आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - आपल्या अगदी जवळचे कोणीतरी जेव्हा आपल्याला सोडून जाते तेव्हा प्रत्येक जण आपण गमावलेली प्रिय व्यक्ती परत यावी यासाठी त्रागा करत असतो. पण खरंच असे झाले तर. अशावेळी काय अवस्था होईल याचा कोणाला अंदाजही नसतो. हिरानगर येथील कुटुंबीयांना अशाच एका प्रसंगाला सामोरे जावे लागले. पण नेमका हा प्रसंग काय आणि हे घडले कसे हे आपण जाणून घेऊयात.
हिरानगर येथे आठ महिन्यांपूर्वी रेल्वेखाली एका तरुणाचा मृत्यू झाला होता. मुजमिल असे या तरुणाचे नाव होते. हिरानगर रेल्वे ट्रॅकवर पोलिसांना एका तरुणाचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी स्थानिक रुग्णालयात बेपत्ता असलेल्या लोकांपैकी कोणाचा मृतदेह आहे का हे पाहण्यासाठी मृतदेह ठेवला होता. त्यावर मेंढर येथील रहिवासी असलेल्या एका कुटुंबाने तो मृतदेह त्यांचा मुलगा मुजमिलचा असल्याचा दावा केला होता. त्यावर कारवाईनंतर तो मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला. कुटुंबीयांनी त्यांच्या मुलाला कब्रस्तानमध्ये दफन करत अंत्यसंस्कारही केले. पण या घटनेच्या आठ महिन्यांनंतर अचानक मुजमिल घरी आला. त्याला समोर पाहून सर्वांनाच धक्का बसला. कारण सर्व त्याला मृत समजत होते. कामानिमित्त बाहेर गेलेला असल्याने कुटुंबीयांशी संपर्क करता आला नसल्याचे मुजमिलने सांगितले.
मुजमिल घरी आला तर मग अंत्यसंस्कार केले तो कोण होता हा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे पोलिसांसमोर पेच उभा राहिला आहे. पोलिस दफन केलेल्या मृतदेहाला बाहेर काढून त्याची डीएनए चाचणी करणार आहे. त्यामुळे मृत व्यक्ती नेमका कोण होता हे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.