आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 'When Crossing The Line Of The Tradition' Article

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परंपरेचा उंबरा ओलांडताना (अग्रलेख)

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तीन महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सबरीमाला मंदिर १० ते ५० वयोगटातील महिलांसाठी खुले करण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला होता आणि कित्येक शतके सुरू असलेल्या एक कुप्रथेला कायद्याने मूठमाती दिली. आपल्याकडे धार्मिक, सनातनी परंपरांना आव्हान देणारे धर्मविरोधी असतात, त्यात धर्मात स्त्रीला स्वातंत्र्य दिले पाहिजे, असा आवाज उठवला तरी त्याने धर्म नासला असे म्हटले जाते. अशा विषमतेने भरलेल्या समाजात जेव्हा सर्वोच्च न्यायालय स्त्रियांचे धर्मातील स्वातंत्र्य व त्यांच्या हक्कांच्या मागे उभे राहत असेल तर ती एक प्रकारची बंडखोरी ठरते. पण या न्यायालयाच्या बंडखोरीलाही मर्यादा आहेत. न्यायालय घटनेनुसार कायद्यांचे अर्थ लावते व त्यानुसार व्यक्तीला त्याच्या अधिकाराची जाणीव करून देते. पण प्रत्यक्ष जीवनात ही लढाई म्हणावी तेवढी सोपी नसते. सामान्य व्यक्तीच्या पुढे परंपरेचे ओझे वागवणाऱ्या अजस्र व्यवस्थेचे, बहुसंख्याक समाजाचे आव्हान असते. ते आव्हान धुडकावणे हेच क्रांतिकारक असते. बुधवारी ४० वर्षांच्या बिंदू अम्मिनी व ३९ वर्षांची कनकदुर्गा यांनी सबरीमाला मंदिर प्रवेश करून एका संघर्षमय इतिहासाचे पान लिहिले. या महिलांचे साहस म्हणा, त्यांची बंडखोरी म्हणा वा त्यांचे अय्यप्पास्वामीविषयीची आस्था, प्रेम, श्रद्धा म्हणा... या दोघींनी राज्यघटनेने त्यांना दिलेला हक्क सन्मानात, दिमाखात बजावला. गेल्या २४ नोव्हेंबरला या दोघींनी सबरीमाला मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्या वेळी दोघींना प्रचंड विरोधाला सामोरे जावे लागले होते. पण त्यांनी मंदिर प्रवेशाच्या हक्कासाठीची जिगर सोडली नाही. जिवाची फिकीर केली नाही. उलट कालच्या मंदिर प्रवेशाने त्यांनी एकाच वेळी सर्वच धर्मातल्या सनातनी वर्गाला, परंपरेचे अवडंबर माजवणाऱ्या श्रद्धाळू समाजाला, केवळ आणि केवळ धार्मिक धुव्रीकरणाचे राजकारण करणाऱ्या केंद्रातल्या भाजप सरकारला, काँग्रेस पक्षाला, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला चपराक देण्याचे काम केले. 

 

बिंदू अम्मिनी व कनकदुर्गा या नास्तिक नाहीत, तर त्या ईश्वरी शक्तीचे अस्तित्व मानणाऱ्या श्रद्धाळू आहेत. त्यांनी देशभरात अनेक मंदिरांत जाऊन दर्शनही घेतले आहे. पण त्यांचा श्रद्धांपाठीमागचा विवेक जागृत आहे. श्रद्धेमागचा कार्यकारणभाव त्यांना समजतो आहे. त्यामुळे महिलांना मंदिर प्रवेश नाकारणाऱ्या परंपरेचे मूळ पुरुषसत्ताक, बुरसटलेल्या मानसिकतेत आहे, हे समजल्याने त्यांनी त्या मानसिकतेवर घाव घालण्याचे ऐतिहासिक कार्य केले. जिथे व्यवस्था मातृसत्ताक आहे असे म्हटले जाते, साक्षरतेचे प्रमाण सर्वाधिक आहे, तिथे असा संघर्ष करावा लागत असेल तर इतरत्र चित्र काय असेल! यापुढे बिंदू, कनकदुर्गानंतर सबरीमाला मंदिरात किती महिला जातील व त्या आपला हक्क बजावतील हे मुद्दे अलाहिदा. पण केरळसारख्या सुशिक्षित राज्यात धार्मिक धुव्रीकरण करणारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची विधाने निश्चितच लांच्छनास्पद आहेत. वास्तविक सत्तेतील या मंडळींनी राज्यघटनेने प्रत्येकाला दिलेल्या धर्मउपासनेच्या स्वातंत्र्याच्या बाजूने बोलण्याची गरज होती. पण हे सत्ताधारी तिहेरी तलाकच्या मुद्द्यावर मुस्लिम महिलांच्या हक्काची भाषा संसदेत व बाहेर जाहीरपणे बोलतात, तर दुसरीकडे हिंदू धर्मपरंपरेत न्यायालयाने हस्तक्षेप करू नये, ३३ कोटी देव असताना हेच देव कशाला असे संकुचित, छद्मी स्वरूपाची विधाने करतात ते संतापजनक आहे तितकेच चिंताजनकही आहे. गेले तीन-चार महिने देशात मंदिरांवरून राजकारण सुरू आहे आणि त्याद्वारे समाजात वेगाने धुव्रीकरण घडवून आणले जात आहे. या ध्रुवीकरणात काँग्रेससह इतर पक्षही आघाडीवर आहेत. राजकारणाची बदललेली परिभाषाच चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत दोघींचा सबरीमाला मंदिरप्रवेश ही धुव्रीकरणाच्या लाटेवरची तीव्र प्रतिक्रिया समजली पाहिजे. आपण सर्व एकसमान आहोत, स्त्री-पुरुष लिंग भिन्न असले तरी प्रत्येकाला मिळणारे अधिकार एकसमान हवेत ही आधुनिक समाजाची गरज आहे आणि त्याचबरोबर आपल्या श्रद्धा कोणत्याही धर्माच्या व कितीही टोकाच्या असल्या तरी समोरच्याच्या श्रद्धांची जाणीव आपल्याला असली पाहिजे हा सारासार विवेक समाजात रुजण्याची गरज आहे. सबरीमाला मंदिरप्रवेशाचे राजकारण केले गेले व ते एका अर्थाने वाईट असले तरी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने एका बुरसट प्रथेला कायद्याच्या पातळीवर अवैध ठरवले गेले. आता मंदिरातले पुजारी महिला प्रवेशामुळे गर्भगृह धुण्याचे काम करत आहेत. तो मूर्खपणा उद्या हजारो महिला मंदिरात गेल्यानंतर किती काळ चालतो हेही पाहावे लागले. मुळात समानतेला व सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या पुजारी मंडळींचा कायद्याच्या दृष्टिकोनातून बंदोबस्त करावा लागेल आणि त्यासाठी केरळ सरकारने पावले उचलली पाहिजेत. इतिहासात व्यक्तिस्वातंत्र्याचे अनेक लढे होऊन गेले आहेत. असे लढे हे क्रांतिकारक असो वा प्रतीकात्मक असो.. त्यांचे ऐतिहासिक मूल्य पिढ्यान््पिढ्या समाजाला दिशा देत जाते. बिंदू व कनकदुर्गांनी मंदिरप्रवेश करत अखंड स्त्रीहक्क चळवळीची दिशा स्पष्ट केली आहे. त्यांचे अभिनंदन...