आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
त्यानंतर सर्वांच्या विनंतीला मान देत त्यांनी फीत कापून शिबिराचे उद्घाटन केले. भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा.मधुसूदन मुळे यांनी 'दिव्य मराठी' शी बोलताना या आठवणीला उजाळा दिला.
अभी तो मैं जवान हूं।'असं म्हणत देशातील युवा पिढीला सतत कार्यप्रवण करणारे आणि कायम देशहिताला प्राधान्य देणारे अटलजी जेव्हा, मैं बुढा हो गया हूँ। असं म्हणाले, तेव्हा तेथे उपस्थित असणारे सर्वजण अतिशय भावूक झाले. या कार्यक्रमानंतर दीक्षित मंगल कार्यालयामध्ये भाजपाची एक संघटनात्मक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अटलजींनी देशहित डोळ्यासमोर ठेवून कार्य करा आणि चारित्र्य जपा, असा संदेश दिला होता.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी दिल्लीत निधन झाले. वाजपेयी यांचे नगरबरोबर जुने ऋणानुबंध होते. नगरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील जुन्या कार्यकर्त्यांबरोबर भाजपमधील अनेक नेत्यांबरोबर संबध होते. त्यांच्या निधनाबद्दल भाजपसह विविध पक्षातील नेत्यांनी त्यांना श्रध्दांजली अर्पण करतानाच नगरमध्ये ते आल्यानंतरच्या आठवणींना उजाळा दिला.
१९६७ मध्ये अटलजी जनसंघाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नगरला आले होते. त्यावेळी वाडिया पार्क मध्ये त्यांची सभा झाली. शहरातील माई सप्तर्षींच्या घरी तेव्हा ते उतरले होते. अर्थात भाजपा ची स्थापना केव्हा व्हायची होती.
१९५२-५३ च्या आसपास नगर शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य बहराला आलेलं होतं.तेव्हा संघाच्या बैठकांसाठी अटलजी नगरला येत असत. नगरच्या माणिक चौकात डांगे गल्ली मध्ये मुंगी वाडा होता. याच वाड्यामध्ये संघाच्या बैठका होत. विष्णू गंगाधर खेर तथा अण्णासाहेब तेव्हा शहर संघचालक होते.
अटलबिहारी वाजपेयी यांचे नगरवर विशेष प्रेम होते. नगरमधून त्यांना आम्ही भेटण्यासाठी दिल्लीत गेल्यानंतर ते नेहमीच नगरचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजाभाऊ झरकर यांची आठवण काढायचे. नगरमध्ये २४ एप्रिल १९८५ मध्ये वाजपेयी आले होते.त्यांच्या उपस्थित वाडिया पार्क मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी मी भाजपच्या युवा मोर्चाचा शहराध्यक्ष होतो. ते येण्याच्या दोन दिवस अगोदर आम्ही शहरातील चौपाटी कारंजा परिसरात त्यांच्या कार्यक्रमाचे पोस्टर लावत होतो. त्यावेळी तेथे असलेल्या बारा तेरा वर्षांच्या मुलांनी पोस्टर लावताना आम्हाला सांगितले की, हेच देशाचे पंतप्रधान होणार .आणि त्यानंतर खरच ते देशाचे पंतप्रधान झाले. नगरमध्ये आल्यानंतर त्यांच्याशी माझी वैयक्तिक भेट झाली. आवर्जून त्यांनी काही आठवणी आम्हाला सांगितल्या. आज ते आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांचे विचार मात्र कायम स्मरणात राहतील.अशी आठवण ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांनी सांगितली.
...लोग मुझे देखने नहीं, सुनने आए हैं
नगरमध्ये वाजपेयी आल्यानंतर ते माझ्या सिंधी कॉलनीतील घरी जेवणासाठी आले होते. माझं छोटसं घर असल्यामुळे मला त्यांना आणण्यास परवानगी मिळत नव्हती. मात्र भाजपच्या स्थानिक लोकांनी वाजपेयी यांच्या बरोबर असलेल्या लोकांना सांगून ती परवानगी मिळून दिली. त्यावेळी वाजपेयी यांच्याबरोबर गोपीनाथ मुंडे, प्रा.ना.स.फरांदे, सुर्यभान वहाडणे, राजाभाऊ झरकर, बंडोपंत कुलकर्णी, दिनकर ताके, तत्कालीन शहराध्यक्ष गुलशन जग्गी हे त्यांच्या सोबत होते. त्यावेळी वाजपेयी यांची तब्येत देखील बरी नव्हती.डॉक्टरांना माझ्या घरीच बोलावून त्यांची तपासणी झाली. त्यानंतर त्यांनी घेतले. सभेला जाण्यापुर्वी मी त्यांना कपडे बदलण्याबाबत विचारले असता ते मला म्हणाले,लोग मुझे देखने नहीं मुझे सुनने आए हैं,अशी आठवण दामोधर बठेजा यांनी सांगितली.
भाषण ऐकून प्रेरणा मिळाली
१९८६ मध्ये रक्तपेढीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यानंतर दीक्षित मंगल कार्यालयात भाजपची बैठक झाली तेव्हा एमआयडीसीतील कामगारांच्या प्रश्नांबाबत अटलजी यांच्याबरोबर चर्चा करण्याचे भाग्य लाभले. जनसंघाच्या वेळी १९६७ मध्ये त्यांची वाडिया पार्कवर सभा झाली. तेव्हा मी १३ वर्षांचा होतो. त्यांचे भाषण ऐकूणच काम करण्याचे मी ठरविले.योगा-योगाने मी भाजपत असताना १९८६ मध्ये त्यांच्याबरोबर चर्चा करता आली.अशी आठवण भाजपचे माजी शहराध्यक्ष आणि हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव सुनील रामदासी यांनी सांगितली.
मैने आपकी कविता पढी
मुंबईमध्ये १९९७ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांना भेटण्याचा योग आला.त्यावेळी मी मुंबईत होतो.भेटीच्या आदल्या दिवशी रात्री अकराच्या सुमारास फोनची घंटा वाजली.मी नुकताच झोपण्याच्या तयारीत होतो. इच्छा नसतानाही तो फोन उचलला.समोरुन रमेश मेढेकर बोलत होते.तुम्हाला सकाळी नऊ वाजता उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या रामटेक निवासस्थानी हजर राहायचे आहे. विषय काय हे विचारण्या अगोदरच फोन कट झाला. सकाळी रामटेकवर पोहचताच प्रवेशद्वारावरच मुंडे एकटे उभे होते. आतमध्ये गेल्यानंतरही देखील मला माहित नव्हते. नेमके काय काम आहे. तेव्हढ्यात पाठीमागून अटलबिहारी वाजपेयी आले.त्यांना नमस्कार केला. आणि माझा टाचाटिभा या कवीतासंग्रह त्यांना दिला.त्यावर ते म्हणाले, कवीराजजी मैने आपकी कविता पढी है,अशी आठवण ज्येष्ठ साहित्यिक लहू कानडे यांनी सांगितली.
'पैस'च्या दर्शनानंतर केले मराठीतून भाषण
ज्ञानेश्वरांच्या पैस खांबाच्या दर्शनाबरोबरच ग्रामदैवत मोहिनीराज मंदिरात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी दिलेल्या भेटीनंतर वाजपेयी यांनी भाषण मराठीत केले होते. याची आज नेवासेकरांना आठवण होत आहे ८ आॅगस्ट १९७९ रोजी जनता दल राजवटीतील मंत्रिपदाचा राजीनामा देऊन औरंगाबादच्या दौऱ्यामध्ये प्रमोद महाजन व दिनकरराव ताके यांच्या आग्रहामुळे ज्ञानेश्वरी लेखन स्थानाचे वाजपेयी यांनी सकाळी सात वाजता दर्शन घेतले. त्यानंतर जिजामाता विद्यालयाच्या पटांगणात जमलेली गर्दी पाहून त्यांनी भाषणासाठी तयारी दाखवली आणि विशेष म्हणजे ज्ञानेश्वरांची महती मराठीतून वर्णन करत दिलेल्या ज्ञानेश्वरी ओव्यांच्या आपल्या जीवनावर मोठा प्रभाव आहे, असे ते म्हणाले होतेे. ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट दिल्याबद्दल त्यांनी ज्ञानेश्वर मंदिर विश्वस्तांचे आभार मानले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.