आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूरपरिस्थितीची माहिती देण्यासाठी व्हाॅट्सअॅप ग्रुप; जलसंपदा विभागाने घेतला पुढाकार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - संपूर्ण राज्यात मान्सून सक्रिय झालेला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होऊन बांधकामाधीन पूल तसेच रस्ते वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. मुसळधार पावसानंतर बहुतांश वेळा धरणे ओसंडून वाहतात. अशा वेळी धरणातील पाणी सोडावे लागते. या सर्व गोष्टीची तत्काळ माहिती देता यावी यासाठी राज्याच्या जलसंपदा विभागाने खोरेनिहाय व्हाॅट्सअॅप ग्रुप करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रालयातील पूर नियंत्रण कक्षाद्वारे हे ग्रुप तयार करण्यात येणार आहेत. 


धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग, झालेला पाऊस, पूर्ण जलसंचय पातळी व सध्याची पाणीपातळी याची माहिती दर चार तासांनी अपडेट करायची आहे. पूर्ण क्षमतेने कार्यरत पूर नियंत्रण कक्षासाठी एक नवीन मोबाइल खरेदी करण्यात येणार आहे. हा मोबाइल पूर नियंत्रण कक्षातच राहील. पूर नियंत्रण कक्षातील ड्यूटी बदल या मोबाइलवर करूनच संबंधित कर्मचाऱ्याला कक्ष सोडता येईल. या मोबाइल ग्रुपवर अतिवृष्टी, ढगफुटी तसेच धरणफुटीच्या बातम्या अपडेट करण्यात येणार आहेत. 


माहिती  अपडेटची जबाबदारी अभियंत्याची
माहिती अपडेट करण्याची जबाबदारी खोऱ्याच्या पूर नियंत्रण कक्षातील अभियंत्याची राहणार आहे. त्यामुळे या नियंत्रण कक्षातील अभियंत्याना खोऱ्याच्या कक्षात रहावे लागणार आहे. दरम्यान, या निर्णयानंतर शेतकरी, मजूर आणि स्थानिक नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी, असेही काही जणांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले.
 

राज्यात १३८ मोठे प्रकल्प
राज्यात जलसंपदा विभागांतर्गत १३८ मोठे, २५५ मध्यम व २,८६२ लघु पाटबंधारे प्रकल्प बांधून पूर्ण झाले आहेत. यापैकी अनेक धरणे सह्याद्री, सातपुडा डोंगररांगांमध्ये आहेत. या ठिकाणी होणारी अतिवृष्टी तसेच पूरपरिस्थितीची माहिती तत्काळ कळावी म्हणून व्हाॅट्सअॅप ग्रुप स्थापन करण्यात येणार आहे. पूर नियंत्रण कक्षात वायरलेस यंत्रणा सज्ज ठेवायची आहे. अवर सचिव सु. ना. ऐवळे यांनी जारी केलेल्या परिपत्रकात यासंबंधीचे निर्देश देण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...