आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

…जेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी प्रचारसभेत उमेदवारच बदलला!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेमंत जाेशी | भुसावळ
१९९५ मधील विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेने भुसावळ मतदारसंघासाठी जिल्हाप्रमुख राजेंद्र दायमा यांचे नाव निश्चित केले होते. दायमांच्या प्रचारासाठी १७ नोव्हेंबर १९९५ रोजी शहरातील डी. एस. हायस्कूल मैदानावर सभा आयोजित केली होती. यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दायमांची उमेदवारी बदलून तत्कालीन जि. प. सदस्य दिलीप आत्माराम भोळे यांना उमेदवारी जाहीर केली. बाळासाहेबांनी भोळेंना व्यासपीठावर बोलवून घेतले. ‘भाेळे इतका साधाभाेळा राहू नकाे, आमदार हाे’ अशी कोपरखळीही मारली.  

नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात शिवसेनेची उमेदवारी राजेंद्र दायमा यांना जाहीर केल्यानंतर प्रचाराची सभा स्वत: शिवसेनाप्रमुखांनीच घेण्याचे ठरवले. मात्र जातीय समीकरणांमुळे सभेच्या दिवशीच उमेदवारी बदलली गेली. सभेत बाळासाहेबांनी भोळेंना व्यासपीठावर बोलवले. पूर्वीचे उमेदवार राजेंद्र दायमा व भोळे या दोघांचे हात हातात धरून ‘बघा हा दायमा किती दिलदार आहे, हा म्हणतोय माझी उमेदवारी कापून भोळेंना द्या, या भोळेंना तुम्ही निवडून द्याल का?’ असा प्रश्न करत भोळेंना उमेदवारी दिली. 

शिवसैनिक दायमांसारखा असावा
एेन प्रचारसभेतच आपली उमेदवारी कापली गेली तरी नाराज न हाेता, केवळ बाळासाहेबांच्या शब्दांचा मान राखत राजेंद्र
दायमा यांनी भोळेंचा प्रचार जोमाने केला. भोळेंच्या विजयासोबत शिवसेना राज्याच्या सत्तेत आली. यानंतर मुंबईतील एका कार्यक्रमात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिक कसा असावा, याचे उदाहरण म्हणून राजेंद्र दायमांचा उल्लेख केला. दायमांना प्रदूषण नियंत्रण मंडळावर सदस्य म्हणून संधी देण्यात आली.

लाकडी पाट्या आणून उभारले १२ फूट व्यासपीठ
बाळासाहेब ठाकरेंच्या सभेसाठी शिवसैनिकांनी वखारीतून लाकडी पाट्या आणून व्यासपीठ उभारले होते. आताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर तत्कालीन डी. एस. मैदानावर १२ फूट उंचीचे व्यासपीठ कार्यकर्त्यांनी स्वत: उभारले होते. १२ फूट उंच व १० फूट रुंद मोठे शिवधनुष्य तयार करून व्यासपीठामागे लावले होते.

१७ चा दुर्दैवी योगायोग
बाळासाहेबांची भुसावळची सभा १७ नोव्हेंबर १९९५ रोजी झाली होती. यानंतर बरोबर १७ वर्षांनी १७ नोव्हेंबर २०१२ रोजीच बाळासाहेबांचे निधन झाले. १९९५ च्या सभेनंतर बाळासाहेब कधीही भुसावळात आले नाहीत. मात्र भुसावळवर त्यांचे विशेष प्रेम होते, असे अजूनही जुने शिवसैनिक अभिमानाने सांगतात.