आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • ... When Mahmud Offered Five Hundred Bucks To Rajiv Gandhi!, Article By Anita Padhye

... जेव्हा मेहमूदने राजीव गांधींना पाचशे रुपये देऊ केले!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

"सेलिब्रिटींच्या भेटीगाठी' हे लेखिका अनिता पाध्ये यांचे नवे पुस्तक मंजुल प्रकाशनतर्फे येत्या आठवड्यात प्रकाशित होत आहे. सिनेपत्रकार म्हणून कारकीर्द करत असताना त्यांनी जुन्या व नव्वदच्या दशकातील सिने कलाकारांच्या अनेक गोष्टींचा वेध "सेलिब्रिटींच्या भेटीगाठी' द्वारे घेतला आहे.  या पुस्तकातील काही संपादित अंश... ऐं शीचं दशक संपत आलं असतानाच मेहमूद पुन्हा चर्चेमध्ये आले ते एका घटनेमुळे. आणि त्याचनिमित्ताने माझी त्यांच्याशी प्रथम भेट झाली होती. गँगस्टर दाऊद इब्राहिमने आपल्या भावाच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त दुबईला आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये गोविंदा, अनिल कपूर या अभिनेत्यांसह मेहमूदनीदेखील भाग घेतला होता. परंतु त्या कार्यक्रमात अनिल कपूर नृत्य करत असताना त्याचे बूट उचलून मेहमूद ते सांभाळत असल्याचं दृश्य या कार्यक्रमाच्या लीक झालेल्या व्हिडिओ (व्ही.एच.एस.) कॅसेटद्वारे व्हायरल झाल्यामुळे चहुबाजूंनी मेहमूदवर टीका सुरू झाली. एकेकाळच्या या यशस्वी विनोदवीराला अनिल कपूरचे बूट उचलून सांभाळताना पाहणं ही गोष्ट नुसतीच निंदनीय नव्हती, तर त्यांच्यासाठी शरमेचीसुद्धा होती. याच विषयावर मेहमूदना बोलतं करण्यासाठी मी त्यांच्या जुहू येथील घरी गेले. या विनोदवीराच्या अभिनयाची मीदेखील प्रशंसक होते, परंतु मी प्रभावित झाले ते त्यांचा वागण्या-बोलण्यातील साधेपणा बघून. "दाऊदसारख्या व्यक्तीच्या कार्यक्रमाला तुमच्यासारख्या ज्येष्ठ कलाकाराने जावं ही गोष्ट कितपत योग्य आहे? शिवाय अनिल कपूरसारख्या तुमच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अभिनेत्याचे बूट उचलून सांभाळत बसणं?’ मी त्यांना विचारलं होतं. "अरे, ऐसा नहीं था रे बेटा, काही काळापूर्वी क्रिकेट सामना पाहण्यासाठी मी दुबईला गेलो होतो. स्टेडियममध्ये मॅच बघत असताना अचानक एक तरुण माझ्याजवळ आला आणि त्याने मला विचारलं, कैसे हो भाईजान? त्याच्या त्या प्रश्नावर ठीक है एवढंच उत्तर देत मी गप्प बसलो. पण मी त्या मुलाला अजिबात ओळखलं नाही. माझा एखादा चाहता असेल असंच मला वाटलं होतं.  "तुम्ही मला ओळखलं नाही?’ त्याने पुन्हा मला विचारलं तेव्हा मी मानेनेच त्याला नाही म्हटलं.  "मी इब्राहिम कासकरचा मुलगा दाऊद'. तो म्हणाला. इब्राहिम कासकर या पोलिसाशी माझा पूर्वी परिचय होता, पण त्याचा हा मुलगा दाऊद म्हणजेच स्मगलर दाऊद आहे हे खरोखरच त्या वेळेपर्यंत मला माहिती नव्हतं.' "पण अनिल कपूरचे बूट...? मी विचारलं "तो नाचत असताना त्याचे बूट मध्ये येत होते म्हणून ते उचलून मी बाजूला ठेवले इतकंच, आता संकलकाने शिताफीने केलेल्या संकलनामुळे त्या घटनेचा वादग्रस्त मुद्दा बनवला गेलाय, क्या तुम्हें मैं इतना गयागुजरा लगता हूं की किसी के बूट संभालू?’ मेहमूद म्हणाले.  परंतु त्यांच्या बोलण्यात किती सत्यता होती, हे तेच जाणोत.  एक मात्र खरं की, हा कलाकार मनाने खूप साधा, बोलघेवडा आहे हे मला जाणवलं. विनोदाची झालर देत बोलण्याची त्यांना सवय होती. कधी काळी आपण स्टार होतो परंतु काळानुरूप परिस्थीती बदलली आहे याचं भान त्यांना होतं. यशाच्या शिखरावरून पायउतार झालेले अनेक कलाकार पदरी अपयश पडल्यानंतरदेखील ते कबूल करण्याची हिंमत ठेवत नाहीत याचा अनुभव मी घेतला होता.  दाऊद प्रकरणाबरोबरच मेहमूदच्या आयुष्यातील विविध घटना, त्यांचं करिअर याविषयीसुद्धा त्या भेटीमध्ये बरंच बोलणं झालं. आपल्या आयुष्यात घडलेल्या काही मजेदार घटना, मनाला चटका लावणारे काही प्रसंग त्यांनी सांगितले होते. ही गोष्ट बहुश्रुत आहे की, चित्रपटसृष्टीमध्ये स्ट्रगल करत असताना अमिताभ बच्चन हे मेहमूदच्या घरी राहत होते व त्यांचे बहुसंख्य चित्रपट अयशस्वी झाले असूनही मेहमूदनी त्यांना "बॉम्बे टू गोवा' या आपल्या चित्रपटामध्ये नायकाची भूमिका दिली होती.  "भाईजान, उद्या “देखा ना, हाय रे सोचा ना” या गाण्याच्या चित्रीकरणामध्ये मी सहभागी होत नाही, मला चांगलं नाचता येत नाही' उदास आवाजात अमिताभ म्हणाले होते.  "अरे, कुछ नहीं होगा, तू चांगला नाचतोस, उगाच डोक्यामधला संशय काढून टाक.' मेहमूदनी अमिताभना धीर देत त्यांचं मनोबल वाढवलं.   दुसऱ्या दिवशी सकाळी गाण्याचं चित्रीकरण सुरू झालं तेव्हा नृत्य दिग्दर्शक दाखवत असूनही अमिताभ बच्चन वेडवाकड्या स्टेप्स करू लागले. ते पाहून आदल्या दिवशीचं अमिताभसह झालेलं बोलणं मेहमूदना आठवलं. अमिताभना खरोखरच नृत्य करणं जमत नव्हतं आणि त्या कारणाने ते आणखीनच निराश होत होते. त्यामुळे त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी मेहमूदनी एक युक्ती योजली. चित्रीकरणामध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांना बोलावून त्यांनी सांगितलं की, अमिताभच्या नृत्याच्या दोन स्टेप्स चित्रित झाल्या की तुम्ही सर्वांनी टाळ्या, शिट्या वाजवत त्याच्या नृत्याची स्तुती करा म्हणजे त्याला हुरूप येईल, तुमचं प्रोत्साहन मिळाल्यामुळे तो चांगलं नृत्य करू लागेल. त्यांची ही युक्ती अगदी बरोबर लागू  पडली आणि सहकलाकार, नृत्य दिग्दर्शक आपल्या नृत्याची स्तुती करताहेत हे पाहिल्यावर अमिताभ यांची नृत्याची भीती कमी झाली होती. मेहमूदच्या घरी अमिताभ बच्चन राहत होते त्या वेळी घडलेली एक चमत्कारिक घटना मेहमूदनी मला सांगितली होती. दिल्लीला राहणाऱ्या आपल्या आईवडिलांना भेटून अमिताभ एका संध्याकाळी मेहमूदच्या मुंबईच्या घरी परतले तेव्हा त्यांच्यासोबत देखणा, शालीन व शांत चेहऱ्याचा तरुणदेखील होता.   "हा माझा दिल्लीचा मित्र आहे, दोन दिवस राहणार आहे, अमिताभने आपल्या मित्राची मोघम ओळख दिली. काही वेळाने तो तरुण हॉलमध्ये आला आणि मेहमूदना पाहताच बसावं की नाही या संभ्रमात घुटमळू लागला.   " अरेऽऽऽ, बैठो बेटा, अपनाही घर समझो’ मेहमूद आपलेपणाने म्हणाले तसं तो त्यांच्या समोरच्या खुर्चीत बसला.  "तुम भी फिल्मों में काम ढूंढने आए हो? घर में कौन कौन है? फादर क्या करते है?’ मेहमूदनी प्रश्न विचारत त्याची चौकशी सुरू केली. त्या लाजवट, अंतर्मुख तरुणाने त्यांना फक्त आपलं नाव सांगितलं.  "हंऽऽऽ अच्छा, बेटा, ये पाच सौ रुपये रखो, बॉम्बे आए हो तो थोडा घूमो, फिरो, मजा करो.’ मेहमूदनी आपल्या वॉलेटमधून शंभराच्या पाच नोटा बाहेर काढून बळेबळे त्या तरुणाच्या हातात कोंबल्या. मेहमूदनी पाचशे रुपये हातात देताच काही न बोलता तो तरुण अमिताभच्या रूममध्ये निघून गेला आणि काही सेकंदांतच अमिताभ धावत हॉलमध्ये आले. त्यांच्या हातात मेहमूदनी तरुणाला दिलेल्या शंभरच्या पाच नोटा होत्या.  "भाईजानऽऽऽ, ये आपने क्या कर दिया?'  "क्या कियाऽऽऽ? तेरा दोस्त आया है ना, उसे तुम बंबई घुमाओ, इसीलिए पैसे दिए है उसे.’ "आप जानते है, वो कौन हैऽऽऽ?’  "तुम्हारा दिल्ली का दोस्त है ना?’    "भाईजान, उसका नाम राजीव है, हमारे देश की प्रधानमंत्री इंदिरा गांधीजी का बेटा है वो.”  हे ऐकताच बडबड्या स्वभावाचे मेहमूद एकदम गप्प झाले.