आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ब्रॅडमन यांना भेटल्यावर जे फीलिंग तेच अाज पुलंच्या घरी अाल्यावर..’

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे -  पु. ल. देशपांडे ऊर्फ ‘पुल’ आणि सचिन तेंडुलकर हे दोघेही निःसंशयपणे मराठी मनाची लाडकी व्यक्तिमत्त्वं. एकाने कला- साहित्य- संगीताच्या क्षेत्रात मुशाफिरी करत आनंदाची उधळण केली. दुसऱ्यानं जगभरच्या क्रिकेटच्या मैदानांवर नजाकतभरी फलंदाजी करून कोट्यवधी लोकांना वेड लावलं. महाराष्ट्राच्या एका मानबिंदूबद्दल दुसऱ्या मानबिंदूला किती आपुलकी आणि प्रेम आहे, याचं अनोखं दर्शन शुक्रवारी (ता. १६) पुण्यात घडलं. निमित्त होतं ‘पुलं’च्या जन्मशताब्दीचं....  


‘पुलं’वरच्या प्रेमापोटी सचिन तेंडुलकर पुलंच्या पुण्यातल्या मालती-माधव या निवासस्थानी आला होता. ‘पुलं’च्या कुटुंबीयांनी सचिनचे स्वागत केलं. ‘पुल’कित वास्तूत आल्यानंतर भारावलेल्या सचिनचे शब्द होते, ‘सर डॉन ब्रॅडमन यांना भेटल्यावर मला जे फीलिंग आलं होतं तेच फीलिंग मला आज पुलंच्या घरी आल्यानंतर वाटत आहे.’ सन १९९८ मध्ये स्वतःच्या नव्वदाव्या वाढदिवसाला सर डॉन ब्रॅडमन यांनी सचिनला खास निमंत्रण दिलं होतं. या निमंत्रणावरून सचिन ब्रॅडमन यांच्या अॅडिलेड (ऑस्ट्रेलिया) किंगस्टन पार्क येथील निवासस्थानी गेला होता. ‘पुलं’च्या घरी आल्यानंतर सचिनच्या मनात आज नेमक्या त्याच भावना उचंबळून आल्या.

 

पुलंबद्दल सचिन म्हणाला, “...खरं तर मी नि:शब्द आहे. काय बोलायचं कळत नाहीये. फार आनंद झालाय. मी स्वतःचा बहुमान समजतो की ‘पुलं’च्या कुटुंबीयांनी मला बोलावलं. ‘पुलं’चे आणि आमचे घरगुती संबंध होते. बाबा आणि ‘पुलं’ची चांगली मैत्री होती. ‘पुलं’नी पाठवलेली अनेक पत्रं बाबांनी मला दाखवली आहेत. आमच्याकडे आहेत ती अजून. ‘पुलं’ची पहिली आठवण मी लहान असतानाची बांद्र्याच्या ‘साहित्य सहवास’मधली आहे.

 

मी पाच-सहा वर्षांचा होतो. ‘पुल’ आमच्या कॉलनीत आले होते. ते येणार म्हणून त्या वेळी कॉलनीत निर्माण झालेली उत्कंठा मला आजही स्मरते. केवढी लगबग उडाली होती. त्यावरूनच कोणीतरी मोठं येणार हे समजलं होतं. मीही रांगेत थांबून त्यांची सही घेतली होती.’  
‘घरी त्यांच्याबद्दल नेहमी ऐकायचो. भाऊ-बहीण, आई-वडिलांकडून. ‘पुलं’बद्दल कोणतीही गोष्ट सांगताना सांगणाऱ्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटतं. ‘पुलं’च्या कार्यक्रमांच्या जेवढ्या सीडीज मी पाहिल्या, त्यात असं दिसतं की सर्वसामान्य माणसाशी ‘कनेक्ट’ होण्याची दैवी दैणगी त्यांना लाभली होती.

 

सर्वसामान्यांच्या भावविश्वाशी असं नातं जुळवत त्यांना आपल्या परफॉर्मन्समधून पुलंनी आनंद दिला,’ या शब्दांत सचिननं ‘पुलं’बद्दलची थोरवी सांगितली. आमच्या पिढीने तो आनंद लुटला. नव्या पिढीला आता खूप साधनं उपलब्ध आहेत. त्यांनी संधी दवडू नये. ‘पुल’ जेवढे वाचता येतील तेवढे वाचावेत. ‘पुलं’चे कार्यक्रम पाहावेत. आपण सगळे ‘पुलं’वर प्रेम करतो आणि करत राहू. त्यासाठी एकाच वर्षाचा उत्सव नको. पुलंवरच्या प्रेमाचा उत्सव अखंड चालू राहावा, असंही आवाहन सचिनने तरुणाईला उद्देशून केलं

 

ऑस्ट्रेलियातून अाणलेल्या फोटोची भेट  
‘पुलं’चे भाचे दिनेश ठाकूर आणि भाचेसून ज्योती ठाकूर यांनी सचिनला एक छायाचित्र भेट दिलं. नव्वदच्या दशकात सचिन आणि ‘पुलं’ची भेट मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर भेट झाली होती तेव्हा टिपलेलं दोघांचं हे छायाचित्र आहे. गंमत म्हणजे ज्या कॅमेऱ्यात तेव्हा हे छायाचित्र टिपलं तो कॅमेरा आणि तेव्हाचा फोटो आता ऑस्ट्रेलियात आहे. सचिन ‘पुलं’च्या घरी येणार म्हणून त्याला भेट देण्यासाठी तो खास मागवून घेण्यात आला होता.

 

सूर्य किती प्रखर असतो हे सांगावं लागत नाही...
‘पुलं’च्या साहित्याबद्दल बोलावं तितकं कमी आहे. मी काय वेगळं सांगणार? सूर्य किती प्रखर असतो हे सांगावं लागत नाही,’ असं म्हणून सचिननं किस्सा सांगितला. ‘अगदी कालच आमच्या घरी गप्पा चालू होत्या. माझ्या बहिणीनं किस्सा सांगितला. ‘पुलं’च्या अखेरच्या काळात ते शरीरानं थकले होते. त्यामुळे एका कार्यक्रमात त्यांना व्यासपीठावर यायला थोडा वेळ लागला. ते मंचावर आले. ‘पुल’ कोटीबहाद्दर होते. त्यांना अगदी सहज, उत्स्फूर्तपणे सुचायचं. क्षणभर बसले आणि म्हणाले, ‘आतापर्यंत स्वभाव कधी आखडू नव्हता, पण गुडघे अलीकडं आखडू लागलेत.’ हा किस्सा सांगताना सचिनला हसू आवरलं नाही.

 

आम्ही मत्स्यप्रेमी  : ‘सन १९९६ मध्ये मी २३ वर्षांचा असताना ‘पुलं’ना भेटलो होतो. आमच्या दोघांमध्ये एक साम्य होतं. आम्ही दोघेही प्रचंड मत्स्यप्रेमी. दोघांनी फिश फ्रायवर चांगला ताव मारला होता. मी आई-बाबांच्याबरोबर शिवाजी पार्कला त्यांच्याकडे गेलो होतो. आम्ही सगळ्यांनी मिळून छान जेवण केलं होतं. सुवर्णक्षणच होते ते माझ्या आयुष्यातले,’ अशी अाठवण सचिनने सांगितली.

बातम्या आणखी आहेत...