आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१६ वर्षांत रस्त्याचे रुंदीकरण केले नाही, नवीन विकास आराखडा कशासाठी हवा ?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जुन्या शहरातील विकास आराखड्याची मुदत २०२२ मध्ये संपत आहे. चार वर्षे आधीच आराखडा तयारीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. परंतु, १६ वर्षांपूर्वी रस्त्यांची रुंदी ठरवण्यात आली होती, त्यानुसार अजूनही रुंदीकरण झालेले नाही. विकास आराखड्यानुसार रुंदीकरणच होत नसेल तर नवीन आराखडा कशासाठी आणि त्यांचा उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जुन्या शहराचे हृदय म्हणून ओळखली जाणारी गुलमंडी, सिटी चौक, पानदरिबा, सराफा आदी प्रमुख रस्ते अजूनही रुंद झालेले नाहीत. त्यामुळे येथे कायम वाहतूक कोंडी असते.

 

...तर कामे होतील अर्धवट 

शासनाने दिलेल्या १०० कोटी रुपयांतून शहरात २२ रस्त्यांची कामे होत आहेत. यातील काही रस्त्यांचे अजूनही रुंदीकरण झालेले नाही. ऐनवेळी भूसंपादन शक्य नाही. त्यामुळे ठेकेदार पूर्ण रस्त्याच्या कामासाठी निविदा भरतात, पण रुंदीकरण झालेले नसल्याने प्रत्यक्षात काम मात्र अरुंद रस्त्याचे केले जाते. यात ठेकेदारांचा फायदा होतो. १०० कोटींच्या रस्त्यांच्या यादीत सिटी चौक ते दलालवाडी मार्गे पैठण गेट या रस्त्याचे रुंदीकरण झालेले नाही. परंतु, आता काम सुरू होईल. ऐनवेळी संपादन होणार नाही. कोणी न्यायालयात धाव घेईल. म्हणजे ठेकेदार अस्तित्वात असलेल्या अरुंद रस्त्याचेच काम करून मोकळे होईल.

 

आराखड्यानुसार रुंद करण्यात न आलेले प्रमुख रस्ते 

सिटी चौक ते दलालवाडी पुढे पैठण गेट 
रंगारगल्ली 
गुलमंडी ते पानदरिबा 
पानदरिबा ते सराफा 
सराफा ते पुढे लेबर कॉलनी 
दमडी महल ते शहाबाजार 
शहाबाजार ते जालना रोड 
हॉटेल अमरप्रीत ते पानदरिबा 
सुपारी हनुमान ते पानदरिबा 
महात्मा फुले चौक, औरंगपुरा ते सिटी क्लब 
नाज गल्ली ते सराफा 
बारुदगर नाला ते पुढे शहागंज 
संस्थान गणपती राजाबाजार ते जिन्सी पोलिस ठाणे 
जिन्सी पोलिस ठाण्यापासून पुढे एमजीएम

 

डॉ. भापकरांच्या धाडसाने काही रस्ते झाले रुंद 

२०११ मध्ये तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी रस्ता रुंदीकरण मोहीम हाती घेतली होती. त्यात पैठण गेट ते गुलमंडी, औरंगपुरा ते गुलमंडी, सिल्लेखाना, कैलासनगर ते एमजीएम या प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण केले. काही कारणाने ही मोहीम थांबली आणि तेव्हापासून म्हणजे गेल्या सात वर्षांपासून कोणीच रस्ता रुंदीकरणाला हात घातला नाही. मधल्या काळात जिन्सी भागातील काळी मशीद येथील रस्ता रुंद करण्याचा प्रयत्न झाला. परंतु तेथे वाद झाल्याने पुन्हा परिस्थिती जैसे थेच आहे.

 

रस्ते रुंद करून द्यावेत 

विकास आराखड्यानुसार रस्ते रुंद केल्यास त्या रस्त्याचा विकास करणे स्थापत्य विभागाला सोपे जाते. जेवढा रस्ता रुंद तेवढे काम होते. मात्र, १९७५ पासून काही रस्त्यांचे रुंदीकरण झालेले नाही. त्यामुळे आम्हाला काम करताना बाधा येते. अरुंद रस्त्याचाच विकास करावा लागतो. आता १०० कोटींच्या रस्त्यांची कामे सुरू होण्यापूर्वी किमान तेवढे रस्ते तरी रुंद करून द्यावेत, जेणेकरून पूर्ण रस्त्याचे काम होईल. - मुरलीधर सोनवणे, निवृत्त शहर अभियंता 

 

हा अट्टहास कशासाठी? 
१९७५ आणि त्यानंतर २००२ मध्ये शहर विकासाचे नियोजन झाले आहे. आता चार वर्षे आधीच पुन्हा ते करण्याचे नियोजित करण्यात येत आहे. २००२ च्या आराखड्यानुसार रस्ते रुंद झाले नसल्यास नवीन अट्टहास कशासाठी? फक्त कागदोपत्री सोपस्कार पूर्ण करणे हाच उद्देश त्यामागे दिसतो. त्यापेक्षा आधीच्या विकास आराखड्यानुसार रस्ते रुंद करावेत. समीर राजूरकर, माजी नगरसेवक 

बातम्या आणखी आहेत...