आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरला उजनीचे पाणी देण्याच्या योजनेचे काय होणार? देवेंद्र फडणवीस यांनी केली होती लातूरमध्ये घोषणा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - मागील सरकारचे निर्णय एकापाठोपाठ रद्द करण्याची आणि नव्याने निर्णय घेण्याचा सपाटा विद्यमान सरकारने लावला आहे. त्यामुळे मराठवाडा वॉटर ग्रीड आणि उजनी धरणातून लातूर शहरासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याच्या घोषणेचे काय होणार याची चिंता लातूरकरांना लागली आहे.

लातूर शहर हे कायम पाणीटंचाईच्या विळख्यात असणारे शहर आहे. ज्या मांजरा धरणातून लातूर शहराला पाणीपुरवठा केला जातो त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस सातत्याने कमी होत चालला आहे. गेल्या १० वर्षांत हे धरण केवळ दोन वेळा शंभर टक्के भरले आहे. उर्वरित धरणात पाणीच आले नव्हते. त्यामुळेच तीन वर्षांपूर्वी अख्खे धरण कोरडेठाक पडल्यामुळे लातूर शहराला रेल्वेने पाणीपुरवठा करावा लागला होता. मधली दोन वर्षे सुखाची गेल्यानंतर यावर्षी पुन्हा एकदा धरण कोरडे पडण्याच्या दिशेने चालले होते. निवडणुकीनंतर लातूरला पुन्हा एकदा टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार होता. मात्र दिवाळीत दमदार पाऊस पडल्यामुळे मांजरा धरणात पिण्यापुरते पाणी उपलब्ध झाले आणि संकट टळले.  मात्र सातत्याने पाणीटंचाईची टांगती तलवार घेऊन जगणाऱ्या लातूरकर शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी संपवण्यासाठी उजनी धरणातून स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याची मागणी करीत आहेत. निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेदरम्यान ते लातूरला आले असता त्यांनी लातूरला उजनी धरणातून पाणी देण्याची घोषणा केली होती.  निवडणुकीत सेना-भाजपच्या मतभेदांमुळे त्यांचे सरकार बनले नाही. नव्या बदलात सेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार बनले. नव्या सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील सरकारच्या काळातील आरे मेट्रो कारशेडचा प्रकल्प रद्द करण्याची घोषणा केली. त्यामुळे नवे सरकार मागच्या काळातील प्रत्यक्ष सुरू असलेल्या कामांना रद्द करू शकते तर केवळ घोषणा केलेल्या कामांचे काय होणार, असा सवाल लातूरकरांना पडला आहे. दरम्यान, दिवाळीत पडलेल्या पावसाच्या बळावर लातूरला वर्षभर पुरवठा होईल एवढा जलसाठा मांजरा धरणात उपलब्ध झाला आहे. तसेच पावसामुळे विंधन विहिरींनाही पाणी आले आहे. त्यामुळे लातूरच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सरकारच्या अजेंड्यावरून काहीसा मागे पडला आहे. पुढच्या वर्षी पावसाने हुलकावणी दिली तर पुन्हा मागची स्थिती उद्भवू शकते.

काय होती फडणवीसांची घोषणा : 

लातूर शहराचे भौगोलिक स्थान पाहता शहरासाठी विशेष पाणीपुरवठा योजना राबवणे आवश्यक आहे. त्यासाठी उजनी धरणाचे पाणी सीना-कोळेगाव प्रकल्पाद्वारे मांजरा धरणात आणले जाईल. ज्यावेळी मांजरा धरणात पाणी नसेल केवळ तेव्हाच उजनीतून पिण्यापुरत्या पाण्याचा उपसा केला जाईल. लातूर शहरासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याऐवजी मांजरा धरणात पाणी आणून सोडल्यास त्याचा फायदा लातूर, अंबाजोगाई, धारूर, कळंब या शहरांसह इतर गावांनाही होईल, अशी घोषणा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली होती.

 

मराठवाडा वॉटरग्रीडचे काय


मराठवाडा वॉटरग्रीड ही एक महत्त्वाकांक्षी योजना फडणवीस सरकारने राबवण्याचा निर्णय केला होता. त्यातील बीड, औरंगाबाद, लातूर-उस्मानाबाद या जिल्ह्यांच्या निविदाही प्रसिद्ध झाल्या होत्या. या कामासाठी भाजपचे नेते तथा माजी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी पुढाकार घेतला होता. मुख्यमंत्र्यांचे त्यावर विशेष लक्ष होते. शिवसेनेचे नेते या कामाशी तेव्हा फारसे संबंधित नव्हते. नव्या सरकारमध्ये मराठवाडा वॉटरग्रीडचे भवितव्य काय असेल, असाही प्रश्न उभा ठाकला आहे.

 

बातम्या आणखी आहेत...