणणे धाडसाचे ठरेल.

भारतात अशा अनेक छोट्या मोठ्या भटक्या जाती-जमाती असून प्रत्येकीची स्वत:ची एक स्वतंत्र संस्कृती आहे. त्यामुळे ‘उपरा’ तले अनुभव आणि ‘तांडा’तले अनुभव वेगळे वाटतात. ‘कोल्हाट्याचं पोर’ तर या दोहोंपेक्षा अत्यंत वेगळी अनुभवसृष्टी घेऊन अवतरते. याचाच अर्थ ते सांस्कृतिकदृष्ट्या एकत्र बांधले गेले नाहीत. परंतु राजकीयदृष्ट्या ते एकत्र बांधता आले असते. पण हळूहळू प्रत्येकाच्या जातीय अस्मिता टोकदार होऊ लागल्या. अखिल भारतीय गोर बंजारा साहित्य संमेलन वेगळं होऊ लागलं, तर वडारांचं साहित्य संमेलन वेगळं होऊ लागलं. अस्मिता आणि मूलतत्त्ववाद यातल्या रेषा धूसर होऊ लागल्या. नवबौद्ध किंवा इतर जातींचे ज्या वेगाने वैचारिक, सामाजिक प्रबोधन झाले त्या वेगाने भटक्यांचे झाले नाही. नागर संस्कृतीशी फटकून राहण्याची आणि परंपरेला चिकटून राहण्याची वृत्ती, त्यांचे छुप्या पद्धतीने झालेले हिंदुकरण, परिणामी जात उतरंडीत स्वतःची जागा शोधण्यात खर्च होणारी बौद्धिकी, लढाऊ विचारधारेच्या स्वजातीय प्रतीकांची वानवा, आंबेडकरवादाचा अस्वीकार अशा काही गोष्टींमुळे साहित्य निर्मितीसाठी जी पक्की आणि सुपीक भूमी असावी लागते तीच तयार झाली नाही. शिवाय ग्रामीण, दलित, देशीवादी साहित्यामागे जे संस्थात्मक आणि संख्यात्मक बळ उभे राहिले ते भटक्यांच्या मागे उभे राहिले नाही. ब्राह्मणी व्यवस्थेबरोबरच ते कृषी संस्कृती, गावसंस्कृतीतही उपरेच होते.

त्यांच्याकडे ना जमीन होती ना गावगाड्याच्या आतबाहेरची जागा. भटके हे मुळातच संख्येने कमी, त्यात लिहिणारे तर हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच! आज कुणी ग्रामीण देशीवादी जाणिवेचं साहित्य लिहीत असेल तर त्यामागे हजार संस्थात्मक हात उभे राहतात. दलित, स्त्रीवादी साहित्यानेदेखील स्वतःच्या अशा बऱ्याच संस्था विकसित केल्या आहेत. पण भटक्याच्या मागे कोण उभे राहणार? एक तर त्याला स्वतःला दलित घोषित करावं लागतं किंवा कुठल्या तरी ग्रामीण देशीवाद्यांच्या टोळीत सामील व्हावं लागतं. तसं झालं नाही, तर तो सगळीकडूनच उपेक्षित राहतो. अशा परिस्थितीत भटक्या विमुक्तांचा स्वतंत्र साहित्यप्रवाह उभं राहणं फार कठीण होतं. दलित साहित्याच्या आधाराने कुठेतरी सामाजिक आणि साहित्यिक चळवळ उभी राहत होती तर चळवळीच्या धुरीणांनी वैयक्तिक राजकीय लाभाच्या आणि श्रेयाच्या भांडणात अख्खी चळवळच खर्ची घातली. त्यामुळे चळवळीचं साहित्य म्हणून उदयाला येऊ पाहणारा भटक्या विमुक्तांचा साहित्यप्रवाह त्यांच्यासोबतच आटून गेला. आता निव्वळ विद्यापीठांमध्ये मायनर, मेजर प्रोजेक्ट किंवा एमफिल पीएचड्या मिळवण्यापुरता, जास्तीत जास्त चर्चासत्रात निबंध वाचण्यापुरताच हा विषय उरला आहे.

खरे तर हा प्रवाह प्रस्थापित करणं आणि तो प्रवाहित ठेवण्यासाठी पुढची पिढी तयार करणं ही भटक्या विमुक्तांच्या पहिल्या फळीतील साहित्यिकांची नैसर्गिक जबाबदारी होती. पण ती जबाबदारी त्यांनी पाळली नाही. उलट दलित साहित्यिकांच्या पंक्तीत बसून स्वतः प्रस्थापित झाले. शिवाय भटक्या विमुक्तांच्या साहित्याची पहिली नोंद दलित साहित्य म्हणूनच घेण्यात आली होती. त्यामुळे त्यांना साहित्यिक म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी विशेष कष्ट पडले नाहीत. दलित आत्मकथनाच्या लाटेत सगळं निभावून गेलं. पण पुढे काय? सहानुभूतीचा भर ओसरल्यानंतर आपली साहित्यिक गुणवत्ता सिद्ध करणे, तिचा विकास करणे गरजेचे होते. कारण आत्मकथनात वाङ‌्मयीन मूल्यांपेक्षा अनुभवाची दाहकता प्रभावी असते. पण हे दाहक अनुभव किती दिवस पुरणार? कुठल्याही दुःखाचं भांडवल फार काळ टिकत नाही. नंतर त्यात वारंवारिता येऊ लागते. करुणाही शेवटी दयाभावाकडेच घेऊन जाते. तेव्हा दु:ख आणि अनुभवाला सर्जनशीलतेची जोड नसेल तर मोठमोठे साहित्यिक एकेका पुस्तकात संपून गेलेले आपण पाहिलेत. आत्मकथने आणि काही प्रमाणात कविता वगळल्या तर कथा, कादंबरी, नाटक, ललित अशा विविध वाङ‌‌मयप्रकारात कितीसे लेखन झाले आहे? किंवा असे लेखन पुढे यावे म्हणून नवलेखकांसाठी कितीशा कार्यशाळा झाल्यात? भटक्या विमुक्तांची स्वतंत्र अशी किती साहित्य संमेलने झालीत? गुजरातेत दक्षिण छाराने सुरू केलेली ‘बुधन थिएटर’ सारखी एखादी नाट्यचळवळ इथे का उदयाला आली नाही? असे असंख्य प्रश्न उपस्थित होतात. निव्वळ प्रश्न उपस्थित करणे हा या लेखाचा हेतू नाही. पण आता कौतुकाचा काळ संपला आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. लहान मूल पहिल्यांदा बोबडं बोललं तरी कौतुक वाटतं. पण पाच-पंचवीस वर्षे उलटूनही ते बोबडंच बोलत असेल तर काहीतरी घोळ आहे असं समजायला हरकत नाही. आता भटक्या विमुक्तांच्या साहित्यात काहीतरी नवं आणि क्रिएटिव्ह होणं गरजेचं आहे. त्यासाठी अभिव्यक्तीच्या नवनव्या वाट धुंडाळल्या गेल्या पाहिजेत. आशय आणि रचनेच्या अनुषंगाने नवनवे प्रयोग झाले पाहिजेत. चांगलं साहित्य हे मातृभाषेतूनच जन्माला येतं. पण भटक्या विमुक्तांची मातृभाषा मराठी नाही. त्यांच्या स्वतंत्र बोली आहेत. त्या बोलींचा आणि मराठीचा काहीएक संबंध नाही. या बोलींचं जतन आणि संवर्धन करण्याची कुठलीही योजना सरकारी पातळीवर नाही. प्रमाणभाषा ही जेत्यांची भाषा असून ती पराजित समूहांवर लादलेली असते. मराठी ही भटक्यांवर लादली गेलेली भाषा आहे. त्यामुळे प्रमाण मराठीतून साहित्यनिर्मिती करण्यापेक्षा त्यांच्या त्यांच्या बोलीतून साहित्यनिर्मितीस चालना दिली तर त्या साहित्याचं मूल्य नक्कीच वाढेल. नंतर ते हवं असेल तर ते साहित्य मराठीत अनुवादित करता येईल. नव लेखकांच्या कार्यशाळा घेऊन जगभराच्या साहित्यात नेमके काय सुरू आहे, कुठल्या प्रकारचे साहित्य निर्माण होत आहे याची माहिती देणे, प्रयोगशील लेखनाला चालना देणे, ते वाङ‌‌्मयीन गुणवत्ता असणाऱ्या माध्यमातून प्रसिद्ध करणे, त्यावर चर्चा घडवून आणणे, चांगल्या लिहिणाऱ्या लेखकांच्या मागे संस्थात्मक पाठबळ उभं करून त्यांना प्रोत्साहन देणे अशा बाबीतून चांगलं काहीतरी हाती लागेल अशी अशा वाटते. आता समाजमाध्यमोत्तर काळात संपूर्ण साहित्यव्यवहारच बदलून गेला आहे. या समाजमाध्यमांनी साहित्यावरची अभिजनांची मक्तेदारी संपुष्टात आणली आहे. केवळ साहित्यच नाही, तर भटक्यांकडे असणाऱ्या विविध कलांना गुणांना अभिव्यक्तीची दारं खुली झाली आहेत. ही खरे तर भटक्या विमुक्त लेखकांना, कलावंतांना मोठी संधी आहे. पण त्यासोबतच काळाची आव्हानेदेखील ओळखता आली पाहिजेत. याच समाजमाध्यमांमध्ये अफवा पसरून बहुरूप्यांना पोरधरी समजून जिवंतपणी ठेचले जाते. पारध्यांना चोर समजून झुंडीने मारहाण केली जाते. कोल्हाटी समाजातल्या स्त्रियांबद्दल अतिशय हिणकस कॉमेंट केली जाते. या सबंध वास्तवाचा नवा अन्वयार्थ लावत भटक्या विमुक्त साहित्याने अभिव्यक्तीचे नवे दालन उभारावे हेच स्वातंत्र्याचे खरे औचित्य आहे. बाकी सेटलमेंटच्या तारा तुटल्या असतील तरी चोर गुन्हेगार म्हणूनची मानसिकता घट्ट आहे. त्या अर्थाने आपण अजूनही पारतंत्र्यातच आहोत.

लेखकाचा संपर्क - ९८३४९७४००८

X
COMMENT