आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कंगनाचं काय करायचं?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रस्थापितांना,  बॉलीवूडमधल्या घराणेशाहीला बेधडकपणे अंगावर घेणाऱ्या कंगनाबद्दल सर्वसामान्य प्रेक्षकाला एक सॉफ्ट कॉर्नर होता. पण सध्याच्या वादात एरवी डोळे झाकून कंगनाला पाठिंबा देणारा वर्गही तिच्यापासून दूर जाताना दिसतोय. सततच्या आक्रस्ताळेपणामुळे, स्वतःच सगळं क्रेडिट घेण्याच्या प्रवृत्तीमुळे, शिवराळ भाषा वापरण्यामुळे, इतरांना देशद्रोहाची लेबलं लावण्यामुळे तिचे अनेक समर्थक, चाहते तिच्यापासून दुरावत चालले आहेत. एकेकाळी इंडस्ट्रीमधल्या दुर्गुणांविरुद्ध संघर्ष करणाऱ्या या गुणवान अभिनेत्रीचं समर्थन करणारे अनेक समंजस लोकही तिच्या या वेगळंच वळण मिळालेल्या प्रवासाकडे हताशपणे बघत आहेत.

 

कंगनाने नवीन किंवा प्रस्थापित नसणाऱ्या दिग्दर्शकांसोबत स्वतःची कारकीर्द घडवली. हे खूप अवघड असतं, कित्येक प्रस्थापित, लोकप्रिय अतिशय चांगला अभिनय करणाऱ्या लोकांना वर्षानुवर्षे काम करूनही राष्ट्रीय पुरस्कार मिळत नाही. पण इतक्या लहान वयात कंगनाकडे तीन राष्ट्रीय पुरस्कार आहेत.

 

“Beware that, when fighting monsters, you yourself do not become a monster... " असं आपला निश्तझे म्हणतो. व्यवस्थेशी लढणारी माणसं एका टप्प्यानंतर स्वतःच एक व्यवस्था बनतात. लोकलमधल्या किंवा कुठल्याही गच्च गर्दीतल्या वाहनांमध्ये आत घुसण्यासाठी अगोदरच आत चढलेल्या गर्दीशी जबर संघर्ष करणारा माणूस एकदा कसाबसा आत घुसला की बाहेरून आत येणाऱ्या नवीन लोंढ्यांना अडवण्यासाठी जोर लावायला लागतो. प्रस्थापितांशी लढणारा माणूस हळूहळू स्वतःच प्रस्थापित बनत जातो. ही एका अटळ शोकांतिकेची सुरुवात असू शकते. कंगना राणावतसोबत पण असंच काही तरी होईल का अशी भीती तिच्या एकेकाळच्या आणि आताच्या पण अनेक चाहत्यांना सतावत आहे.


कंगनाच्या प्रत्येक सिनेमाच्या अगोदर एक काँट्रोव्हर्सी सुरू होते अशी प्रथा आहे.  परवा प्रदर्शित  झालेल्या "जजमेंटल है क्या'च्या वेळीही ती झालीच. बहुतेक ही काँट्रोव्हर्सी कंगनानेच सुरू केलेली असते. या वेळेस पण तिने सिनेमाच्या प्रमोशनसाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराशी पंगा घेतला आणि वादाचा आखाडा भरला. पण या वेळेस एक जाणवण्याइतपत फरक आहे. यापूर्वीच्या प्रत्येक वादविवादात कंगनाच्या बाजूला असणारा एक मोठा वर्ग असायचा. बॉलीवूडमधल्या घराणेशाहीला, प्रस्थापितांना बेधडकपणे अंगावर घेणाऱ्या कंगनाबद्दल सर्वसामान्य प्रेक्षकाला एक सॉफ्ट कॉर्नर होता. पण सध्याच्या वादात एरवी डोळे झाकून कंगनाला पाठिंबा देणारा वर्गही तिच्यापासून दूर जाताना दिसतोय. कंगनाने अथक प्रयत्नाने आपली lone warrior अशी प्रतिमा बनवलीये खरी, पण अनेक चाहत्यांचा पाठिंबा ही तिच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहेच. पण असं का झालं असावं? लोकांना कंगनाच्या सतत युद्धाच्या पावित्र्यात राहण्याच्या मोडचा कंटाळा आला आहे का? कंगनाची बहीण ट्विटरवर कंगनाच्या शत्रूंबद्दल जी अतिशय शिवराळ भाषा वापरतेय,ती लोकांना खटकत आहे का? 


कंगना राणावत... एक छोट्या शहरातून आलेली आउटसाइडर. स्वतःच्या हिमतीच्या बळावर इंडस्ट्रीमध्ये यशस्वी झाली. दरम्यानच्या काळात आदित्य पांचोलीसारख्या प्रस्थापिताशी जोरदार वैयक्तिक संघर्ष केला. "रास्कल' नावाच्या सिनेमाच्या सेटवर तिचं अजय देवगण आणि संजय दत्तशी काही जमलं नाही.तर या दोघांनी तिला सिनेमाच्या प्रमोशनमधून बॉयकॉटच केलं. कंगना नवीन होती, तिच्या तक्रारींकडे कुणीच लक्ष दिलं नाही. कंगनाच्या मनात इथंच प्रस्थापितांबद्दल कटुता तयार व्हायला सुरू झाली असावी. कंगनाने "क्वीन', "तनु वेड्स मनू' आणि आणखी काही चांगले नायिकाकेंद्री सिनेमे पण केले. काही अपवाद वगळता प्रस्थापित बॅनर्सनी तिला आपल्या सिनेमात घेणं नेहमीच टाळलं. कंगनाने नवीन किंवा प्रस्थापित नसणाऱ्या दिग्दर्शकांसोबत स्वतःची कारकीर्द घडवली. हे खूप अवघड असतं. कित्येक प्रस्थापित, लोकप्रिय अतिशय चांगला अभिनय करणाऱ्या लोकांना वर्षानुवर्षे काम करूनही राष्ट्रीय पुरस्कार मिळत नाही. पण इतक्या लहान वयात कंगनाकडे तीन राष्ट्रीय पुरस्कार आहेत. कंगना एक उत्कृष्ट आणि हुशार अभिनेत्री आहे यात वादच नाही. 


इंडस्ट्रीमधल्या आउटसाइडर्सबद्दल प्रेक्षकांना एक आकर्षण आणि सॉफ्ट कॉर्नर असतोच. कंगनाबद्दल पण तो लोकांना आहेच. जेव्हा करण जोहरच्या शोमध्ये जाऊन तिने करणलाच "तो सिनेमातल्या घराणेशाहीचा राजदूत आहे' असं ठणकावून सांगितलं, तेव्हा लोकांनी तिच्यासाठी टाळ्या वाजवल्या. "आप की अदालत' या कार्यक्रमात तिने हृतिक रोशन आणि राकेश रोशनवर टीका केली तेव्हा पण त्या पूर्ण विवादात बहुतेकांनी आपलं सहानुभूतीचं वजन कंगनाच्या पारड्यात टाकलं. लोकांची तरी काय चूक?  एकूणच श्रीमंतीबद्दल आपल्या समाजात एक आकस आहे. कारण श्रीमंत, यशस्वी लोक कायदा खिशात घालून फिरतात हे बॉलीवूड सिनेमानेच वर्षानुवर्षे शिकवलं आहे. 
हा समज आपल्या चित्रपटातल्याच पॉप सोशॅलिझममुळे पसरत गेला. पण दोन्ही प्रकरणांत करण आणि हृतिकसारख्या दोन दिग्गजांना perception च्या लढाईत कंगनाने आसमान दाखवलं हे खरं. पण बॉलीवूडमधला कंगनाचा प्रवास बारकाईने बघणाऱ्या आणि इंडस्ट्रीची बित्तंबातमी ठेवणाऱ्या काही लोकांना कंगनामध्ये होणारे व्यावसायिक बदल जाणवत होतेच. हे बदल काही उत्साहवर्धक नव्हते. कंगना जेव्हा अन्नसाखळीच्या सगळ्यात वरच्या टप्प्यावर असते तेव्हा, अन्नसाखळीच्या खालच्या टप्प्यांवर असणाऱ्या लोकांचे हात पिरगाळू शकते हे या दरम्यान जाणवायला लागलं होतं. तिच्या मनमानीचा पहिला फटका बसला तो चित्रपट लेखक अपूर्व असरानीला. लेखक अपूर्व असरानी आणि दिग्दर्शक हंसल मेहता यांची जोडी बरीच जुनी. या दोघांनी मिळून "शाहिद', "अलिगढ', ‘सिटी लाइट्स' असे एकाहून एक अप्रतिम चित्रपट दिले आहेत. या जोडीच्याच "सिमरन' या चित्रपटात कंगना काम करत होती. हंसल मेहताने क्रेडिट्समध्ये लेखनश्रेयामध्ये कंगनाचं नाव दिलं आणि धुसफूस सुरू झाली. अनेकदा हीरो शूटिंग चालू असताना "improvisation' करताना स्वतःची एखादी लाइन वगैरे अॅड करतात, पण त्यामुळे डायरेक्ट लेखनश्रेय देणं म्हणजे "स्टार वर्शिप'ची अत्युच्च पातळी आहे. कंगनाने न्यूयॉर्कमधून स्क्रीनप्ले रायटिंगचा कोर्स केला आहे. "क्वीन' पिक्चरच्या क्रेडिट्समध्ये पण तिला श्रेय देण्यात आलं होतं. स्वतःचे काही संवाद अॅड केल्यावर श्रेयनामावलीत स्थान पाहिजे हा तिचा हट्ट बरोबर नव्हताच. यात मूळ लेखकावर अन्याय होतो याची तिला कल्पना नसेल हे पचत नाही. अपूर्व हा पहिला असला तरी शेवटचा नक्कीच नव्हता .
विशाल भारद्वाज "रंगून'मधल्या तिच्या हस्तक्षेपाने कंटाळून गेला होता. "सिमरन'मध्ये तिने लेखक अपूर्व असरानीचं क्रेडिट अक्षरशः चोरलं. "मणिकर्णिका'मध्ये दिग्दर्शनाचं क्रेडिट स्वतःच घेतलं. क्रेडिटमध्ये दिग्दर्शकाचं अनोळखी नाव वापरलं, जेणेकरून तो कोण आहे हे बहुसंख्यांना कळूच नये. तिच्या दिग्दर्शनातल्या ढवळाढवळीमुळे सोनू सूदने "मणिकर्णिका'मध्ये काम करायला नकार दिला, तर तिने बेछूट आरोप केला की, "सोनूला महिला दिग्दर्शकासोबत काम करण्यात कमीपणा वाटतो.' सोनू बिचारा चपापला... गप्प बसला. त्याने फराह खानसोबत काम केलंय, पण हे तिला सांगून उपयोग नव्हता. आलिया भट्ट निव्वळ करण जोहरच्या जवळची आहे, म्हणून तिने आलियावर टीकेची संततधार धरली. दीपिका पदुकोण या आपल्या प्रतिस्पर्धी अभिनेत्रीवर तिने वेगवेगळ्या कारणांनी खूप टीका केली. मग कंगनाची नजर वळली तापसी पन्नूवर. तापसी आणि कंगनामध्ये अनेक बाबतीत साधर्म्य आहे. दोघीही कुरळ्या केसांच्या, दोघीही इंडस्ट्रीमधल्या आउटसाइडर्स. दोघीही बेधडक आपली मतं कुणाची पर्वा न करता मांडत असतात. पण तापसीच्या मुलाखतीमधलं एक वाक्य out of context मध्ये घेऊन रंगोलीने (कंगनाची बहीण कम मॅनेजर. इतरांवर घराणेशाहीवरून टीका करणाऱ्या कंगनाला इथं स्वतःची घराणेशाही का राबवावीशी वाटली असा प्रश्न विचारायचा नाही.) तापसीची ही कंगनाची "सस्ती कॉपी' आहे अशी खालच्या पातळीवर संभावना केली. तापसीची बाजू मांडणाऱ्या अनुराग कश्यपवर पण भरपूर टीका केली. "मणिकर्णिका'साठी राष्ट्रीय पुरस्कार जर नाही मिळाला तर मग राष्ट्रीय पुरस्काराची विश्वासार्हता उरणार नाही, असे एक वादग्रस्त स्टेटमेंट कंगनाने केले. मग "जजमेंटल है क्या'च्या पत्रकार परिषदेत कंगनाने वादाचा पुढचा अध्याय लिहिला. प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारावर तिने, तिची कारकीर्द बिघडवण्यासाठी तो कंगनाविरोधी अजेंडा राबवत आहे अशी टीका भर पत्रकार परिषदेत केली. 


त्या पत्रकाराने ते आरोप तिथल्या तिथे फेटाळले आणि ती जे आरोप करत आहे, त्याचे पुरावे दाखव, अशी मागणी केली. कंगनाने तसे कष्ट घेतले नाहीत. तिच्या या कृतीचा निषेध म्हणून काही पत्रकारांनी तिच्यावर बहिष्कार टाकून, तिला आम्ही कुठलंही मीडिया एक्स्पोजर देणार नाही अशी भूमिका घेतली. या पत्रकारांना उत्तर म्हणून कंगनाने एक व्हिडिओ रिलीज केला. त्यात तिने पत्रकारांची लिबरल, बिकाऊ आणि राष्ट्रविरोधी म्हणून संभावना केली."मणइकर्णिका' च्या रिलीजपासून तिने स्वतःची कट्टर राष्ट्रवादी अशी इमेज बनवायला सुरू केली आहे. तिला विरोध करणारे, तिला न आवडणारी मत मांडणारे, सगळेच लोक देशद्रोहीच असतात हे सांगायची गरज नाहीच . सततच्या आक्रस्ताळेपणामुळे, स्वतःच सगळं क्रेडिट घेण्याच्या प्रवृत्तीमुळे, शिवराळ भाषा वापरण्यामुळे, इतरांना देशद्रोहाची लेबल लावण्यामुळे तिचे अनेक समर्थक, चाहते तिच्यापासून दुरावत चालले आहेत. एकेकाळी इंडस्ट्रीमधल्या दुर्गुणांविरुद्ध संघर्ष करणाऱ्या या गुणवान अभिनेत्रीचं समर्थन करणारे अनेक समंजस लोक पण तिच्या या वेगळंच वळण मिळालेल्या प्रवासाकडे हताशपणे बघत आहेत. "Can we separate the art, from the artist?' असा एक सनातन प्रश्न समाजासमोर असतोच. कंगनाचे वर उल्लेखित सर्व दोष लक्षात घेऊन पण तिचं चांगलं अभिनेत्री असणं नाकारताच येत नाही. पण विद्या बालनच्या ग्रेसफुल प्रसन्न वावराशी आणि तब्बूच्या गरजेइतकंच बोलून कामातूनच स्वतःला सिद्ध करण्याशी तुलना केली तर कंगनाची सध्याची वागणूक खूप खटकते. पण सगळ्यांनीच तब्बू आणि विद्या बालन व्हावं ही अपेक्षा पण थोडी  जास्तच. 


एक फेकिंग न्यूज नावाची भन्नाट क्रिएटिव्ह वेबसाइट आहे. त्या वेबसाइटवर काही दिवसांपूर्वी एक न्यूज अपलोड करण्यात आली होती. "अर्धा तास कुणी भांडण करायला मिळालं नाही, म्हणून आरशातल्या स्वतःच्याच प्रतिबिंबाशी भिडली कंगना राणावत' अशी ती बातमी होती. बातमी वाचून अर्थातच हसू आलं. पण काही प्रश्न पण पडले. इतक्या गुणवान अभिनेत्रीला आपण आक्रमक राहून, लोकांवर टीका करून, लोकांना लेबल लावूनच आपण इंडस्ट्रीमध्ये टिकून राहू असं का वाटत असेल. ही असुरक्षितता नेमकी येते कुठून?